Tuesday, November 25, 2008

रुक्मिणी

बाई, काय पाहिलंस, कसं साहिलंस नाही विचारत
वंचनेचा चेहरा दिसतो कधी अगदी करूण आणि भोळा
पण हे उमगण्याचं सहावं इंद्रिय असतंच ना प्रत्येक शहाण्या बाईला

म्हणून विचारायचं ते नंतरच्या उलाथापालथीबद्दल
तुझ्या फ़रपटीबद्दल
सोन्याच्या दिवसांनी उचललेला मेणा तुझा
तू कशी आलीस चालत द्वारकेहून इतक्या लांब पंढरपुरात ?
कशी राहिलीस परक्या मुलुखात, भयाण अनोळखी दिंडीरवनात ?
जगण्याची ठेच अशी खाल्लीस की पावलाला रक्ताची धार लागली
अन तुझी ती हिंमत त्याने रुसवा म्हणून निकालात काढली
पुन्हा तुझ्या शेजारीच वस्ती केली त्यानं नव्यानं
तरी परतली नाहीस मुकाट त्याच्याकडे
एकटीच चूल मांडून ताठ मानेनं जगत राहिलीस
कानठळ्या बसविणारा टाळमॄदंगाचा गजर शेजारी
तो ऎकत उभा जन्म उपेक्षेनं काढणं काय असेल?
पाय दगडाचे केलेस अन ओठही दगडाचे
बाई, तुझ्या कोनाड्यात आकांताचा पोत भडकलाच नसेल?
झाकलं नाहीस तरी उघडलंही नाहीस चव्हाट्यावर
संसाराचं श्रीफ़ळ तुझ्या ओटीतून अलगद काढून घेतलं त्यानं
पण तू दळत राहिलीस तुझ्या दु:खाचा बुक्का शांतपणे
पंढरी काळीनिळी झाली त्याच्या उधळ्यानं..

अरुणा ढेरे

No comments: