झाडे गदगदा हलविणारा वनघोर पाऊस
थेंबांचा अपार उत्सव मनस्वी पानापानातून
फ़ांद्यांच्या हिरव्या जत्रेत गरगरणारे बिलोरी पाळणे
आत्मा पिसा-याहून फ़ुलवणारा मुक्त मनमोर पाऊस
पाऊस असित्वाचा कळण्याहून अपरंपार
अनादिमल्हार : कंठाला जन्म देणारा पाऊस
वाटांचे आलाप क्षितिजाच्या समेवर कोसळताना
धुंवाधार बरसणारा आनंदअनावर पाऊस
हजार तंबो-यांची षड्जगाज झोकणारा अवलिया पाऊस
गोरखनाथाच्या हाकेसारखा अलखनिरंजन पाऊस
हाक ऎकून नकळत उठून चालू लागतो आपण
दुर्लघ्य पहाडापल्याडच्या निर्विकल्पात असा पाऊस
मंगेश पाडगावकर.