Tuesday, November 25, 2008

पट्टराणी..

रुक्मिणी

पदराबरोबर प्रपंचाची प्रतिष्ठा खोचून
पट्टराणी तू वावरलीस त्याच्या राजघरात
ठेवलं नाहीस बांधून त्या राधेच्या रमणाला
भामेच्या वल्लभाला, कॄष्णेच्या केशवाला,
तुझ्या असतेपणाच्या तलम भरजरी वेढ्यात

तो पालांडून गेला असेल जेव्हा युगाच्या अवकाशातलं
वर्तमान आणि भविष्याचं विराटपण सहजपणे
तेव्हा राजवाड्याच्या भुलभुलॆय्यातली लहान लहान अंतरं
चकवे आणि तळघरं तू पार करत असशील निर्धाराने

कालयवन, जरासंध, शिशुपाल, कौरव.. दुष्टशक्तींच्या विनाशात
तो महानायक गुंतला असेल
तेव्हा तू असशील मुलाला पाजवत, निजवत, गोष्टी सांगत
बापाच्या दूर असण्यानं तो दुखावू नये म्हणून काळजी घेत
उद्याचा यदुनायक वाढवत असशील

तुझं आईपण अवघड आणि बाईपण त्याहूनही अवघड
तरी कशी सोपंच करत गेलीस तू त्याला
तुझ्या आयुष्यातून निसटून जगडव्याळ पसरत जाणं ?
कसं समजलं तुला हे अवघडातलं सोपेपण
म्हणजे स्वाभाविक जगण्यासाठी दुस-याला मोकळं करणं ?
आणि म्हणजेच संपूर्ण प्रेम करणं

अरूणा ढेरे

No comments: