Friday, December 11, 2009

शाहरुख खान – dish tv adoption ad आणि कलिंगड..





शाहरुख च्या dish tv च्या जाहिराती मला फ़ारशा कधीच आवडल्या नाहीत.. परवा मात्र चक्क एक अतिशय हृदयस्पर्शी जाहिरात पाहायला मिळाली..

http://www.youtube.com/watch?v=a7AJj5aDhXc

एका अनाथाश्रमातून ते दोघे एक मुलगी adopt करतात.. तिने त्यांच्या घरात रूळावे, आनंदाने राहावे म्हणून आटोकाट प्रयत्न करतात. जरा नाराज होऊनच आईवडिल झोपतात… तोच त्यांना त्या मुलीचे खळखळून हसणे ऎकून जाग येते. मुलगी dish tv वर कार्टून बघून हसते आहे.. आईवडिल ते बघून अगदी भारावून जातात.. आधी मूल झाले नाही म्ह्णून घेतलेला adoption चा निर्णय तोही ’मुलगी’ adopt करण्याचा.. त्यात आता घरात आलेल्या मुलाने आनंदात राहावे अशी इच्छा.. ते जमत नाही याचे वॆफ़ल्य.. आणि ते मूल हसल्यावर.. होणारा आनंद.. ४५ सेकंदाच्या जाहिरातीत इतके काही कळत जाते की बस.. प्रसून जोशी व अनुराग बसू यासारखी नावे यामागे आहेत.. शाहरुखचा जमलेला अभिनय आहे.. जाहिरात बघून ती परत कधी लागेल याची अनेक वर्षांनी वाट पाहिली यात सगळे आले.

आता या topic चा उत्तरार्ध ’कलिंगड’..

गौरी देशपांडे च्या आहे हे असं आहे मध्ये कलिंगड नावाची एक कथा आहे. साधारण या जाहिरातीसारखीच..

एक मुलगी adopt केलेली.. ती मुलगी घरात अगदी शहाण्यासारखी वागते.. एका उन्हाळ्यात तिला आणतात.. पुढ्च्या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत मुलगी रूळते.. पण एकूण ऋणानुबंध जुळत नाहीत.. एकदा मायलेकी कलिंगड खरेदी करायला जातात.. मग त्या विचारतात.. गोड आहे ना रे बाबा.. प्रश्नोत्तरात फ़ळ्वाला म्हणतो.. “मी काय आत शिरुन पाहिलंय?”

मुलीला एकदम हसू येते.. ती म्हणते काय मजा ना.. आत शिरुन कलिंगडात राहायचं.. सगळीकडून गार गोड..

आणि मग एकदम आईला आपले लहानपण आठवते.. त्यांचे जिवाभावाचे मॆत्र त्या कलिंगडात राहायच्या विचाराने एकदम जुळते.. (कथा मुळातूनच वाचायला हवी !! )
जाहिरातीच्या निमित्ताने परत एकदा हे सगळे आठवले.. आठवणी सुध्दा कशा कुठे पोहोचतील याचा काय नेम ?

Friday, November 20, 2009

This world's a fiction and is made up of contradiction




जमाना बदल रहा हॆ….

१. कमीने : प्रियांका व शाहिद.. एका camp साठी गेलेले.. रात्री तो गडबडीत condom शोधतो आहे.. तिला वेळ नाही.. ती सांगते मला home science माहिती आहे.. safe व unsafe दिवस कळतात मला…यात त्यांचे लग्न झालेले नाही हाही एक मुद्दा आहे..
माझ्या एका वयाने जरा senior मित्राला फ़ोनवर हा dialogue या चित्रपटात आहे असे सांगितले तर त्याचा अर्थातच विश्वास बसला नाही..
२. wake up sid :
a. मी कलकत्त्याहून मुंबईला आले ते स्वत:चे घर असावे, स्वत:चे पॆसे मिळवावेत या हेतूने.. I want to become independent.. असे कोंकणा सेन (चित्रपटात आयेषा).. सांगते.
केवळ लग्न होऊनच मुली घर सोडतात या आपल्या समाजातील समजुतीला छेद देणारे हा संवाद..

b. याच चित्रपटात रणबीर कपूर - सिध्दार्थ – सिद घर सोडतो व चक्क आयेषा कडे येऊन विचारतो.. मी तुझ्या घरात राहू शकतो का ?
आसरा मागायचा स्त्रीने व द्यायचा पुरुषाने या अजून एका समजुतीला छेद देणारा हा संवाद..

३. सकाळ वर्तमानपत्र : दि. २०/११/२००९ पुरूषांना पाककलेचे धडे देणा-या मेघा गोखले यांच्यावरचा लेख.. त्यांनी जितक्या पुरूषांना ही कला शिकवली आहे ते सर्वजण आपापल्या किचनमध्ये त्याचा वापर करतात.. असे एक वाक्य आवर्जून लिहिले होते..
यावर विशेष काही लिहावं याची गरज नाही.. इतका तो लेख बोलका आहे..


क्या जमाना सचमुच बदल रहा हॆ ?

१. ओळखीची एक काम करणारी मुलगी. भरपूर खर्च करुन आईवडिलांनी लग्न करुन दिलेले… सासू रोजच्या लागणा-या (साबण वगॆरे) गोष्टी कपाटात ठेवते.. व ही ते जुमानत नाही म्हणून नवरा मारतो.. ती pregnant असताना..
२. अजून एक उदाहरण.. सासूला toliet sense असून वृध्दापकाळाने ती जायचा कंटाळा करते.. व सर्व आवरावे अशी सुनेकडून अपेक्षा.. न केल्यास नवरा मारहाण करतो..
३. सकाळ मधीलच एक बातमी : ४५ व्या वर्षी मूल झाले .. तेव्हाच त्या माणसाच्या मुलीला मुलगा झाला.. त्याची लाज वाटून स्वत:च्या नवजात मुलाला फ़ेकून दिले..

रोजच असे विरोधाभास असलेले अनेक प्रसंग दिसतात.. मनात कल्लोळ उमटतो.. !!

Thursday, November 5, 2009

इसे रिश्तोंका इल्जाम ना दो..




नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
सा-याच चांदण्यांची जगतास जाग नाही..

या ओळी आठवाव्यात असे अनेक फ़ोन.. फ़क्त फ़ोन मॆत्री..

तो.. एक कलंदर माणूस …असावा.. ! भेटलो नाही कधी.. बोलतो फ़क्त.. आणि ते सुध्दा या जगातले असते असे नाही..

फ़ोन नं १ : वेळ : साधारण रात्री ११ ते २ च्या दरम्यान कोणतीही.. आणि फ़ोन कानाशी लागल्यावर ऎकू येते ती गिटार..मग गझल.. “आज जाने की जिद ना करो.. युंही पहलूमें बॆठे रहो.. “.. फ़ोनचे कारण काय तर एक विशिष्ट जागा फ़क्त female voice मध्येच चांगली वाटते. ती तेवढी तिने म्हणावी… मग तिने ती ऎकवली की आता एकदम फ़ार उशीर झाला आहे.. तू झोप आता.. आणि फ़ोन बंद..

फ़ोन नं २ : ती एका मित्राकडे.. काहीतरी गप्पा चालल्या आहेत. फ़ोन वाजतो.. आणि फ़ोनचे कारण काय तर.. त्याने एक फ़ुलपाखरु पाहिलेले व तिची आठवण आलेली.. ते सांगणे अपरिहार्य.. हो वेळ अगदी सभ्य…दुपारचे दोन.. (for a change)..

फ़ोन नं ३ : वेळ रात्री ९ ..ती drive करते आहे.. फ़ोन वाजतो.. ती अर्थातच घेत नाही. मग सिग्नलला फ़ोन पाहाते.. त्याचा दिसतो.. ती जरा पुढे जाऊन गाडी कडेला घेते.. व त्याला फ़ोन लावते.. गाडीत गाणे ’न जाने क्यूं’ मग फ़ोन सुरु झाल्यावर गप्पा फ़क्त सलील चौधरी..

फ़ोन नं ४: वेळ त्याच्या दॄष्टीने योग्य म्हणजे रात्रीचे १ किंवा दोन.. तो गोव्यात.. त्याला एक music album चे शूटींग आहे.. आणि बरेच दिवस लांबले होते.. ते काम आता चालू झाले आहे.. हे सांगण्यासाठी .. सोबतीला गिटार व हरिहरनचे.. “जब भी मिलते हो .. मुस्कुराते हो.. इतनी खुषियॉ कहांसे लाते हो.. “..

असे अनेक फ़ोन.. सुरुवातीला इतक्या रात्री उशीरा फ़ोन वगॆरे विचार होतेच.. पण हळूहळू ते मनाला कळले.. की ही फ़ोन मॆत्री.. बाकीच्या आयुष्यातील सुख दु:खांचा इथे विचार नाही.. हे एक असे पण नाते..

Thursday, October 1, 2009

गाण्यांच्या गोष्टी.. ऋतू हिरवा..




काल श्रीधर फ़डके, आरती अंकलीकर व मधुरा दातार यांच्या ऋतू हिरवा या कार्यक्रमाला जायचा योग आला. सकाळ माध्यम प्रायोजक होते. सिध्दी गार्डन येथे सुरेख मंडप उभारलेला आहे. आसनव्यवस्था उत्तम केलेली आहे.

जय शारदे वागीश्वरी ने सुरुवात झाली.

स्पर्शातूनी तव देवते साकार ही रुचिराकृती
शास्त्रे तुला वश सर्वही विद्या कला वा संस्कृती..
लावण्य काही आगळे भरले दिसे विश्वांतरी

हे मूळ रेकॉर्ड मध्ये नसलेले कडवे या कार्यक्रमात श्रीधरजींकडून ऎकायला मिळाले. ऋतू हिरवा या अल्बम च्या अनेक आठवणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऎकायला मिळाल्या. स्वत: संगीतकाराकडून त्या ऎकायला मिळणे हे भाग्यच..

ऋतू हिरवा हे गाणे श्रीधरजींनी आशा भोसले यांना ऎकविले. व त्यावर त्या म्हणाल्या ’मी करेन हे गाणे’.. आणि त्यानंतर एक वर्षभर त्या या अल्बम साठी वेळ देऊ शकल्या नाहीत. मग एक दिवस त्या श्रीधरजींना म्हणाल्या ..की हे गाणे फ़ार अवघड आहे. जे कोणी हे गाणे कार्यक्रमात गातात..त्यांना हा किस्सा ऎकून धन्य वाटेल. काल मधुरा दातार ने हे अप्रतिम सादर केले.

घनरानी.. या गाण्याची आधी चाल सुचली. ती श्रीधरजींनी शांताबाईंना ऎकविली. त्यावर त्यांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये गाणे लिहून दिले. मधुरा दातार ने हे गाणे काल ऎकविलेच.. पण नंतर चाल कशी बांधली हे सांगताना चालीतले व शब्दोच्चारातले अनेक बारकावे श्रीधरजींनी ऎकविले.

फ़ुलले रे क्षण हे गाणे नितीन आखवे यांनी १६ वेळा लिहिल्याची कथाही ऎकायला मिळाले.. आपण perfectionist आहोत त्यामुळे कवींना फ़ार त्रास देतो असे काल श्रीधर फ़डके यांनी सांगितले.


सांज ये गोकुळी मधील आशा भोसले यांनी recording च्या वेळेला किती वेगवेगळ्या जागा घेतल्या याचेही सादरीकरण काल ऎकायला मिळाले. आपल्या सर्व गाण्यांचे श्रेय त्यांनी कवींना व गायक / गायिकांना आहे हे अतिशय नम्रपणे अनेक वेळा सांगितले.

हे गगना हे कुसुमाग्रजांचे गाणे.. याची शब्दरचना अतिशय उत्तम आहे..

हे गगना..
तू माझ्या गावी आणि तिच्याही गावी
तुला उदारा पहिल्यापासून सर्व कहाणी ठावी..

याला अगदी चपखल चाल आहे. आणि गीतरामायणात जसे सीता व राम यांच्या गाण्यात रामाचा उल्लेख प्रसंगाप्रमाणे करते (मज आणून द्या तो हरीण अयोध्यानाथा, थांबला कशास्तव धनुर्धरा हो आता.... किंवा जेथे राघव तेथे सीता या गाण्यात जानकीनाथा.. असे प्रसंगानुरुप उल्लेख आहेत..) तसे या गाण्यात पुढे

घन केसांतूनी तिच्या अनंता फ़िरवीत वत्सल हात.. अशी एक ओळ आहे.

यात गगना, उदारा, अनंता असे आकाशाला निरनिराळे समर्पक शब्द वापरले आहेत. असो..

अशा अनेक गाण्यांच्या गोष्टी काल ऎकायला मिळाल्या. आरती अंकलीकर यांनी गगना गंध आला, होऊनी मी जवळ येते, तेजोमय नादब्रम्ह.. नवीन ’सुर वरदा रामा’ यातील ’ताने स्वर रंगवावा’ आणि अर्थातच.. मी राधिका, मी प्रेमिका उत्तम सादर केले.

मन कशात लागत नाही
अदमास कशाचा घ्यावा
अज्ञात झ-यावर रात्री
मज ऎकू येतो पावा..

या ओळी ग्रेस यांच्या.. त्यांना श्रीधरजींनी चाल बांधली. पण पुढची कविता कळत नसताना पुढे चाल बांधणे त्यांना पसंत नव्हते. ( perfectionist चा हा अर्थ आहे.. कवितेला चाल लावणे.. व एक उत्तम गाणे तयार करणे यात फ़रक आहे.. असे काल त्यांनी स्वत:च सांगितले.)

मग सुधीर मोघे यांनी त्या चालीवर
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा.. असे शब्द लिहून दिले..

दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा.. या ओळी फ़ार अस्वस्थ करतात नेहमीच. तसे कालही झाले.

या गाण्यांच्या गोष्टी चालत राहातील.. आत्ता थांबते आहे.

Monday, August 31, 2009

इतनीसी बात..

माणसाचा खरा चेहरा दिसतो तो आपण ज्यांना आपल्याहून कमी दर्जाचे समजतो त्यांच्याशी वागताना. काटेकोरपणे सामाजिक रीतीरिवाज सांभाळणारे लोक… आपल्या driver किंवा घरकाम करणा-या नोकरांशी कसे वागतात ते कधीतरी एखाद्या क्षणी दिसते मग गंमत वाटते..

मला लालजी आठवला. परदेशात असताना माझ्या office मध्ये तो office boy होता. आम्ही दोघेही भारतीय असल्याने माझ्याशी त्याच्या गावाकडच्या गोष्टी सांगायच्या. राजस्थानात कुठेतरी त्याचे गाव होते. सुखदु:खे सांगायला व आपल्या भाषेत बोलायला जीव व्याकुळ झाल्यावर काय होते त्याचा अनुभव दोघांचा सारखाच..

Office मध्ये coffee प्यायला मी माझ्या आवडीचा नाजूक फ़ुलाफ़ुलांचा एक मोठा थोरला मग आणला होता. लालजी त्यातून मला coffee आणून द्यायचा..

एक दिवस अक्षरश: थरथरत तो आला व मला म्हणाला.. madam तुमचा कप फ़ुटला चुकून माझ्या हातून.. मी अर्थातच सहजपणे म्हणाले.. त्यात काय.. आणेन की नवीन..

मी रागावले देखील नाही याचे त्याला आश्चर्य वाटले आणि मी इतक्या क्षुल्लक गोष्टीवरुन त्याला रागावेन अशी त्याने अपेक्षा धरावी याची मला लाज वाटली. कमला या सिनेमात कमलाला मालकीण वर सोफ़्यावर बसायला सांगते व तिला ते शक्य होत नाही.. अशा गोष्टींमुळे मनाला कायमचे चरे पडतात…

Wednesday, July 1, 2009

कला की कलाकार

मायकेल जॅक्सन हा विषय आता प्रसिध्दीमाध्यमांना कित्येक वर्षे पुरुन उरेल. त्याच्या आकस्मिक मृत्यूनंतर मनात कला की कलाकार हा विचार परत एकदा आला.

मध्यंतरी गौरी देशपांडे या orkut community ची विंचुर्णीला ट्रीप गेली होती. तेव्हा मी गेले नाही. मनात येत होते की गौरीचे लेखन, त्यातले विचार आवडतात. म्हणून तिच्या घरी, तिच्या वस्तू बघायला जाणे, त्यांचा संग्रह करणे.. आणि त्याचे अवडंबर माजविणे बरोबर आहे का ?

कोणत्याही कलाकाराची कला थोर की तो कलाकार ? शेवटी तो एक माणूस असतो. हे विसरले जाते. व कलाकाराच्या व्यक्तिगत जीवनात जास्त डोकावले जाते. त्याने / तिने कसे वागावे हे समाज (म्हणजे आपणच) ठरवायला लागतो. आणि मग त्याच्या कलेवर कधी कधी अन्याय होतो.

मायकेल जॅक्सन ला १३ grammy award मिळाली यात त्याचे कलाकार म्हणून मोठेपण सिध्द झाले. बाकी तो व्यक्ती म्हणून काय होता यावर चर्वितचर्वण करुन काय साधणार आहे ?

अनेक ठिकाणी मला त्याच्याबद्दल ’कितीही controversy असली तरी तो कलाकार म्हणून निर्विवादपणे थोर होता’ अशा अर्थाच्या comments आढळल्या आणि खूप बरे वाटले…

Monday, April 27, 2009

संगीत कार्यशाळा – भारत गायन समाज

श्रीधर फ़डके वरील कार्यशाळा सध्या घेत आहेत. काल या कार्यक्रमाला जायचा योग आला.

संगीत कार्यशाळा याबद्दल माझे मत फ़ारसे अनुकूल नव्हते. चार पाच दिवसात कोणतीही कला अशी घाईघाईत पी हळद व हो गोरी style ने नाही जमत.
पण काल श्रीधरजींनी तीन गाणी तीन तासात शिकवली. व स्टेजवर त्यातील लोकांना गायला सांगितली.

केवळ तासभर शिकवल्यावर विद्यार्थ्यांनी ती सुरेख गायली. त्यातून त्या मुलांची तयारी किती आहे त्याचबरोबर श्रीधरजी किती उत्तम पध्दतीने शिकवतात या दोन्हीचा अनुभव आला. गाण्याचे कार्यक्रम आपण अनेकदा ऎकतो. पण संगीतकाराच्या मनात असलेली चाल तो गायकाकडून कशी गाऊन घेत असेल याचे कुतूहल होते. ते काही अंशाने कमी झाले. बारीकसारीक जागा, ताल, लय, सगळे एकेका टप्प्यात श्रीधरजी सांगत होते. फ़ुलले मधील ’फ़ु’ –हस्व आहे तो तसाच यायला हवा.. इतके बारकावे सुध्दा त्यात आले.

काही मुलामुलींना ती गाणी मराठीत असल्याने लिहून घेताना त्रास होत होता कारण शिक्षणाचे माध्यम इंग्रजी..

एकूण सगळ्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता.

काल शिकवलेली गाणी.

१. दे साद दे हृदया
२. कलिका, कशा गं बाई फ़ुलल्या
३. अकार, उकार, मकार..

Wednesday, March 18, 2009

Casablanca… २




Ask your wife.. या प्रश्नानंतर लाझ्लोला रिक इल्साच्या आयुष्यात आला होता हे कळल्यावर तो फ़क्त इतकेच म्हणतो.. I know how it is to be lonely.. नात्यातील विश्वास व्यक्त करणारा हा प्रसंग व संवाद आहे. या चित्रपटातील प्रेमत्रिकोणात नात्यांमधला एकमेकांबद्दलचा आदर, विश्वास हा पाया फ़ार महत्वाचा आहे.

लाझ्लोकडून हे कळल्यावर इल्सा परत रिकला एकटी भेटायला जाते.. तो नकार देतो तेव्हा पिस्तूल ही काढते. रिक शांतपणे म्हणतो.. if victor is the cause of this, then shoot me..

आता ती कोसळते. रिकवरच्या आजही जिवंत असलेल्या आपल्या प्रेमाची तिला जाणीव होते. रिकबरोबर पॅरिसमध्ये असताना नाझींपासून असलेल्या धोक्यामुळे तिला व्हिक्टरसोबत झालेल्या लग्नाबद्दल बोलता येत नाही. व्हिक्टर लाझ्लो मरण पावल्याचे तिला कळलेले असते. पण जेव्हा रिक व इल्सा पॅरिस सोडून निघून जाणार असतात तेव्हा व्हिक्टर लाझ्लो जिवंत असल्याचे कळते.. त्याला सोडून ती रिकसोबत जाऊ शकत नाही.

रिक आता परत भेटल्यावर त्याच्यावरच्या प्रेमाची तिला जाणीव होते. व्हिक्टर ने एकट्याने अमेरिकेला जावे व त्याच्या व्हिसासाठी व पुढील कामासाठी त्याने व्हिक्टरला मदत करावी असे ती रिकला सुचविते. I ran away once, I can’t do it again, Oh, I don't know what's right any longer. You have to think for both of us. For all of us. असे ती रिकला म्हणते.

फ़ार मोठी जबाबदारी रिकच्या खांद्यावर येऊन पडते. प्रेमातील एक उंची या सिनेमात यानंतर गाठली गेली आहे. आपल्या प्रियकर / प्रेयसीचे आयुष्य आपल्या हातात आहे.. ते त्याने / तिने आनंदाने सोपविले आहे. या जबाबदारीचे काय करायचे याचे उत्कॄष्ट उत्तर हा सीन देतो.

यानंतर रिक शांतपणे इल्सा व व्हिक्टर या दोघांची अमेरिकेला जाण्याची व्यवस्था करतो. विमानतळावर पोहोचेपर्यंत इल्साला याची कल्पना नाही. व्हिक्टर सामानाची व्यवस्था पाहाण्यासाठी गेलेला असताना अचानक रिक रेनॉला व्हिसावर मिस्टर व मिसेस लाझ्लो अशी दोन नावे टाकायला सांगतो. इल्सा चमकते.. रिक तिने व्हिक्टरसोबत जाणे कसे योग्य आहे ते पटवून देत असतो.. व्हिक्टर जवळ येतो.. तसा तो अचानक म्हणतो.. He is looking at you, kid..

रिक व्हिक्टर लाझ्लोला आदल्या रात्री इल्सा आली होती.. व तुमच्या दोघांच्या येथून जाण्यासाठी तिने आपल्यावर प्रेमाचे नाटक सुध्दा केले असे सर्व सांगतो. त्यांच्या पुढील आयुष्यात रिकच्या निमित्ताने कसलेही किल्मिष राहू नये याची तो काळजी घेत असतो.

चित्रपटाच्या शेवटी.. भरल्या डोळ्यांनी रिकचा निरोप घेऊन इल्सा जाते.. तेव्हाही व्हिक्टर तिला एकदा विचारतो.. Are you ready ? प्रश्न फ़ार सूचक आहे.

