Friday, November 28, 2008

गोष्ट – एका छोट्याशा कोंबडीची !

गोष्ट जुनीच आहे. वळण जरा वेगळे !!)

कोणे एके काळी एक छोटी लाल रंगाची कोंबडी होती. ती एका हिरव्यागार शेतात स्वत:चे धान्य पिकवून पोट भरत होती. एक दिवस तिला गव्हाचा एक दाणा सापडला. तिने विचार केला की ती आता जास्त धान्य पिकवू शकेल.

“मला गहू पेरायला कोण मदत करेल” ? कोंबडीने विचारले ?
“मी नाही.” बदक म्हणाले, “पण मी तुला कॉफ़ीची रोपे आणून देईन. गव्हाऎवजी तू कॉफ़ी लावलीस तर भरपूर पॆसे मिळतील.”

“मी नाही.” डुक्कर म्हणाले. “पण मी तू लावलेली कॉफ़ी विकत घेईन.”

“मी नाही. उंदीर म्हणाला. “पण तुला सुरुवातीला त्यासाठी लागणारे पॆसे मी देईन.”

मग त्या कोंबडीने गव्हाऎवजी कॉफ़ी पेरली.

“ही कॉफ़ीची झाडे वाढवायला मला कोण मदत करेल ?” कोंबडीने विचारले.
“मी नाही”. बदक म्हणाले. “पण मी तुला त्यासाठी लागणारे खत विकत देईन. “
“मी नाही.” डुक्कर म्हणाले. “पण मी तुला पिकावर कीड पडू नये यासाठी लागणारे जंतुनाशक फ़वारे विकत देईन. “
“मी नाही.” उंदीर म्हणाला. “पण तुला खत व जंतुनाशके विकत घेण्यासाठी लागणारे पॆसे कर्जाऊ देईन.”

अशा रीतीने कोंबडीने खूप कष्ट केले. तिने कॉफ़ीच्या शेतात खते घातली. जंतुनाशके फ़वारली. गहू वाढविण्यासाठी लागणा-या पॆशांपेक्षा तिला खरे तर यासाठी खूप जास्त पॆसे लागले. पण कॉफ़ी विकून मिळणा-या पॆशांचा मनात ती विचार करत राहिली. मग कापणीचा हंगाम आला.

“मला कॉफ़ी विकायला कोण मदत करेल ?” कोंबडीने विचारले.
“मी नाही.” बदक म्हणाले. “पण तुला माझ्या कारखान्यात ती भाजायला व पॅक करायला लागेल.”
“मी नाही.” डुक्कर म्हणाले. “आता सगळेचजण कॉफ़ी पेरायला लागलेत आणि कॉफ़ीच्या किंमती धडाधड कोसळल्या आहेत.”
“मी नाही.” उंदीर म्हणाला. “पण तुला आता माझे कर्ज फ़ेडायला हवे.”
अशा रीतीने कोंबडीच्या लक्षात आले की तिने गव्हाऎवजी कॉफ़ी पेरुन मोठी चूक केली आहे. कारण तिच्या डोक्यावर मोठे कर्ज झाले होते व खायलाही काही नव्ह्ते.
मला खायला काहीतरी हवे आहे. कोण मदत करेल.?” कोंबडीने विचारले.
“मी नाही.” बदक म्हणाले. “तुझ्याकडे त्याच्या बदल्यात द्यायला काही पॆसे उरले नाहीत.”
“मी नाही.” डुक्कर म्हणाले. “सगळ्यांनी आता कॉफ़ी पेरायला सुरुवात केल्यामुळे खायला कोणाकडेच काही नाही.”
“मी नाही.” उंदीर म्हणाला. “पण मी दिलेल्या पॆशांच्या बदल्यात मी तुझी जमीन विकत घ्यायला तयार आहे आणि कदाचित तुला माझ्यासाठी त्या जमिनीवर काम करायला मी परवानगी देईन.”

Thursday, November 27, 2008

फ़ॅशन..

मधुर भांडारकरचा असल्याने हा सिनेमा पाहाण्याची उत्सुकता होती. पेज ३, चांदनी बार, कॉर्पोरेट मुळे अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्या वाढत्या अपेक्षांना हा सिनेमा अजिबात पुरा पडत नाही. हम आपके हॆ कौन जर लग्नाची VCD असेल तर ही फ़ॅशन शोज ची VCD आहे. मधून मधून प्रियांका चा सुरेख अभिनय ही जमेची बाजू दिसते. सिनेमा अनेक वेळा (मध्यंतरानंतर तर जास्तच) संथ होतो.

एका बाबतीत मात्र हा सिनेमा मधुर भांडारकर च्या आधीच्या सिनेमांपेक्षा वेगळा आहे. वर उल्लेख केलेल्या सिनेमांचे शेवट नकारात्मक आहेत. कॉर्पोरेट मध्ये एकटी पडलेली बिपाशा बसू, तर पेज ३ मधली कोंकणा. चांदनी बारमध्येही बारबालांचे दु:ख, एकटेपणा इथेच सिनेमा संपतो.

