
“मृत्यू कुणाचीही कदर करत नाही. कशाचीही पर्वा बाळगीत नाही. जीवनात येणारे ते अनादी, अनंत आणि आंधळे असे चक्रीवादळ आहे.”… अमृतवेल.. वि.स.खांडेकर
विहीर..
हा सिनेमा पाहाताना सतत या वाक्याची आठवण येत होती. रक्ताच्या माणसाचा मृत्यू होईपर्यंत त्याचे गांभीर्य कळत नाही. तसे घडल्यानंतर आपण अचानक ’आयुष्यात ज्या गोष्टी नाहीत त्याची तक्रार करत असतो’ ते कमी होते. कारण जित्याजागत्या माणसाची उणीव कधी भरुन येणार नसते.. बाकीच्या गोष्टी मिळण्याची शक्यता तरी असते.. एखादे जिवलग माणूस आपल्या आधी जाईल आणि तो किंवा ती नसलेल्या जगात आपल्याला जगावे लागेल याची भीती ही सर्वात मोठी भीती असे मला वाटते.
विहीर च्या नामावलीत दि.बा.मोकाशी, जी.ए.कुलकर्णी व चिं.त्र्यं. खानोलकर यांचे आभार मानले आहेत. सिनेमाची कथा कोणत्या अंगाने जाणार याची कल्पना हे तीन लेखक वाचलेल्यांना येऊ शकते.
नचिकेत.. याची गोष्ट येते गरुड पुराणात. नचिकेताच्या वडिलांनी त्याला यमाला दिले आहे असे सांगितले. आणि यमाकडे जाऊन नचिकेताने मृत्यूवर विजय मिळवला अशी कथा आहे. जन्ममरणाच्या फ़े-यातून मुक्ती मिळवलेला नचिकेत एक पात्र होऊन या सिनेमात भेटतो. नातेवाईकांच्या गराड्यात त्याला गुदमरल्यासारखं वाटतं.. त्याला कुठेतरी पळून जायचं आहे.. तसंच आपण आहोत तसे कोणालातरी दिसलो नाहीत म्हणजे आपले अस्तित्व कुठे आहे.. असे अनेक प्रश्न व विचार तो मांडतो.. सगळ्यातून अलिप्त आणि तरीही सगळ्यांचा लाडका.. असे हे पात्र आहे. आलोक राजवाडे याने ती भूमिका उत्तम केली आहे. त्याच्या प्रत्येक entry मधे एक विशिष्ट आवाज ऎकू येतो.. ’अज्ञात झ-यावर रात्री, मज ऎकू येतो पावा’.. म्हणजे काय ते तो आवाज ऎकून कळले.
समीर.. म्हणजे स्वच्छंदी वाहणारा वारा.. इतरांसाठी तो चौकटीत वागतो. पण नचिकेताचे त्याला झपाटल्यासारखे आकर्षण आहे. तो ज्या वयात आहे.. त्या वयात असे झपाटलेपण असतेच.. नचिकेत खरा संवाद साधतो तो फ़क्त समीर सोबत.. पण तरीही नचिकेत समीर मधे गुंतलेला नाही.. सगळं सोडून तो जाणार आहेच.
तू पळून जाणार नाहीस असे समीर त्याला म्हणतो व नचिकेत फ़क्त मंद हसतो..
पोहोण्याच्या स्पर्धेसाठी एका दिवसासाठी समीर जातो व परत येतो तर दिसते ते नचिकेताचे प्रेत.. त्याच्या मनाला हा आघात सहन होणे शक्यच नसते.
तो पिसाटल्यासारखा वागतो. रात्री बेरात्री उठून नचिकेतला लिहितो.. नचिकेत त्याला न भेटता गेला याचे एक दु:ख सतत आहे. खरे तर असेही वाटले.. की तो गेला याचे दु:ख अधिक आहे.. की ’न सांगता’ गेला याचे ? काळजात जपलेल्या नात्यात फ़सवणुकीचे दु:ख नेहमी काळीज चरचरुन झोंबते…… !
समीरचा प्रवास.. बाहेरपासून आतपर्यंत कसा होतो ते बघण्यासारखे आहे. खरे तर कळून घेण्यासारखे आहे.
समीरचे काम मदन देवधर याने सुंदर केले आहे.
सिनेमात हे दोघे मावसभाऊ.. त्यांच्या अनुषंगाने येणा-या त्यांच्या आया.. म्हणजे बहिणी.. ते ज्या निमित्ताने सुट्टीत गावी भेटतात.. जिचे लग्न ठरले आहे ती मावशी.. एक ओली बाळंतीण.. एक भ्रमिष्ट आजी.. आजी आजोबा..मामा.. तो ऎकत असलेल्या वसंतराव देशपांडे यांच्या records.. त्याची खोली.. सगळाच वाडा.. समीरचे पुण्यातील राहते घर.. त्याचा जिना.. विशिष्ट झाडे.. सगळी पात्रेच आहेत. अगदी संवादात येणारा पण न दिसणारा तित्तिर पक्षी सुध्दा..
विहिर.. हे या सिनेमाचे नाव. त्यातील एक प्रमुख पात्र.. त्या विहिरीत ते दोघे पोहोतात. आणि त्याच विहीरीत नचिकेतचा मृत्यू होतो.. तिच्याच काठावर समीरला नचिकेत नंतरही एकदा बसलेला दिसतो.. विहीरीचे प्रतीक आयुष्याला दिले असावे का ? तेही असेच गूढ, काळोखे, तर कधी.. उबदार.. जीवन म्हणजे पाणी देणारे असे असते.. ?
यात फ़णस हा एक symbol म्हणून येतो.. समीरच्या पत्रात.. नंतर दोन वेळा.. मला त्याचा अर्थ उमगला नाही.
या सिनेमाचे background music.. आणि cinematography उत्कॄष्ट आहे.. या साठी तो थिएटर मध्येच पाहावा लागेल. प्रत्येक frame मनात ठसतेच.. त्यासाठी सिनेमा परत पाहावा असे वाटले.
सिनेमाच्या मध्यंतरात खुद्द Big B चे दर्शन घडले. नंतर गिरीश आणि उमेश कुलकर्णी यांना भेटता आले. (श्रेय माझा मित्र हर्षद..) त्यांना मी एकच सांगितले.. की एकदा बघून सिनेमा सगळा कळला असे वाटत नाही. तो परत पाहावा लागेल.
मात्र कोणतेही एक conclusion काढता येत नाही. सिनेमातून वेगवेगळे आपल्या मनाला पटतील असे अनेक अर्थ निघू शकतात.. ’आणि ते सुखाने नांदू लागले’.. असा शेवट अपेक्षित असणा-यांना हा सिनेमा आवडणार नाही कदाचित.. !! पण एकूण मनावर नंतर सिनेमाचा effect राहतो.. त्यावर आपण विचार व चर्चा करतो हेच त्याचे यश असते. तसे विहीरचे आहे.