Monday, August 16, 2010

Wild Strawberries – Ingmar Bergman
Wild Strawberries – Ingmar Bergman

या सिनेमाचा गुलजार यांच्या मौसमवर बराच प्रभाव आहे असे ऎकून माहिती होते. हे Wild Strawberries चे आकर्षण असण्याचे पहिले कारण. सिनेमा स्वीडीश दिग्दर्शक Ingmar Bergman चा आहे जो Autumn Sonata, Scenes from a marriage मुळे माहिती होता.

Wild Strawberries ची कथा बर्गमनने हॉस्पिटलमधे असताना लिहिली. ’स्व’ चा व माणुसकीचा घेतलेला शोध यामुळे बर्गमनचा हा सर्वात भावुक, सकारात्मक व आणि उत्कृष्ट सिनेमा समजला जातो. यातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे इझाक बोर्गची. इझाकला सभोवताली घडणा-या गोष्टींचे मानसशास्त्राच्या दॄष्टिकोनातून आकलन होऊ शकते अशी देणगी लाभलेली आहे.

’इझाक बोर्ग’ हा ७५ वर्षांचा एक डॉक्टर आहे. त्याची पत्नी मरण पावलेली आहे. सून मुलाबरोबर झालेल्या मतभेदांमुळे त्याच्यासोबत राहाते व त्याची आई ९५ वर्षांची आहे. लुंड विद्यापीठातून त्याने त्याची डिग्री मिळवलेली आहे. आता त्या विद्यापीठाने त्याच्या विज्ञान व मानवजातीच्या भल्यासाठी केलेल्या कार्याचा एक पदक देऊन विशेष गौरव करण्यासाठी त्याला बोलावले आहे. Stockholm ते लुंड असा ४०० मॆलांचा प्रवास तो या सिनेमात स्वत:च्या सुनेबरोबर करतो. या प्रवासात तो स्वत:च्या पूर्वायुष्यात डोकावतो. त्या भूतकाळातील आठवणींचा प्रवास त्याला घडतो. चित्रविचित्र स्वप्ने पडतात.निरनिराळे लोक भेटतात. त्याचा एकटेपणा व एकाकीपणा त्याला स्वत:च्या आईमधे व मुलामधे आहे असेही जाणविते.अखेरीस तो स्वत:चा भूतकाळ, वर्तमानकाळ व लवकरच येऊ घातलेला मृत्यू स्वीकारतो. अशी काहीशी स्थूलमानाने कथा.

सिनेमात मानसशास्त्रीय बारकावे मात्र असंख्य सापडतात. यातील स्वप्नदॄश्यांसाठी हा सिनेमा फ़ार गाजला. सिनेमाच्या सुरुवातीलाच इझाकला एक स्वप्न पडते.

अज्ञात ठिकाणी तो उभा आहे. जिवंतपणाचा आजूबाजूला लवलेश नाही. तो रस्त्यावरच्या एका घड्याळाकडे पाहातो.. त्या घड्याळाला काटेच नाहीत. मग तो खिशातून एक घड्याळ काढतो… त्यालाही काटे नाहीत. काटे नसलेले घड्याळ म्हणजे काळ पुढे जात नाही.. तो थांबलेला आहे. अशी अवस्था उदभवते याची एकच शक्यता – म्रूत्यू.. गोंधळलेल्या इझाकला लांबवर एक पाठमोरा माणूस दिसतो. त्याला स्पर्श केल्यावर तो सामोरा येतो.. तर त्याचा चेहरा असंख्य bandages ने भरुन गेला आहे. जो ओळखणे शक्यच नाही. त्याचे डोके अचानक धडापासून तुटते व रक्ताचे ओहोळ वाहतात. तेवढ्यात चर्चच्या घंटेचे आवाज ऎकू येतात व दोन घोडे एक शववाहिका घेऊन येतात. गाडीवानाचा पत्ता नाहीच. मग ती गाडी दिव्याच्या खांबाला अडकते. एक चाक तुटते. गाडी निघून जाते व त्यातील प्रेत बाहेर येते.. ज्यात इझाक ला स्वत:चाच चेहरा दिसतो. इथे तो स्वप्नातून जागा होतो.

जागा झाल्यावर तो प्रथम काय करतो तर लुंडला जाण्याचा मार्ग बदलतो. मुलगा त्याची जिथे वाट पाहाणार आहे ते सोडून थेट लुंडला जायचे ठरवतो. दिसलेल्या मृत्यूला हुलकावणी देण्याचा तो प्रयत्न करतो आहे का ? Freud च्या ट्रेन चुकली आहे अशा स्वप्नाचा जो अर्थ आहे तोच यात येतो. म्रुत्यू येणार आहे तेव्हा आपण तिथे नसावेच (ट्रेन चुकावी) अशी इच्छा असलेले स्वप्न.