फ़ॅशनमध्ये प्रियांका एका आवर्तनात गरगरत व्यसनांच्या अतिरेकात अडकते.. असे एका टप्प्यावर घडले तरी तिच्या आईवडिलांच्या साहाय्याने ती परत एकदा त्याच industry मध्ये उभी राहाते. सिनेमाचा शेवट तद्दन फ़िल्मी असला तरी तो - आयुष्यात घडलेल्या चुकांची भरपाई नीट पाय रोवून उभे राहता येऊन करता येते याची नीट जाणीव करुन देतो. त्यासाठी आत्महत्या, निराशा, मानसिक विकृती अशा शिक्षा भोगाव्याच लागतात असे अनेकदा मांडले जाते. पण खंबीर प्रयत्नांनी तुम्ही हे सगळे avoid करुन स्वत: आयुष्यात पुढे जाऊ शकता व सोबत इतरांनाही नेऊ शकता (सिनेमात कंगणा राणावत हिला प्रियांका मदत करते असे दाखविले आहे.) हा महत्वाचा मुद्दा या सिनेमात मांडला आहे.

Tuesday, November 25, 2008

रुक्मिणी

बाई, काय पाहिलंस, कसं साहिलंस नाही विचारत
वंचनेचा चेहरा दिसतो कधी अगदी करूण आणि भोळा
पण हे उमगण्याचं सहावं इंद्रिय असतंच ना प्रत्येक शहाण्या बाईला

म्हणून विचारायचं ते नंतरच्या उलाथापालथीबद्दल
तुझ्या फ़रपटीबद्दल
सोन्याच्या दिवसांनी उचललेला मेणा तुझा
तू कशी आलीस चालत द्वारकेहून इतक्या लांब पंढरपुरात ?
कशी राहिलीस परक्या मुलुखात, भयाण अनोळखी दिंडीरवनात ?
जगण्याची ठेच अशी खाल्लीस की पावलाला रक्ताची धार लागली
अन तुझी ती हिंमत त्याने रुसवा म्हणून निकालात काढली
पुन्हा तुझ्या शेजारीच वस्ती केली त्यानं नव्यानं
तरी परतली नाहीस मुकाट त्याच्याकडे
एकटीच चूल मांडून ताठ मानेनं जगत राहिलीस
कानठळ्या बसविणारा टाळमॄदंगाचा गजर शेजारी
तो ऎकत उभा जन्म उपेक्षेनं काढणं काय असेल?
पाय दगडाचे केलेस अन ओठही दगडाचे
बाई, तुझ्या कोनाड्यात आकांताचा पोत भडकलाच नसेल?
झाकलं नाहीस तरी उघडलंही नाहीस चव्हाट्यावर
संसाराचं श्रीफ़ळ तुझ्या ओटीतून अलगद काढून घेतलं त्यानं
पण तू दळत राहिलीस तुझ्या दु:खाचा बुक्का शांतपणे
पंढरी काळीनिळी झाली त्याच्या उधळ्यानं..

अरुणा ढेरे

पट्टराणी..

रुक्मिणी

पदराबरोबर प्रपंचाची प्रतिष्ठा खोचून
पट्टराणी तू वावरलीस त्याच्या राजघरात
ठेवलं नाहीस बांधून त्या राधेच्या रमणाला
भामेच्या वल्लभाला, कॄष्णेच्या केशवाला,
तुझ्या असतेपणाच्या तलम भरजरी वेढ्यात

तो पालांडून गेला असेल जेव्हा युगाच्या अवकाशातलं
वर्तमान आणि भविष्याचं विराटपण सहजपणे
तेव्हा राजवाड्याच्या भुलभुलॆय्यातली लहान लहान अंतरं
चकवे आणि तळघरं तू पार करत असशील निर्धाराने

कालयवन, जरासंध, शिशुपाल, कौरव.. दुष्टशक्तींच्या विनाशात
तो महानायक गुंतला असेल
तेव्हा तू असशील मुलाला पाजवत, निजवत, गोष्टी सांगत
बापाच्या दूर असण्यानं तो दुखावू नये म्हणून काळजी घेत
उद्याचा यदुनायक वाढवत असशील

तुझं आईपण अवघड आणि बाईपण त्याहूनही अवघड
तरी कशी सोपंच करत गेलीस तू त्याला
तुझ्या आयुष्यातून निसटून जगडव्याळ पसरत जाणं ?
कसं समजलं तुला हे अवघडातलं सोपेपण
म्हणजे स्वाभाविक जगण्यासाठी दुस-याला मोकळं करणं ?
आणि म्हणजेच संपूर्ण प्रेम करणं

अरूणा ढेरे

कॅलिडोस्कोप

रोज सकाळी ऒफ़िसला जाताना गाडी सुरू केल्यापासून ऒफ़िसमध्ये पोहोचायचा वेळ साधारणत: २५ मिनिटे. त्या पंचवीस मिनिटात निवांतपणा मिळतो आणि मनात विचारांची गर्दी होते. त्यात मनात साठणारी दॄश्ये कॅलिडोस्कोपसारखी उमटतात. लोलक फ़िरतो आणि अचानक वेगळे दॄश्य दिसते.

