चीनमधील डोंगराळ भागातील एक गाव – शुइजियान। कोणत्याही खेडेगावासारखे नापिक जमिनीने व दारिद्र्याने गांजलेले। गावची लोकसंख्या जेमतेम हजारभर आहे। गावातले लोक मोलमजुरी करतात। मिळेल ते आणि मिळाले तर खातात, अगदीच नाही तर जवळच्या शहरात निघून जातात. मागे उरतात ती मजुरी करायला निरुपयोगी - म्हातारी माणसे व लहान मुले.
गावात म्हणायला एक प्राथमिक शाळा आहे। तुटके गळके छप्पर, मोडकळीस आलेले बाक आणि त्यासारखेच गरिबीने वॆतागलेले मास्तर। त्यांच्या चेह-यावरच्या सुरकुत्यात आणि कपाळावरच्या आठ्यात ते स्पष्ट दिसते॥ शाळेत एकच वर्ग आहे आणि सर्व इयत्तांमधील मुले पॆशाअभावी त्या एकाच वर्गात बसतात. त्यातील चार-पाच मुले मास्तरांबरोबरच राहतात. मुलांना खायला मिळायचा खर्च निघावा म्हणून मास्तर खडू सुध्दा जपून वापरतात. अक्षरे लहान काढतात. यात भर पडते ती त्यांची आई आजारी आहे म्हणून निरोप आल्यावर॥ त्यांच्या जागी शाळेतील २८ मुलांना शिकवणार कोण ? सहा सहा महिने पगार न मिळणा-या शाळेत स्वत:हून नोकरीवर कोण येणार ? त्यात कायदे कडक आहेत. बदलीचा शिक्षक आल्याशिवाय ते सुट्टीवर जाऊच शकत नाहीत.
गावचा सरपंच शेजारच्या गावातील एका १३ वर्षांच्या मुलीला तयार करतो. तिचे नाव वेई मिंजी. शिक्षक तिला पाहून चकितच होतात. वेई स्वत: माध्यमिक शाळेत गेलेली नाही. माओची स्तुती करणा-या गाण्याच्या दोन ओळी सोडल्या तर तिला फ़ारसे काही येत नाही. मात्र तिला पुस्तकातून पाहून नीट लिहिता येते. बस्.. एवढ्या पात्रतेवर शिक्षक तिला तिचे काम व २६ दिवसांचे २६ खडू देऊन निघून जातात. उन्हे वर येईपर्यंत मुलांना गुंतवून ठेवण्याचा मौलिक सल्ला मात्र तिला देतात.
वेई त्यांना विचारते की “उन पडलेच नाही तर”.. ती स्वत: किती अननुभवी आहे आणि निरागस आहे हे या प्रसंगात दिग्दर्शकाने उत्तम दाखविले आहे.
याच संभाषणात पुढे मास्तर सांगतात की ते परत येईपर्यंत एकही विद्यार्थी कमी झालेला नको.. not one less..
मिंजीचा ४० युआन पगार कोण देणार हे मात्र सरपंच व मास्तर दोघेही सांगत नाहीत. सांगतात एकच ’सर्व विद्यार्थी मास्तर सुट्टीवरुन परत येईपर्यंत टिकून राहिले तर ते १० युआन बक्षीस देतील.”
शिक्षिकेला अनुभव नाही व मुले तर मुलेच आहेत. व्रात्य आणि दंगेखोर. मिंजी त्यांनी गिरवण्यासाठी फ़ळाभरुन छोटी छोटी अक्षरे काढते व बाहेर जाऊन बसते. मोकळी सुटलेली मुले थोडाच अभ्यास करणार आहेत ? ती भांडण सुरुच करतात, वेण्या ओढणे, चिमटे काढणे सुरु. मिंजीला सांगतात.. फ़ळ्यावर लिहिलेले आम्हाला समजत नाही. ती म्हणत राहाते.. “लिहा”. (शिक्षणपध्दतीवर प्रकाश टाकणारा हा सीन आहे.) मुलांच्या दंग्यावर आणि तक्रारींवर तिच्याकडे एकच उत्तर आहे. ते म्हणजे “लिहा”.. तीही काही कमी हट्टी नाही.
झांग हुईके हा सर्वात जास्त व्रात्य मुलगा आहे. वर्गात काही चांगले विद्यार्थी आहेत. व्रात्य मुलेही मनाने चांगली आहेत. मात्र मुले सहजासहजी नवीन शिक्षिकेला स्वीकारायला तयार नाहीत. व्रात्य मुले व हट्टी शिक्षिका यांच्या भांडणात वर्गातील डुगडुगणारे टेबल पडते त्यावरचे खडूही.. खडूंवर पाय पडताच त्यांची जी काही अवस्था होते ती आधी मिंजीच्या लक्षातच येत नाही. आणि लक्षात आल्यावर तिच्या हातावर मुलांचे पाय पडत असताना ती जिवाच्या आकांताने खडू गोळा करते.
दुस-या दिवशी वर्गात परत दंगा होतो. आज कुरापती झांगने मिंगची डायरी पळवली आहे. आणि तो तिने कितीही नकार दिला तरी ती डायरी सगळ्या वर्गासमोर वाचतो आहे. आपली वॆयक्तिक डायरी वाचलेली कोणाला आवडेल ? आत्तापर्यंत लिहा हे एकच उत्तर देणारी मिंजी यावर निर्णय देते ’वाचा’
डायरीत कालच्या प्रसंगाचे वर्णन लिहिले आहे. खडू कसे तुटले ? आधीचे शिक्षक कसे खडू पुरवून वापरत. आपली शाळा किती गरीब आहे. शिक्षिका सगळ्यांना वठणीवर का आणत नाही ?
