Thursday, October 1, 2009

गाण्यांच्या गोष्टी.. ऋतू हिरवा..




काल श्रीधर फ़डके, आरती अंकलीकर व मधुरा दातार यांच्या ऋतू हिरवा या कार्यक्रमाला जायचा योग आला. सकाळ माध्यम प्रायोजक होते. सिध्दी गार्डन येथे सुरेख मंडप उभारलेला आहे. आसनव्यवस्था उत्तम केलेली आहे.

जय शारदे वागीश्वरी ने सुरुवात झाली.

स्पर्शातूनी तव देवते साकार ही रुचिराकृती
शास्त्रे तुला वश सर्वही विद्या कला वा संस्कृती..
लावण्य काही आगळे भरले दिसे विश्वांतरी

हे मूळ रेकॉर्ड मध्ये नसलेले कडवे या कार्यक्रमात श्रीधरजींकडून ऎकायला मिळाले. ऋतू हिरवा या अल्बम च्या अनेक आठवणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऎकायला मिळाल्या. स्वत: संगीतकाराकडून त्या ऎकायला मिळणे हे भाग्यच..

ऋतू हिरवा हे गाणे श्रीधरजींनी आशा भोसले यांना ऎकविले. व त्यावर त्या म्हणाल्या ’मी करेन हे गाणे’.. आणि त्यानंतर एक वर्षभर त्या या अल्बम साठी वेळ देऊ शकल्या नाहीत. मग एक दिवस त्या श्रीधरजींना म्हणाल्या ..की हे गाणे फ़ार अवघड आहे. जे कोणी हे गाणे कार्यक्रमात गातात..त्यांना हा किस्सा ऎकून धन्य वाटेल. काल मधुरा दातार ने हे अप्रतिम सादर केले.

घनरानी.. या गाण्याची आधी चाल सुचली. ती श्रीधरजींनी शांताबाईंना ऎकविली. त्यावर त्यांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये गाणे लिहून दिले. मधुरा दातार ने हे गाणे काल ऎकविलेच.. पण नंतर चाल कशी बांधली हे सांगताना चालीतले व शब्दोच्चारातले अनेक बारकावे श्रीधरजींनी ऎकविले.

फ़ुलले रे क्षण हे गाणे नितीन आखवे यांनी १६ वेळा लिहिल्याची कथाही ऎकायला मिळाले.. आपण perfectionist आहोत त्यामुळे कवींना फ़ार त्रास देतो असे काल श्रीधर फ़डके यांनी सांगितले.


सांज ये गोकुळी मधील आशा भोसले यांनी recording च्या वेळेला किती वेगवेगळ्या जागा घेतल्या याचेही सादरीकरण काल ऎकायला मिळाले. आपल्या सर्व गाण्यांचे श्रेय त्यांनी कवींना व गायक / गायिकांना आहे हे अतिशय नम्रपणे अनेक वेळा सांगितले.

हे गगना हे कुसुमाग्रजांचे गाणे.. याची शब्दरचना अतिशय उत्तम आहे..

हे गगना..
तू माझ्या गावी आणि तिच्याही गावी
तुला उदारा पहिल्यापासून सर्व कहाणी ठावी..

याला अगदी चपखल चाल आहे. आणि गीतरामायणात जसे सीता व राम यांच्या गाण्यात रामाचा उल्लेख प्रसंगाप्रमाणे करते (मज आणून द्या तो हरीण अयोध्यानाथा, थांबला कशास्तव धनुर्धरा हो आता.... किंवा जेथे राघव तेथे सीता या गाण्यात जानकीनाथा.. असे प्रसंगानुरुप उल्लेख आहेत..) तसे या गाण्यात पुढे

घन केसांतूनी तिच्या अनंता फ़िरवीत वत्सल हात.. अशी एक ओळ आहे.

यात गगना, उदारा, अनंता असे आकाशाला निरनिराळे समर्पक शब्द वापरले आहेत. असो..

अशा अनेक गाण्यांच्या गोष्टी काल ऎकायला मिळाल्या. आरती अंकलीकर यांनी गगना गंध आला, होऊनी मी जवळ येते, तेजोमय नादब्रम्ह.. नवीन ’सुर वरदा रामा’ यातील ’ताने स्वर रंगवावा’ आणि अर्थातच.. मी राधिका, मी प्रेमिका उत्तम सादर केले.

मन कशात लागत नाही
अदमास कशाचा घ्यावा
अज्ञात झ-यावर रात्री
मज ऎकू येतो पावा..

या ओळी ग्रेस यांच्या.. त्यांना श्रीधरजींनी चाल बांधली. पण पुढची कविता कळत नसताना पुढे चाल बांधणे त्यांना पसंत नव्हते. ( perfectionist चा हा अर्थ आहे.. कवितेला चाल लावणे.. व एक उत्तम गाणे तयार करणे यात फ़रक आहे.. असे काल त्यांनी स्वत:च सांगितले.)

मग सुधीर मोघे यांनी त्या चालीवर
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा.. असे शब्द लिहून दिले..

दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा.. या ओळी फ़ार अस्वस्थ करतात नेहमीच. तसे कालही झाले.

या गाण्यांच्या गोष्टी चालत राहातील.. आत्ता थांबते आहे.