गेल्या आठ दिवसात कोकिळेचा आवाज ऎकू येतो. मोग-याचा वास.. कलिंगडाच्या फ़ोडी.. आंब्याची अढी.. परीक्षांच्या दिवसातील जागरणे.. रमणबागेच्या पटांगणावर बाबूजींचे रामनवमीला ऎकायला मिळणारे गीतरामायण. सारे काही क्षणार्धात जागे करण्याची किमया त्या कोकिळेच्या सुरात आहे.

जरा पुढे गेले की जे कोणते गाणे गाडीत कानावर पडते, त्या गाण्याने मन कोणत्यातरी प्रसंगात जाते. श्रीधर फ़डके यांचे ’काही बोलायाचे आहे’ हे त्यांच्या चतु:शृंगी येथील कार्यक्रमात तर ’तुला पाहिले मी’ यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ते गाणे प्रथम ऎकले त्याच्या आठवणीत नेते.

कुमार गंधर्व, पं.जसराज थेट सवाई गंधर्व संगीत महोत्सवात नेतात. एकदा पहाटेच्या सुमारास जसराज गायला बसले आणि झाकीर हुसेन यांचे आधी सोलो तबलावादन झाले होते तरी ते जसराज यांच्या साथीला अचानक आले.. ते स्टेजवर आल्यावर झालेला आनंद आणि टाळ्यांचा कडकडाट आजही मनात तसाच आहे.

रोजचा तो पंचवीस मिनिटांचा प्रवास नवीन काहीतरी शिकवून जातो. परवाच एका माणसाचा सायकलवरुन तोल गेला व त्याचा डबा पडला व सांड्ला.. तो गोळा करण्याचा त्याचा प्रयत्न चालला होता. मनात कालवाकालव झाली.

हे सगळे शब्दबध्द करण्यापलीकडे आपण काही करत नाही. मुर्दाड आहोत याची जाणीव होईपर्यंत ऒफ़िस येते आणि दिवसभराची कामे सगळे विचार मनाबाहेर घालवितात.

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून।
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून…।

तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिनकळणारे
धुंदमदिर निळे तळे…

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले।
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता…।

पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना…

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची

तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं.
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो।
राधे, पुरुष असाही असतो! …………।

अरूणा ढेरे..

रस्ता...

रस्ता

उस मोडपे बॆठा हूं
जिस मोडसे जाती हॆ
हर इक तरफ़ राहें..
इक रोज तो युं होगा
इस मोडपे आकर तुम
रुक जाओगी कह दोगी
वह कौनसा रस्ता हॆ
जिस राह पे जाना हॆ…

एक उदास सकाळ.. ढगाळलेले वातावरण..कुंद हवा.. नुसतीच तगमग. लग्नाला जायचे होते. जवळचे लग्न.. पण मूड्च येईना.. शेवटी मनापुढे हार पत्करुन लग्न – साडी – दागिने cancel करुन जीन्स – जॅकेट असा सरंजाम करुन बाहेर पडले. कुठे जायचे काही ठरविलेले नव्हतेच. एका मित्राला फ़ोन केला. माझा स्वर ऎकून तो नुसताच ’ये’ इतकेच म्हणाला. त्याच्या घरी आजपर्यंत गेले नव्हते. मग रस्ता शोधत गेले. त्याने हवेला सूट होणारी कॉफ़ी तयारच ठेवली होती. निवांत बसले.. ऒफ़िसला चक्क दांडी.. किती दिवस .. वर्षे झाली बरे.. अशी निरुद्देश दांडी मारुन. तेही आठवेना इतकी. मोबाईलही बंद केला. मनात एका परिचितांचा dialogue आठवला. हळू हळू tourist spots वर mobile jammer लावलेत म्हणून जास्त charge घेतील लोक.

कॉफ़ी, सहज इकडच्या तिकडच्या गप्पा.. थोडे खाणे .. आणि मनातला सल एकदम निघून गेला. सगळीकडे छापून येत होते तेच तिचेही दुखणे होते.. वेग थोडा कमी करा.. गाडी चालविण्याचा, टीव्हीची चॅनेल्स बदलण्याचा, आणि जगण्याचाही..

बाहेर पडले.. आणि एका नवीनच झालेल्या रस्त्याने गाडी काढली.. वा.. आता तेच आकाशातले ढग एकदम रोमॅंटिक वाटायला लागले.. मनात ’काली घटा छाये’ सारखी गाणी सुचायला लागली. घरी नवीन काय पदार्थ करायचा ते सुचले.. ऒफ़िसमधले ताण कमी करायचे plans सुचले.

किती सोपे होते सगळे.. फ़क्त स्वत:ला थोडा वेळ द्यायला हवा होता.

त्या नवीन रस्त्यावरुन आता जेव्हा कधी जाते तेव्हा हीच आठवण येते आणि तो रस्ताच मग लाडका झाला आहे.