यानंतर एक छोटासा प्रसंग आहे. रिक व रेनॉ जोडीने चालले आहेत. व रिक म्हणतो.. Louis,I think this is a beginning of a beautiful friendhsip.. फ़्रान्स व अमेरिकेचे पुढील नाते यात सूचकतेने व्यक्त केले आहे.

’ज्यामुळे हे श्वास घेणे सार्थकी वाटायचे’ .. असा माणूस तिघांनाही भेटला आहे.. असा प्रेमत्रिकोण दाखविणारा हा एकमेव चित्रपट असावा.

-----------------------------------------------------------------------------------

यातील As time goes by हे सुरेख गाणे..

You must remember this
A kiss is just a kiss, a sigh is just a sigh.
The fundamental things apply
As time goes by.
And when two lovers woo
They still say, "I love you."
On that you can rely
No matter what the future brings
As time goes by.
Moonlight and love songs
Never out of date.
Hearts full of passion
Jealousy and hate.
Woman needs man
And man must have his mate
That no one can deny.
It's still the same old story
A fight for love and glory
A case of do or die.
The world will always welcome lovers
As time goes by.
Oh yes, the world will always welcome lovers
As time goes by.

Everybody comes to Rick’s या नाटकावर casablanca आधारित आहे त्यातून हे गाणे घेतले आहे. डूली विल्सन या नटाने सॅमचे काम केलेय व हे गाणे त्यानेच गायले आहे.

Tuesday, March 17, 2009

Casablanca… १




फ़्रेंच मोरोक्कोमधील एक ठिकाण.. या पलीकडे या स्थानाची महत्त्वाची ओळख म्हणजे Casablanca हा चित्रपट.. तीन ऑस्कर मिळवणारा… अजूनही (१९४२ साली प्रदर्शित झालेला आहे.. हे लक्षात घेतले तर अजूनही याचा नीट अर्थ कळतो.) top 100 मधे असलेला casablanca.. बराक ओबामा आवडण्या-न आवडण्याची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतील. पण त्यांच्या आवडत्या चित्रपटांमध्ये casablanca आहे हे वाचून माणूस आपल्या जातीचा वाटला हे नक्की..

तर casablanca..

म्हणजे रिक, इल्सा.. Humphrey Bogart and Ingrid Bergman….
म्हणजे As time goes by हे चिरतरुण गाणं….
म्हणजे here’s looking at you ‘kid’ यात प्रेयसीच्या आयुष्यात father figure मिळवणा-या प्रियकराचा संवाद.. स्त्रिया कायम आपल्या partner मध्ये एक father figure शोधतात याचा विचार करता.. casablanca मध्ये सुरुवातीला प्रेमाच्या संवादात असणारे हे वाक्य (here’s looking at you ‘kid’) सिनेमाच्या शेवटी He is looking at you Kid असे रिक इल्साला लाझ्लोबद्दल म्हणतो तेव्हा थरकाप होतो.. त्याने आता तिच्या बाबतीत.. father figure भूमिका घेतली व निभावली आहे हे कळणारे ते वाक्य..

Casablanca मध्ये रिक व इल्सा सतत शब्दांपलीकडे बोलत असतात. त्यांच्या डोळ्यातून, थरथरणा-या ओठातून.. प्रत्येक हावभावातून between the lines असे संवाद सतत ऎकू येत असतात.. नुसत्या प्रेमभ-या कटाक्षाने रिकवर चे तिचे प्रेम अनेक प्रसंगात व्यक्त होते. (त्या दोघांच्या पॅरिसमधील प्रेम दॄश्यात ते गाडीतून फ़िरत असताना.. ते खूप जाणविते.. आणि मला यह क्या कर डाला तूने असे म्हणणारी मधुबाला आठवते..)

तसाच सॅम व रिक यांचा एक प्रसंग.. सगळे बार मधून गेल्यावर सॅम आहे.. संध्याकाळी इल्सा येऊन गेली आहे.. रिकला दारु पिणं आवरतं घेण्याबद्दल तो सांगतो आहे. रिकच्या काळजातली जखम आज खपली निघून वाहते आहे.. भूतकाळ विसरायला आज दारु नाही पुरत.. व इल्सा आणि रिक यांच्या प्रेमकहाणीचा एकमेव साक्षीदार आहे सॅम.. तो थांबला आहे.. तो सॅमला ते गाणं म्हणायला सांगतो. व अचानक इल्सा आल्यावर तो मागच्या पावली जातो.. (याच दॄश्यावर देवआनंद चं ’दिन ढल जाये’ सुरु होतं.. त्याचा सहाय्यक मणी त्याच सॅमच्या रोलमध्ये आहे.. त्यातही वहिदा आल्यावर मणी मागच्या पावली निघून जातो.. दारुची बाटली ही तशीच.. गाईड आपल्या जागी एका उंचीवर आहे पण casablanca ची सर नाही..)

तर अशा या चित्रपटाची थोडक्यात कथा म्हणजे..

१९४१ मधले casablanca.. नाझींच्या छळातून सुटका करुन अमेरिकेकडे जाऊ इच्छिणा-यांची काशी म्हणजे casablanca.. नाझींचा दबाव असला तरी राज्यकर्ते फ़्रेंच आहेत.. वातावरण दहशत, संशयाचे, असुरक्षित आहे. (पहिल्या काही दॄश्यात हे नीट clear होत जातं)..

’रिक्स अमेरिकन कॅफ़े’ यात महत्वाची भूमिका निभावत असतो. रिक त्याचा मालक आहे.. विक्षिप्त आहे. त्याचा मित्र आहे फ़्रेंच पोलिस अधिकारी रेनॉ..

युरोपियन चळवळीतील एक नेता लाझ्लो नाझी concentration camp मधून सुटका करुन घेऊन आपल्या बायकोसोबत अमेरिकेचा व्हिसा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे असे रिक ला कळते. अनेक लोक रिककडे त्याच कामासाठी येत असतात. त्यात एक मजेशीर संवाद आहे..

Captain Renault: Rick, there are many exit visas sold in this café, but we know that *you've* never sold one. That is the reason we permit you to remain open.
Rick: Oh? I thought it was because I let you win at roulette.
Captain Renault: That is *another* reason

तर लाझ्लो व इल्सा येतात.. ( Ingrid Bergman च्या entry मध्ये ती इतकी त्या रोलला perfect दिसते.. सुंदर, graceful, लाझ्लोचा आदर करणारी, तिच्या दिसण्या-बोलण्या-चालण्यातून ते सर्व झळकतं).. इल्सा सॅमकडे पाहाते.. व मनात काहीतरी हूरहूर दाटून येते.. ते आपल्याला कळतं.. )

इल्सा सॅमला ते गाण वाजवायला सांगते.. as time goes by.. रिक ओरडतच येतो.. हे गाणं वाजवायला बंदी आहे ना ? सॅम फ़क्त इल्साकडे कटाक्ष टाकतो. बस्…

इल्सा ही रिकची आधीची प्रेयसी.. दोघे पॅरिस सोडून सोबत जाणार असतात.. आणाभाका, शपथा होतात. पण ऎनवेळी रेल्वे स्टेशनवर येते ती सॅममार्फ़त तिची चिठ्ठी.. पावसाचे पाणी पडून पत्रातली अक्षरे पुसट होत जातात.. व रिकचे हदय पिळवटत जाते.. तो एकदम एका क्षणी कोरडाठक्क होतो.. दर्द न होना ही सबसे बडा दर्द होता हॆ हे वाक्य रिकच्या संदर्भात या सिनेमात अनेकदा आठवते.

इल्सा त्याच रात्री परत येते. रिक जीवघेणे बोलून तिला घायाळ करतो. ती निघून जाते. दुस-या दिवशी मार्केट मध्ये रिक तिचा अनुनय करण्याचा प्रयत्न करतो.. त्याचे रात्री चुकले असे त्याला कळते.