मरियान , इझाकची सून त्याच्यासोबत प्रवासाला निघते. आयुष्यात पहिली २० वर्षे उन्हाळी सुट्ट्या जिथे घालवल्या त्याच ठिकाणी तो वाटेत थांबतो. सगळे मिळून ती दहा भावंडे असतात पण आता तो एकटाच उरला आहे. मरियानला या सगळ्या जुन्या आठवणी सांगाव्याशा त्याला वाटतात. पण तिला त्यात रस नाही. मग तो एका strawberry च्या झुडुपांपाशी बसून जुने दॄश्य आठवतो.. (मौसम मधील झाडाआडून स्वत:च्या जुन्या दिवसांकडे पाहाणारा संजीवकुमार.)

त्याला आता दिसतो आहे तो इझाकच्या वडिलांचा वाढदिवस आहे तो दिवस.. त्याला त्याची दूरची बहीण सारा strawberry वेचताना दिसते. ते एकमेकांच्या प्रेमात आहेत. एकमेकांशी लग्न करणार आहेत. तेवढ्यात त्याला त्याचा भाऊ सिगफ़्रिड दिसतो.. जो सारावर बळजबरी करतो आहे. इझाक यात दुबळा पडतो. व सिगफ़्रिड आपल्या कार्यात यशस्वी होतो.

पुढच्या प्रसंगात हे सगळे पाहिल्याचे इझाकच्या वडिलांना दोन जुळ्या बहिणी सांगतात. सारा रडत रडत आत जाते व एका नातेवाईक स्त्रीसोबत बोलते. ती म्हणते की इझाक शांत, दयाळू वृत्तीचा असला तरी सिगफ़्रिड आक्रमक, exciting आहे. एका लहान मुलापेक्षा ती पुरूषाला हो म्हणणे पसंत करेल.

या प्रसंगाचे दोन अर्थ एक, इझाक (Issac) हा बायबल मधे साधा, समजूतदार आहे तर अब्राहम (येथे सिगफ़िड) आक्रमक आहे. दुसरा म्हणजे आत्ताचा इझाक हा संशयी, स्वार्थी आहे. जो एकेकाळी संवेदनाशील तरुण होता. जणू काही आता त्याने स्वार्थी, दुष्ट अशा सिगफ़्रिडचे रुप घेतले आहे.. (transformation)..आणि तो साराला म्हणतो आहे की तुला जसा हवा होता तशा प्रकारचा पुरुष मी बनलो आहे. तो जणू सूड घेतो आहे.. पण असे सूडाचे प्रकार व्यक्तिमत्व दुभंगतात. माणूस नंतर स्वत:चाच द्वेष करू शकतो.

आता वाटेत त्याला परत एक सारा भेटते. एक तरुण, नटखट पोरगी.ती इझाकला म्हणते की सारा आणि इझाक असे जोडपे होते ना ? तो म्हणतो नाही.. जोडपे होते ते अब्राहम आणि सारा. (सारा ही इझाक ची आई.) सारा त्याला सांगत रहाते की तिच्यासोबत असलेल्या दोन तरुणांपॆकी एकजण स्वप्नाळू आणि आदर्शवादी आहे तर दुसरा तडफ़दार आणि व्यवहारचतुर आहे.. ती दुस-याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करते आहे. परत एकदा सिगफ़्रिड, इझाक द्वंद्व या रुपात दिसते.

नंतरच्या एका प्रसंगात ते इझाकच्या वयोवृध्द आईला भेटायला जातात. आई मरियानला इझाकची बायकोच समजते. ती मरियानला सांगते की मला दहा मुले होती आता इझाक एकटाच उरला आहे.. (इझाकचे वडिल, सिगफ़्रिड असे त्याचे प्रतिस्पर्धी नाहीसे झालेत..आणि आता या अर्थहीन आयुष्यात तो एकटाच उरला आहे.) आई तिच्याकडच्या जुन्या वस्तूंमधून एक मनगटी घड्याळ काढते व सांगते की ते ती सिगफ़िडच्या मुलाला देणार आहे जो आता ५० वर्षांचा होईल. ते तेच काटे नसलेले (इझाकला स्वप्नात दिसलेले) घड्याळ आहे.

यानंतर इझाकला परत एकदा स्वप्न दिसते..

