रोज सकाळी ऒफ़िसला जाताना गाडी सुरू केल्यापासून ऒफ़िसमध्ये पोहोचायचा वेळ साधारणत: २५ मिनिटे. त्या पंचवीस मिनिटात निवांतपणा मिळतो आणि मनात विचारांची गर्दी होते. त्यात मनात साठणारी दॄश्ये कॅलिडोस्कोपसारखी उमटतात. लोलक फ़िरतो आणि अचानक वेगळे दॄश्य दिसते.
गेल्या आठ दिवसात कोकिळेचा आवाज ऎकू येतो. मोग-याचा वास.. कलिंगडाच्या फ़ोडी.. आंब्याची अढी.. परीक्षांच्या दिवसातील जागरणे.. रमणबागेच्या पटांगणावर बाबूजींचे रामनवमीला ऎकायला मिळणारे गीतरामायण. सारे काही क्षणार्धात जागे करण्याची किमया त्या कोकिळेच्या सुरात आहे.
जरा पुढे गेले की जे कोणते गाणे गाडीत कानावर पडते, त्या गाण्याने मन कोणत्यातरी प्रसंगात जाते. श्रीधर फ़डके यांचे ’काही बोलायाचे आहे’ हे त्यांच्या चतु:शृंगी येथील कार्यक्रमात तर ’तुला पाहिले मी’ यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ते गाणे प्रथम ऎकले त्याच्या आठवणीत नेते.
कुमार गंधर्व, पं.जसराज थेट सवाई गंधर्व संगीत महोत्सवात नेतात. एकदा पहाटेच्या सुमारास जसराज गायला बसले आणि झाकीर हुसेन यांचे आधी सोलो तबलावादन झाले होते तरी ते जसराज यांच्या साथीला अचानक आले.. ते स्टेजवर आल्यावर झालेला आनंद आणि टाळ्यांचा कडकडाट आजही मनात तसाच आहे.
रोजचा तो पंचवीस मिनिटांचा प्रवास नवीन काहीतरी शिकवून जातो. परवाच एका माणसाचा सायकलवरुन तोल गेला व त्याचा डबा पडला व सांड्ला.. तो गोळा करण्याचा त्याचा प्रयत्न चालला होता. मनात कालवाकालव झाली.
हे सगळे शब्दबध्द करण्यापलीकडे आपण काही करत नाही. मुर्दाड आहोत याची जाणीव होईपर्यंत ऒफ़िस येते आणि दिवसभराची कामे सगळे विचार मनाबाहेर घालवितात.
ओ पुणे
1 year ago
No comments:
Post a Comment