लाझ्लोला दोन व्हिसा रिककडे असल्याचे कळते व तो त्यासाठी रिकला भेटायला जातो. रिक नाही म्हणतो.. व शेवटी कारण विचारल्यावर म्हणतो.. ask your wife..

Wednesday, February 18, 2009

The Red Balloon




पाय-या उतरुन शाळेत निघालेला एक चिमुरडा. त्याला अचानक एक मोठा लाल फ़ुगा दिसतो.. आता उरलेल्या चित्रपटात प्रत्येक फ़्रेम मध्ये तो लाल फ़ुगा आहे. हलकेच तो टांगलेला फ़ुगा सोडवून घेतो व पुढे निघतो. काही क्षणांतच लक्षात येते की त्या फ़ुग्याला त्याचे स्वत:चे मन व इच्छाशक्ती आहे. आता पास्कल (चिमुरड्याचे नाव.. ) जाईल तिकडे फ़ुगा जातो. घरात स्थान मिळत नाही तर रात्रभर पास्कलच्या बेडरुमबाहेर लटकत राहातो. शाळेत, दुकानात, बाजारात तो सतत पास्कलच्या अवतीभवती असतो.
लवकरच गावातील टारगट मुलांना या फ़ुग्याबद्दल कळते. एका गल्लीच्या टोकाशी ती दबा धरुन बसतात. पास्कल व त्यांची पळापळ होते. यात ती मुले तो फ़ुगा कसा हस्तगत करतात ती ट्रिक बघताना मजा येते व दु:खही होते. अखेर ब-याच झटापटीनंतर ती मुले लाल फ़ुगा हस्तगत करतात. एकजण गलोलीने तो फ़ुगा फ़ोडतो.. फ़ुगा लहान होत जातो.
एक नवल घडते.. शहरात त्या क्षणी जिथे जिथे फ़ुगे असतात ते आपापल्या ठिकाणाहून निघून पास्कलपाशी पोहोचतात.. चित्रपटाच्या शेवटी पास्कल त्या फ़ुग्यांना धरुन हवेत तरंगतो आहे.
सुखाच्या फ़ुग्यांच्या मागे लागणे सोडले तर आपोआप अनेक सुखे आपल्याला येऊन बिलगतात असे त्या क्षणी मला वाटले. कारण पास्कल सोबत मी ही तरंगत होते.
15, Park Avenue हा सिनेमा पाहून आम्ही जे कोणी सोबत होतो त्यांचे शेवटच्या दॄश्याबद्दल काय मत आहे ? असा नंतर परतताना विषय झाला. तसे Red Balloon चे आहे. त्याच्यातली प्रतीके, शेवट यावरुन अनेक अर्थ निघतील.
तर असा हा The Red Balloon.. अवघ्या ३४ मिनिटांचा खिळवून ठेवणारा हा चित्रपट. ही कथा पूर्वी वाचली होती पण सिनेमा हे माध्यम कसे परिणामकारक आहे ते परत एकदा जाणविले. Albert Lamorisse या फ़्रेंच दिग्दर्शकाचा हा १९५६ मधील सिनेमा. त्यांना याचे Oscar ही मिळाले आहे. पास्कल हा या दिग्दर्शकाचाच मुलगा. यात संवाद नाहीत. फ़क्त background music.. पण पास्कलची निरागसता, शाळेतील शिक्षकांचा उग्रपणा व शिस्त, टारगट मुलांचा मस्तीखोरपणा सुरेख चित्रित झाला आहे.
चिमुरड्या पास्कलसोबत लाल फ़ुग्यासारखा मीही प्रवास केला. तो जे काही जग त्याच्या नजरेतून पहातो ते मलाही अनुभवायला मिळाले. पास्कलच्या घरातील लोक त्याला तो फ़ुगा आत आणून देत नाहीत तेव्हा, रोजच्या सकाळमधला कुत्र्याचे पिल्लू आणून देत नाहीत म्हणून नाराज होणाराचिंटू समोर आला.
गल्लीच्या तोंडाशी दबा धरुन बसलेल्या त्या कार्ट्याची भीती व राग असे एकाचवेळी मनात आले. Khalid Hussaini च्या The kite runner मधला पतंगामागे धावणारा हसन आठवला. कथेत साधर्म्य काही नाही. पण जिवाच्या आकांताने धावणा-या त्या चिमुकल्यांमध्ये नक्कीच एक समान धागा आहे.
लाल फ़ुगा पाहाताना एक गोष्ट अजून आठवली. या चित्रपटात फ़ुग्याचा लाल रंग प्रत्येक फ़्रेममध्ये प्रकर्षाने उठून दिसतो असे बाकीचे रंग राखी, फ़िके निळे आहेत. तसेच speilberg च्या schindler’s list मध्ये तीन प्रसंग रंगीत आहेत. सुरुवात, शेवट व एक लहान मुलीचा लाल फ़्रॉक आहे. चित्रपट black and white आहे. पण त्या मुलीचा लाल फ़्रॉक दोन वेळा दिसतो. प्रथम तो लाल फ़्रॉक दिसतो तेव्हा का ते कळत नाही. पण दुस-या वेळी तो प्रेतांच्या ढिगा-यात दिसतो.. आणि प्रातिनिधिक तत्वावर असे हजारो लाखो मुलांचे बळी गेलेत हे सूचित करतो.
लहान मुलांच्या निरागस दॄष्टिकोनातून एक फ़ुगा, त्याबरोबरची गंमत अनुभवणे मात्र मला नाही जमले. Charlie Chaplin चे चित्रपट लहानपणी बघताना हसू यायचे तसे आता येत नाही.. त्यामागचे हसरे दु:ख जाणवत राहते तसे काहीसे..

Thursday, February 12, 2009

परिचय..

म्हणेन ओळख झाली अपुली
परंतु परिचय झाला नाही..

कुसुमाग्रज

परिचय चित्रपटात प्राण शेवटी जितेंद्रला म्हणतो की ’तुमने मेरे बच्चोंसे मेरा परिचय करा दिया’ .. तेव्हा प्रत्येकवेळी सिनेमा बघताना अपरिहार्यपणे कुसुमाग्रजांच्या या वरच्या ओळी आठवतात.

परिचय हा सिनेमा लहानपणी कसा पाहिला याची माझ्यापाशी एक मजेदार आठवण आहे. माझी आई व आत्या मधूनमधून आम्हा भावंडांना माझ्या वडिलांपाशी ठेवून सिनेमाला जात असत. मला एकदा त्यांच्या बेताचा सुगावा लागला. मग रडून ओरडून गोंधळ घातला व त्या दोघी मला सिनेमाला घेऊन गेल्या. त्या वयात लक्षात राहिलेल्या दोन गोष्टी एक म्हणजे कासवाच्या पाठीवर मेणबत्ती लावलेला तो सीन व सा रे के सारे हे गाणे ..

पुढे अनेक वर्षांनी sound of music पाहिला. त्यातले सेट म्हणे अजूनही ज्या देशांमध्ये shoot झाले (Austria) येथे जपून ठेवले आहेत.

तर परिचय.. नुकतेच विजय पाडळकर यांचे गुलजार च्या सिनेमांवर ’गंगा आये कहां से’ हे पुस्तक आणले. त्यात या सिनेमाबद्दल फ़ार सुंदर लिहिले आहे. एका ठिकाणी ते म्हणतात..

माणसामाणसातील नाती का तुटतात या प्रश्नाकडे गुलजारांचे मन सतत वळत राहिले आहे. आयुष्यभर अव्याहतपणे ते या प्रश्नाचे उत्तर शोधत राहिले आहेत. त्यांच्या जवळजवळ सा-या चित्रपटांत तुटलेल्या नात्यांचे व त्यांना पुन्हा जुळवू पाहाणा-या माणसांच्या धडपडीचे चित्रण आढळते. शेवटी माणसाला काय महत्वाचे वाटते ? प्रेम की जीवनातले आदर्श ? सहजीवन महत्वाचे वाटते की व्यक्तिनिष्ठ मार्गावरुन एकाकी चालत राहणे ? निवड माणसाच्या हातात असते आणि नसतेदेखील, प्रत्येकाला आपला मार्ग हीच योग्य दिशा वाटते, आणि मग अपरिहार्यपणे माणसामाणसांत अंतर पडत जाते.
सर्व प्रकारच्या नात्यांमध्ये हे किती खरे आहे याची प्रचीती रोजच्या आयुष्यात आपल्याला येतच असते. वॆयक्तिक किंवा professional नात्यांनाही हे लागू होते. एखादा client, सहकारी, नातेवाईक, साधा रोजचा भाजीवाला व त्याच्याशी होणारी घासाघीस..जिथे कुठे बोलण्यात stretch येतो तिथे हे लक्षात येते की प्रत्येकाला आपला मार्ग बरोबर वाटतो. व त्यातून अंतर निर्माण होते.

परिचय चित्रपटाबद्दल मला जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे.. गुलजार यांचा देहबोलीचा अभ्यास.. जया भादुरी जेव्हा कधी प्राणच्या समोर येते तेव्हा ती हाताची नखे खाताना दिसते. कारण Nail biting हे shyness, stressful situation, nervousness बरोबर निगडित आहे. आणि प्राणचे व जयाचे नाते या सिनेमात सुरूवातीला तरी त्याच प्रकारचे आहे. गुलजार यांच्या सिनेमातले असे बारकावे मन वेधून घेतात.

परिचय या चित्रपटाशी लहानपणापासून ओळख होती पण त्याच्याशी परिचय विजय पाडळकर यांच्या पुस्तकाने करुन दिला.

Wednesday, January 14, 2009

slumdog millionaire, उत्खनन व गुलजार..

१. slumdog millionaire
काल slumdog millionaire पाहिला. अभिताभ बच्चनची craze, अनाथ मुलांना भिकारी बनविणा-या टोळ्या, वेश्यावस्ती, call center, KBC चा सेट, पोलिसांचे interrogation, लहान मुलांचे भावविश्व, गुंडगिरी, धर्मभेदावरुन होणा-या दंगली या व अशा असंख्य विषयांना हा सिनेमा स्पर्श करतो. पण तो फ़ारसा melodramatic होत नाही कारण अतिशय वेगाने घडणा-या घटना. चित्रपट पाहाताना आपण पुढे काय घडेल याची सतत धडधडत्या अंत:करणाने वाट पाहातो. नेहमीच्या हिंदी सिनेमाच्या पठडीतले आपल्या अपेक्षेप्रमाणे (शेवटची दहा मिनिटे सोडून .. ) काही घडत नाही. त्यामुळे चित्रपट बघताना त्या त्या व्यक्तिरेखे सोबत आपण जीवनाची वाट चालत असतो. नंतर विचार करायला लागल्यावर विविध विषय जाणवायला लागतात.

सर्व कलाकारांची कामे चांगली झाली आहेत. हिरोच्या भूमिकेतील देव पटेल चे सर्वात जास्त. हट्टी (Stubborn) भाव, जे हवे ते मिळवणारच असा एक निश्चय त्याच्या चेह-यावर सतत आहेत. मला त्यामानाने हिरॉइनचे काम त्या उंचीला पोहोचले नाही असे वाटले. अनिल कपूर त्याच्या भूमिकेत योग्य. इरफ़ान खानचे acting मला आवडते. पण मकबूलची उंची गाठणारा अभिनय यात फ़िका वाटतो. किंवा तो आता साचेबंद झाला आहे, असेही एकीकडे वाटले.

सिनेमाचे दिग्दर्शक Danny Boyle and Loveleen Tondon. विकास स्वरुप यांच्या Q&A या मूळ कथेवर Simon Beafoy यांनी पटकथा लिहिली आहे. A.R.Rehman यांना यासाठी golden globe मिळाले आहे. जय हो हे गाणे मस्त.

सिनेमा मला आवडला. पण काही प्रश्न मनात उभे राहिलेच.

२, गुलजार

जरा सी पीठ नंगी होती,
फ़टे हुए होते उसके कपडे,
लबों के गर प्यास की रेत होती
और एक दो दिन का फ़ाका होता

लबों पे सूखी हुइ सी पपडी
जरा सी तुमने जो छीली होती
तो खून का एक दाग होता..

तो फ़िर ये तस्वीर बिक ही जाती.

निरनिराळे आंतरराष्ट्रीय awards मिळणा-या केवळ सिनेमांबद्दलच नाही तर इतर पुरस्कारांबद्दलही (अरविंद अडिगा यांचे बुकर, टोनी मॉरिसन यांचे नोबेल इ.) हेच गणित मांडले जाते का ? हा प्रश्न पडतो.

३. उत्खनन – गौरी देशपांडे

उत्खनन या गौरी देशपांडेच्या कादंबरीत तुरूंगातील, वेड्यांच्या इस्पितळातील माणसं, फ़ूटपाथवर जगणारे भिकारी अपंग अशांच्या चित्राबद्दल ती म्हणते..

“जाता जाता त्यांना बघणं, डोक्यातल्या विचारांना त्यांचं अस्तित्व जाणवणं, आणि खुद्द जवळून, त्यांचा वास येईल इतक्या निकट जाऊन त्यांच्या आयुष्याला, मनाला, दु:खाला आपल्या आयुष्यावर आक्रमण करुन देणं, या पार वेगवेगळ्या गोष्टी आहेत.”

ती चित्रे काढणारा पुढे म्हणतो..

“स्वत:च्या आयुष्यातल्या ’नॉर्मल’ दु:खात गुंतून पडलेल्यांना अशा कुणाची दु:खं जाणवून द्यावी, हाच हेतू आहे या चित्रांचा’

slumdog millionaire सारखे चित्रपट बघून नॉर्मल दु:खात (कामाची बाई आली नाही, मोबाईलचे बिल वेळेवर भरले नाही, home loan EMI वाढला इ..) बुडालेल्या आपणही ते बघणं, त्यातील प्रश्नांसाठी मनात हळहळणं यापलीकडे काय करणार आहोत ? नेहमी असं काही घडलं, वाचलं, ऎकलं, पाहिलं की काय करतो ?

Friday, January 9, 2009

Cyrano De Berjerac .. राव जगदेव मार्तंड आणि.. जीवनाच्या पाकळीवर असीमपणे विलसणारं प्रेम..



फ़्रेंच आर्मीतील एक सरदार सिरॅनो हा , आक्रमक वृत्तीचा पण हरहुन्नरी आहे. त्याचे वॆशिष्ट्य म्हणजे तो एक, दॆवदत्त देणगी असलेला, भाषा ज्यावर प्रसन्न आहे असा कवी व संगीतकार आहे. पण.. पण त्याचे नाक जरा वाजवीपेक्षा जास्त लांब आहे. त्याला inferioity complex असण्याला लांबलचक नाक हे मोठे कारण आहे. यामुळेच तो त्याची दूरची नातेवाईक Roxane – जी अतिशय देखणी आहे, हिच्यावर असलेले प्रेम व्यक्त करायला घाबरतो आहे. त्याला वाटत असते की तो कुरुप असल्यामुळे तिच्या किंवा कोणत्याच स्त्रीच्या प्रेमाला पात्र नाही.

१. नाटक १६४० च्या काळातील पॅरिसमध्ये एका थिएटरमध्ये सुरु होते. पॅरिसमधील विविध स्तरांवरचे लोक तेथे जमलेले आहेत.
Christian हा सरदार आपल्या Lignière या मित्राबरोबर आलेला आहे. Christian चेही Roxane वर प्रेम आहे तिला Lignière ओळखतो. Lignière दुस-याच एका सरदाराचा (De Guiche) Roxane हिच्याशी लग्न करण्याचा मनसुबा तेथे उघड करतो. Lignière तेथून निघून गेल्यावार Christian याला Lignière ला मारण्याचा कट कळतो व त्याला तशी कल्पना देण्यासाठी तोही जातो.
इतर तीन सरदार सिरॅनोची वाट पाहात असतात. कारण आत्ता स्टेजवर चाललेल्या नाटकात जो नायक आहे (Montfleury) त्याला सिरॅनोने मागच्या महिन्यात हरविले आहे.
या सगळ्या गदारोळात सिरॅनो प्रवेश करतो. थिएटरच्या मालकाला त्याचे बुडालेले पॆसे देतो. स्टेजवरील नटाला आव्हान देतो.. लोक जायला लागतात. तर तिथल्या तिथे Montfleury बरोबर तलवारबाजी करत एक काव्य रचतो. त्याचे तलवारीचे हात व काव्यपंक्ती या हातात हात घालून जातात.
गर्दी कमी होत जाते. सिरॅनो एका सरदारापाशी आपले Roxane वरचे प्रेम कबूल करतो. तेवढ्यात तिची एक दासी येऊन सिरॅनोला Roxane ला तुला एकांतात भेटायचे आहे असा निरोप देते. दुसरा एक सरदार येऊन सिरॅनोच्या परतीच्या वाटेवर शंभर एक लोक त्याला मारायला टपले आहेत असा निरोप देतो. आता Roxane च्या निरोपामुळे अंगावर मूठभर मांस चढलेला सिरॅनो त्या सगळ्यांना एकट्याने तोंड द्यायचे ठरवतो.
२. दुस-या दिवशीची सकाळ. एक बेकरी. तिचा मालक आपल्या cooks ना घेऊन येतो. सिरॅनो येतो. त्याच्या Roxane च्या भेटीविषयी अर्थातच तो फ़ार फ़ार उत्सुक आहे. सिरॅनो Roxane ला आपले तिच्यावरचे गहिरे प्रेम व्यक्त करणारे एक लांबलचक पत्र लिहितो. आणि Roxane आल्यावर बेकरीच्या मालकाला आपल्याला एकांत मिळावा यासाठी तिथून निघून जाण्यासाठी खूण करतो. Roxane त्याच्याशी बोलता बोलता आद्ल्या दिवशीच्या शंभर लोकांबरोबरच्या चकमकीत जखमी झालेल्या त्याच्या हाताला bandage करते. आणि.. तिचे Christian वरचे प्रेम सिरॅनोला सांगते. Christian ज्या सॆनिकांसोबत आहे त्यांच्यामुळे तिला त्याच्या सुरक्षिततेची काळजी वाटत असते. ती सिरॅनोला त्याच्याशी मॆत्री करुन Christian चे रक्षण करण्याची गळ घालते. सिरॅनो या प्रस्तावाला होकार देतो. सिरॅनोचा captain तेवढ्यात येऊन आदल्या दिवशीच्या लढाईत जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन करतो. त्याच्यामागे सॆनिकांचा एक घोळका आहे ज्यात Christian सुध्दा असतो. Christian नवीन असल्याने त्याला कालच्या लढाईची कथा सांगावी असा काहीजण आग्रह धरतात. Christian अनेकदा सिरॅनोच्या नाकाचा उल्लेख करुन त्यात लुडबूड करतो. अखेरीस सिरॅनो चिडतो.. गर्दी पांगते. व Christian आणि सिरॅनो एकमेकांचे मित्र बनतात. सिरॅनो Christian ला Roxane त्याच्याकडून एका प्रेमपत्राची अपेक्षा करते आहे असे सांगतो. Roxane गडबडतो व अशा बाबतीत आपल्याला गती नाही असे जाहीर करतो. सिरॅनो स्वत:च लिहून ठेवलेले पत्र त्याला देतो. Christian व सिरॅनो एकमेकांना मिठी मारतात ते पाहून इतर सॆनिक स्तिमितच होतात. परत त्यातील एकजण सिरॅनोच्या लांब नाकाची चेष्टा करतो व सिरॅनोकडून मार खातो.

३. काही दिवसांनंतर, Roxane च्या घराबाहेर तिच्या घरातील नोकर एकमेकांशी बोलत असतात. सिरॅनो येतो. Roxane येते ती Christian च्या लिखाणाची तारीफ़ करतच. (तिने मधल्या काळात ते पत्र वाचलेले आहे). De Guiche या सरदाराला Roxane सोबत लग्न करायचे आहे तो लढाईवर जाण्याआधी तिला भेटायला येतो व लग्नाचा प्रस्ताव मांडतो. Roxane नकार देते पण सॆनिकांनी पॅरिसमध्येच राहावे अशी विनंती करते. De Guiche जातो व सिरॅनो परत येतो. Roxane व तिची दासी जातात. सिरॅनो एकटाच उरतो. त्याला Christian ला भेटायचे आहे व काही गोष्टी शिकवायच्या आहेत. Christian येतो तो सिरॅनोला म्हणतो की Roxane चे प्रेम जिंकायला त्याला सिरॅनोच्या मदतीची गरज नाही. Roxane परत येते व तिच्या सौंदर्याचे वर्णन करायला Christian ला सांगते.. एकही शब्द त्याला सुचत नाही, हे पाहून ती निराश होते. तेवढ्यात सिरॅनो येतो व Christian त्याला मदत करायची विनंती करतो. रात्रीच्या अंधारात Roxane तिच्या बाल्क्ननीत असते.. खाली Christian व जरा लपलेला सिरॅनो.. तो एक एक वाक्य सांगतो व Christian ते Roxane ला म्हणून दाखवितो. यात हळूहळू अंधाराचा फ़ायदा घेऊन सिरॅनोच वाक्य बोलायला लागतो कारण त्याचा सांगण्याचा वेग Christian च्या वेगाशी पुरत नाही. Roxane खूष होऊन Christian चे चुंबन घेते. De Guiche कडून लग्नाचा प्रस्ताव मांडलेले एक पत्र घेऊन दूत येतो, ते पत्र घेऊन Roxane तिचे व Christian चे लग्न व्हावे असे एक नवीन पत्र ध चा मा style ने करते. Roxane च्या घरात तिचे व Christian चे लग्न लागत असताना De Guiche ला चंद्रावर स्वारी करण्याचे सात मार्ग अशी एक धमाल कथा सांगून अडवून ठेवण्याचे काम सिरॅनो करतो. या दोघांचे लग्न कळल्यावर De Guiche सर्व सॆनिकांना पॅरिसबाहेर लढाईला जायचा आदेश देतो. हताश झालेली Roxane सिरॅनोने Christian चे रक्षण करावे व Christian तिला पत्र लिहिल याची जबाबदारी घ्यावी असे सुचविते.

४. फ़्रेंच फ़ौजा स्पॅनिश फ़ौजांबरोबर लढत आहेत. Christian ची तुकडी हरते आहे व उपाशी मरते आहे. मधल्या काळात Christian च्या नावाने सिरॅनो Roxane ला रोज दोन पत्रे लिहितो व धोका पत्करुन तिच्या पर्यंत पोहोचवितो. De Guiche स्पॅनिश फ़ौजांबरोबर हात मिळवणी करुन त्यांना Christian च्या तुकडीवर हल्ला करायला सांगतो. तेवढ्यात एका घोडागाडीतून Roxane येते. स्पॅनिश लोकांच्या तावडीतून ती कशी तेथपर्यंत पोहोचली असे ती सांगत असते. तेव्हा गॆरसमज टाळ्ण्यासाठी सिरॅनो Christian ला त्याने लिहिलेल्या पत्रांबद्दल सांगतो व शेवटचे एक पत्र त्याच्याकडे देतो. Roxane ने सोबत अन्नपदार्थ आणलेले असतात ते ती त्यांना देते आणि Christian ला सांगते की त्याच्या पत्रांमुळे तिचे प्रेम शतगुणित झाले आहे. महत्वाचे म्हणजे तो कुरुप असता तरी तिने इतकेच प्रेम केले असते. हा निरोप Christian सिरॅनोला देतो.. ज्यावर त्याचा विश्वास बसत नाही. Christian सिरॅनोला पत्रे कोणी लिहीली आहेत ते मान्य करुन Roxane सोबत बोल असे सांगतो. पण तो ते सांगायच्या आधीच Christian घायाळ होऊन येतो.. Christian च्या भाषाप्रभुत्वाबद्द्ल Roxane चे विचार तसेच राहावेत यासाठी आता सिरॅनो गप्प राहाणेच स्वीकारतो. Roxane ला De Guiche व तिचा एक नोकर परत घेऊन जातात. सिरॅनो नवीन कुमक येईपर्यंत स्पॅनिश सॆनिकांना थोपविण्याच्या कामाला लागतो.

५. पंधरा वर्षांनंतर - एका चर्चमध्ये - Roxane येथे राहाते आहे. तिचा तिच्या लाडक्या Christian च्या मरणाचा शोक अजूनही चालूच आहे. तिला भेटायला तिचे नोकरचाकर, De Guiche मधूनमधून येतात. आज ती सिरॅनोची वाट पाहते आहे. तो तिला बाहेरच्या जगात काय काय घडले ते सांगतो. आज मात्र तो भयंकर जखमी झाला आहे. आता तो Roxane ला भेटायला येणार ते शेवटचेच. हे कळत असल्याने तो Roxane ला Christian ने लिहिलेले शेवटचे पत्र वाचायला सांगतो. ती ते त्याच्याच हातात देऊन त्याला वाचायला सांगते. आणि अंधारात तो ते पूर्ण पत्र वाचतो. अंधारात इतक्या सफ़ाईने त्याला पत्र वाचाताना पाहून व त्याचा आवाज ऎकून Roxane ला आता मात्र कळते की सगळ्या पत्रांचा मूळ लेखक सिरॅनो आहे…. तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा सिरॅनो मात्र त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते नाकारतो. तो मरणाच्या दारात असताना त्याचे मित्र रडत असतात व Roxane त्याच्यावर आपले प्रेम असल्याचे सांगते. त्या क्षणी तो एक काल्पनिक लढाई खेळतो.. जी symbolic आहे.. त्यात म्हणतो की मी सगळ्या लढाया हरलो.. पण एक गोष्ट मात्र त्याच्या कडे आहे.. PANACHE.

You strip from me the laurel and the rose!
Take all! Despite you there is yet one thing
I hold against you all, and when, to-night,
I enter Christ's fair courts, and, lowly bowed,
Sweep with doffed casque the heavens' threshold blue,
One thing is left, that, void of stain or smutch,
I bear away despite you.

It is

MY PANACHE.

Panache हा शब्द आज प्रचंड आत्मविश्वास किंवा Style या अर्थाने वापरतात. सिरॅनो च्या या नाटककाराने तो इंग्लिश भाषेत रूढ केला.
-------------------------------------

राव जगदेव मार्तंड नावाचे एक पुस्तक माझ्या हातात साधारण दहा वर्षांपूर्वी आले. हे मंगेश पदकी यांनी लिहिलेले एक नाटक आहे. याच्या पहिल्या प्रयोगाचा तपशील वाचताना डॉ.श्रीराम लागू व स्मिता जयकर यांनी त्यात काम केल्याचा उल्लेख आढळतो. आज हे पुस्तक माझ्याकडे नाही.लमाण या श्रीराम लागूंच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात या नाटकाचा उल्लेख आहे.

ते पुस्तक वाचून तेव्हा मी झपाटून गेले होते. मूळ फ़्रेंच नाटक cyrano de berjerac यावरुन हे मराठी नाटक लिहिले आहे. Cyrano de Bergerac नावाच्या एका ख-या पात्रावर Edmond Rostand यांनी हे नाटक लिहिलेले आहे. पाच अंकी नाटकात पहिले चार प्रवेश १६४० मध्ये घडतात तर पाचवा १६५५ मध्ये. फ़ेंच भाषेत हे नाटक फ़ार प्रसिध्द आहे यावर अनेक सिनेमे, बॅले आहेत. English आवॄत्ती वाचताना देखील मूळ नाटककाराच्या प्रतिभेचा अंदाज येतो.

Roxane च्या सौंदर्याचे वर्णन..

She's a danger mortal,
All unsuspicious--full of charms unconscious,
Like a sweet perfumed rose--a snare of nature,
Within whose petals Cupid lurks in ambush!
He who has seen her smile has known perfection,
--Instilling into trifles grace's essence,
Divinity in every careless gesture;
Not Venus' self can mount her conch blown sea-ward,
As she can step into her chaise a porteurs,
Nor Dian fleet across the woods spring-flowered,
Light as my Lady o'er the stones of Paris

किंवा चंद्रावर स्वारी करण्याचे सात मार्ग.. यात काही मार्ग असे आहेत..

First, with body naked as your hand,
Festooned about with crystal flacons, full
O' th' tears the early morning dew distils;
My body to the sun's fierce rays exposed
To let it suck me up, as 't sucks the dew!

And then, the second way,
To generate wind--for my impetus--
To rarefy air, in a cedar case,
By mirrors placed icosahedron-wise.

Sitting on an iron platform--thence
To throw a magnet in the air. This is
A method well conceived--the magnet flown,
Infallibly the iron will pursue:
Then quick! relaunch your magnet, and you thus
Can mount and mount unmeasured distances!

या नाटकाबद्दल कितीही लिहिले तरी कमीच असे मला वाटते. प्रेम त्यागात असतं असं म्हणणं आणि तसं वागणं यात एक अंतर आहे. ते या व्यक्तिरेखेत मिटलं आहे. Larger than life अशी ही एक character आहे… cyrano de berjerac…

Saturday, January 3, 2009

पंचम

याद हॆ बारिशों का दिन पंचम
जब पहाडी के नीचे की वादी में
धुंद से झांक कर निकलती हुई
रेल की पटरियां गुजरती थी

धुंद मे ऎसे लग रहे थे हम
जॆसे दो पौधे पास बॆठे हो
हम बहुत देर तक वहां बॆठे
उस मुसाफ़िर का जिक्र करते रहे
जिस को आना था पिछली शब, लेकिन
उसकी आमद का वक्त टलता रहा

देर तक पटरियों मे बॆठे हुए
ट्रेन का इंतिजार करते रहे
ट्रेन आयी, ना उसका वक्त हुआ
और तुम युंही दो कदम चल कर
धुंद पर पांव रख के चल भी दिये

मॆं अकेला हूं धुंद में पंचम

गुलजार..

आज राहुलदेव बर्मन यांना जाऊन पंधरा वर्षे झाली. त्यानिमित्ताने ही गुलजार यांची नज्म.. 'धुंद पर पांव रख कर चल भी दिये' ही ओळ जिवलगांसाठी किती खरी असते.. वाळूसारखे हातातून त्यांच्याबरोबरचे क्षण निसटून जातातच.. ती माणसेही एक दिवस धुक्यात हरवितात.. मागे उरतात त्या फ़क्त आठवणी. कलाकार मात्र त्यांच्या कलेच्या रुपात अजरामर होतात.