ज्यात सारा strawbetrry पाशी आहे. व ती इझाकला दूषण देते आहे. ती म्हणते की तू लवकरच मरशील इतका म्हातारा आहेस व मला तर अजून सगळे आयुष्य पडले आहे…मी जाते. मला सिगफ़्रिडच्या मुलाची काळजी घ्यायला हवी. यानंतर त्याला सिगफ़्रिड व सारा आनंदात पियानो वाजवताना दिसतात. अचानक दिवे जातात. व एक माणूस लांबलचक passage मधून इझाकला घेऊन जातो. तो एक patient तपासायला सांगतो. पण इझाकला निदान करता येत नाही. मग तो माणूस त्याला याबद्दल क्षमा मागायला सांगतो. इझाक ती मागतोही.. मग त्याला एका स्त्री रुग्णाचे निदान करायला सांगतात. तो म्हणतो पण ती तर मेलेली आहे. मग ती स्त्री (त्याची बायको) हसायला लागते. तो माणूस म्हणतो तुझ्यावर स्वार्थी, दुस-याचा विचार न करणारा असे गुन्हे दाखल केले आहेत. (अर्थातच त्याच्या बायकोने) पण ती तर मेली आहे. असे इझाक म्हणतो.

पण तो माणूस त्याला भूतकाळ समोर आणायला लावतो. इझाक ची बायको व्यभिचार करते. ती क्षमा मागते तेव्हा इझाक म्हणतो त्यात क्षमा करण्यासारखे काय आहे ? त्याच्या या दयाळूपणानेच ती हळूहळू मरत जाते.( एखाद्या गुन्ह्याची शिक्षा मिळावी, त्यातूनच त्याचे क्षालन होईल अशी मानवी मनाची प्रवृत्ती असते.. )

इझाक विचारतो याला आता शिक्षा काय? तो माणूस म्हणतो.. नेहमीचीच. एकांतवास..(मृत्यू ?)

इथे इझाक स्वप्नातून जागा होतो. तो मरियानला म्हणतो की जागेपणी स्वत:पाशी ज्या गोष्टी तो सांगू शकत नाही त्या त्याला स्वप्नात दिसतात. मुख्य म्हणजे जिवंत असताना आपला मृत्यू झाला आहे अशी कल्पनादेखील तो करु शकत नाही. मरियान म्हणते की तिचा नवरा (इझाकचा मुलगा) देखील असेच म्हणतो. तो फ़क्त ३८ वर्षांचा असला तरी तो म्हातारा होऊन मेला आहे असे त्याला भास होतात.

मरियानचे नव-याशी भांडण मूल होण्यावरुन आहे. तिला ते हवे आहे आणि त्याला अर्थातच नको आहे. एका दु:खी जोडप्याचे आपण नको असलेले मूल आहोत आणि तसेच सगळे एकाकी, वॆफ़ल्यग्रस्त आयुष्य अजून एका मुलाला आपण देऊ नये असे त्याला वाटत असते.

सिनेमाच्या शेवटी इझाकला ते पदक मिळते.

त्यानंतर तो दोन चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो. त्यातील एक म्हणजे मुलाला त्याने दिलेले कर्ज तो माफ़ करायची इच्छा व्यक्त करतो. पण मुलगा ते करु देत नाही. मागे जाऊन भूतकाळ कधीच बदलता येत नाही. त्याला साराचा आवाज ऎकू येतो.. “इझाक, सर्व strawberries संपल्या आहेत.” भूतकाळातील रम्य आठवणी आणि काहीसा पश्चात्ताप मनात घेऊन इझाक झोपी जातो. एक दिवस संपतो आणि सिनेमाही..

काळ कोणासाठीच कधी थांबत नाही हे अटळ सत्य या सिनेमात सतत सांगितले आहे. काळ आपल्यावर हुकुमत गाजवत रहातो.. बालपणी आपल्याला अधिकार नसतात, म्हातारपणी संधी मिळत नाही. हा सिनेमा पाहून सुधीर मोघेची कविता अपरिहार्यपणे आठवते.

मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा ?

मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले
मन ऩक्षत्रांचे रान अवकाशी अवतरलेले
मन रानभूल मन चकवा

मन काळोखाची गुंफ़ा मन तेजाचे राऊळ
मन सॆतानाचा हात मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा ?

चेहरा मोहरा याचा कधी कुणी पाहिला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही याच्याविण दुसरा नाही
या अनोळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा ?

2 comments:

Raj said...

सुरेख. लेख आवडला.
मौसमची ही प्रेरणा आहे हे माहित नव्हते. गुलझारचे विशेष म्हणजे त्याने प्रेरणा घेतली तरी कलाकृतीला त्याचा खास टच असतोच. बर्गमनचे फारसे चित्रपट पाहिलेले नाहीत, सेवन्थ सील मात्र अंगावर काटा आणणारा.

Ruminations and Musings said...

मौसमचे काही थोड्या बाबतीत साम्य आहे.. विशेषत: भूतकाळाचे चित्रिकरण.. Thanks for promptly reading.. Its a bit lengthy article.