Wednesday, February 18, 2009

The Red Balloon




पाय-या उतरुन शाळेत निघालेला एक चिमुरडा. त्याला अचानक एक मोठा लाल फ़ुगा दिसतो.. आता उरलेल्या चित्रपटात प्रत्येक फ़्रेम मध्ये तो लाल फ़ुगा आहे. हलकेच तो टांगलेला फ़ुगा सोडवून घेतो व पुढे निघतो. काही क्षणांतच लक्षात येते की त्या फ़ुग्याला त्याचे स्वत:चे मन व इच्छाशक्ती आहे. आता पास्कल (चिमुरड्याचे नाव.. ) जाईल तिकडे फ़ुगा जातो. घरात स्थान मिळत नाही तर रात्रभर पास्कलच्या बेडरुमबाहेर लटकत राहातो. शाळेत, दुकानात, बाजारात तो सतत पास्कलच्या अवतीभवती असतो.
लवकरच गावातील टारगट मुलांना या फ़ुग्याबद्दल कळते. एका गल्लीच्या टोकाशी ती दबा धरुन बसतात. पास्कल व त्यांची पळापळ होते. यात ती मुले तो फ़ुगा कसा हस्तगत करतात ती ट्रिक बघताना मजा येते व दु:खही होते. अखेर ब-याच झटापटीनंतर ती मुले लाल फ़ुगा हस्तगत करतात. एकजण गलोलीने तो फ़ुगा फ़ोडतो.. फ़ुगा लहान होत जातो.
एक नवल घडते.. शहरात त्या क्षणी जिथे जिथे फ़ुगे असतात ते आपापल्या ठिकाणाहून निघून पास्कलपाशी पोहोचतात.. चित्रपटाच्या शेवटी पास्कल त्या फ़ुग्यांना धरुन हवेत तरंगतो आहे.
सुखाच्या फ़ुग्यांच्या मागे लागणे सोडले तर आपोआप अनेक सुखे आपल्याला येऊन बिलगतात असे त्या क्षणी मला वाटले. कारण पास्कल सोबत मी ही तरंगत होते.
15, Park Avenue हा सिनेमा पाहून आम्ही जे कोणी सोबत होतो त्यांचे शेवटच्या दॄश्याबद्दल काय मत आहे ? असा नंतर परतताना विषय झाला. तसे Red Balloon चे आहे. त्याच्यातली प्रतीके, शेवट यावरुन अनेक अर्थ निघतील.
तर असा हा The Red Balloon.. अवघ्या ३४ मिनिटांचा खिळवून ठेवणारा हा चित्रपट. ही कथा पूर्वी वाचली होती पण सिनेमा हे माध्यम कसे परिणामकारक आहे ते परत एकदा जाणविले. Albert Lamorisse या फ़्रेंच दिग्दर्शकाचा हा १९५६ मधील सिनेमा. त्यांना याचे Oscar ही मिळाले आहे. पास्कल हा या दिग्दर्शकाचाच मुलगा. यात संवाद नाहीत. फ़क्त background music.. पण पास्कलची निरागसता, शाळेतील शिक्षकांचा उग्रपणा व शिस्त, टारगट मुलांचा मस्तीखोरपणा सुरेख चित्रित झाला आहे.
चिमुरड्या पास्कलसोबत लाल फ़ुग्यासारखा मीही प्रवास केला. तो जे काही जग त्याच्या नजरेतून पहातो ते मलाही अनुभवायला मिळाले. पास्कलच्या घरातील लोक त्याला तो फ़ुगा आत आणून देत नाहीत तेव्हा, रोजच्या सकाळमधला कुत्र्याचे पिल्लू आणून देत नाहीत म्हणून नाराज होणाराचिंटू समोर आला.
गल्लीच्या तोंडाशी दबा धरुन बसलेल्या त्या कार्ट्याची भीती व राग असे एकाचवेळी मनात आले. Khalid Hussaini च्या The kite runner मधला पतंगामागे धावणारा हसन आठवला. कथेत साधर्म्य काही नाही. पण जिवाच्या आकांताने धावणा-या त्या चिमुकल्यांमध्ये नक्कीच एक समान धागा आहे.
लाल फ़ुगा पाहाताना एक गोष्ट अजून आठवली. या चित्रपटात फ़ुग्याचा लाल रंग प्रत्येक फ़्रेममध्ये प्रकर्षाने उठून दिसतो असे बाकीचे रंग राखी, फ़िके निळे आहेत. तसेच speilberg च्या schindler’s list मध्ये तीन प्रसंग रंगीत आहेत. सुरुवात, शेवट व एक लहान मुलीचा लाल फ़्रॉक आहे. चित्रपट black and white आहे. पण त्या मुलीचा लाल फ़्रॉक दोन वेळा दिसतो. प्रथम तो लाल फ़्रॉक दिसतो तेव्हा का ते कळत नाही. पण दुस-या वेळी तो प्रेतांच्या ढिगा-यात दिसतो.. आणि प्रातिनिधिक तत्वावर असे हजारो लाखो मुलांचे बळी गेलेत हे सूचित करतो.
लहान मुलांच्या निरागस दॄष्टिकोनातून एक फ़ुगा, त्याबरोबरची गंमत अनुभवणे मात्र मला नाही जमले. Charlie Chaplin चे चित्रपट लहानपणी बघताना हसू यायचे तसे आता येत नाही.. त्यामागचे हसरे दु:ख जाणवत राहते तसे काहीसे..

7 comments:

Amritorupa Kanjilal said...

hello nilambari. i don't understand your language, but your blog is very beautiful!

रोहन... said...

सुंदर .. मस्तच वर्णन केल आहे ... मला जमल तर हा सिनेमा मी नक्की बघेन ... !

Ruminations and Musings said...

@ Little Girl Lost : It's indeed very interesting to know that my blog is beautiful.. Thanks..

@ Rohan, I can share the CD with you, if u are interested.

Tulip said...

निलांबरी तुझ्या ब्लॉगवर आत्ता अचानकच पोचले हरेकृष्णजींच्या ब्लॉगवरच्या लिन्कवरुन. काहीच पोस्ट्स वाचली आत्ता पण आधी कां वाचला गेला नव्हता हा ब्लॉग याचं आता आश्चर्य आणि वाईट वाटतय. छानच लिहिते आहेस. खरंतर काही पोस्ट्सवर सविस्तर कमेन्ट टाकाविशी वाटतेय पण आत्ता वेळ नाहीय नेमका तेव्हा परत कधीतरी.
लिहित रहा.

Ruminations and Musings said...

@Tulip, Thanks a lot.. I mean it.

HAREKRISHNAJI said...

मस्त लिहीले आहेत. पहायलाच हवा

HAREKRISHNAJI said...

nothig new ?