तिस-या दिवशी वेई मिंजीच्या लक्षात येते की तिचा उनाड विद्यार्थी वर्गातून गायब आहे. इतर मुलांकडून तिला कळते की तो झीमेई नावाच्या मुलीसोबत काम मिळवण्यासाठी शहरात गेला आहे. झांग हुइकेला वडिल नाहीत आणि आई फ़ार आजारी आहे. कुटुंबावर फ़ार कर्ज असल्याने हुईकेला ’असल्या’ शिक्षणापेक्षा कामातून मिळणारे पॆसे जास्त महत्वाचे आहेत. त्याची रोजगाराची गरज वगॆरे मिंजीच्या लक्षात येत नाही. तिच्या लक्षात आहे ती फ़क्त मास्तरांची धमकी.. ’एक सुध्दा कमी नको’ Not one less..
गावचा सरपंच हे सगळे झटकून देतो. आता शहरात जाऊन हुईकेला हुडकून आणण्याची जबाबदारी घ्यायला हवी. मिंजी ठरवते की तीच शहरात जाईल. शहरात जाणे तसे अवघड नव्हते. पण बसच्या तिकीटासाठी पॆसे तर लागणारच. आणि एक नाही तर तीन तिकीटांसाठी… जाण्याचे एकाचे आणि येताना दोघांचे. मिंजीकडे अंगावरचे कपडे व उरलेल्या खडूंपलीकडे काही नाही. शहरात जाण्याच्या
खर्चाचा अंदाज कोणालाच नसतो. एका विद्यार्थ्याने सांगितले की काही वर्षांपूर्वी तो आईसोबत शहरात गेला होता तेव्हा तीन युआन तिकीट होते. नऊ युआन मिळवण्यासाठी सर्व विद्यार्थी आपल्याकडे आहेत-नाहीत ते सर्व पॆसे शिक्षिकेकडे आनंदाने देतात. आता उरलेले पॆसे कुठून आणायचे या विषयावर सर्व वर्ग गंभीरपणे विचार करतो. त्यातल्या एकाला सुचते की बाजूच्या विटा बनवायच्या कारखान्यात मजुरी करावी. जशी मुले.. तशीच शिक्षिका.. सगळे उत्साहाने विटांच्या कारखान्यात जाऊन धडकतात आणि काही विचारपूस न करता विटा इकडून तिकडे उचलून ठेवतात. काही विटा पडतात.. काही तुटतात. कोलाह्ल ऎकून तेथील मॅनेजर येतो आणि या वानरसेनेची कामगिरी पाहून बुचकळ्यात पडतो. पण त्यांची समस्या ऎकल्यावर दया येऊन तो दहा युआन देतो.
आता मिंजीकडे बसभाड्यापेक्षा जास्त पॆसे जमा होतात. तिच्यातील शिक्षिका जागी होऊन विचार करते की सगळ्या चमूची तहान भागवायला हवी. ती सुध्दा विदेशी थंड पेयांनी, जे त्यांनी आजवर फ़क्त जाहिरातीतच पाहिले होते. पण लक्षात येते की मिंजीकडे असलेल्या पॆशातून फ़क्त दोनच टिन परवडणार होते. मग सगळी मुले आपापल्या वाट्याला आलेला एकेक घोट घेऊन तृप्त होतात.
आपल्या शिक्षिकेला सोडायला सगळी मुले बसस्थानकावर जातात. पॆसे मिळवण्याची सगळी खटपट ऎकीव गोष्टींवरुन व गणिताच्या अर्धवट ज्ञानावर केलेली असते. त्यामुळे बसस्थानकावर पोहोचल्यावर लक्षात येते की जवळ्च्या पॆशात तीन काय एकसुध्दा तिकिट परवडणार नाही. मग असे ठरते की मिंजीने विनातिकिट बसमध्ये चढायचे.
मुले विचार करतात की सगळे एकदम बसमध्ये चढले तर कंडक्टर त्यांच्या तिकीट नसलेल्या शिक्षिकेपर्यंत पोहोचणारच नाही. पण त्यांची ही युक्ती सफ़ल होत नाही. त्या सगळ्यांना तेथेच उतरवले जाते तर त्यांच्या शिक्षिकेला गावाबाहेर.. पण मिंजी आता अजिबात मागे फ़िरत नाही. ती चालत चालत शहराच्या दिशेने निघते.
मोठ्या शहराचा झगमगाट पाहून मिंजी घाबरत नाही. इकडे तिकडे विचारत ती झांग हुईकेच्या पत्त्यावर जाऊन पोहोचते. हुईके ज्या मुलीबरोबर झीमेईसोबत गावातून आलेला असतो, ती मिंजीला नवीन संकटात टाकते ; हुईके त्याच्या व्रात्य स्वभावामुळे रेल्वे स्टेशनवरच हरवला असे ती मिंजीला सांगते.
आता मिंजी आणि झीमेई तीन दिवसांपूर्वीच हरविलेल्या हुईकेला प्लॅटफ़ॉर्मवर शोधायला लागतात. मित्रपरिवारातू हरवल्यावर हुईके थोडाच प्लॅटफ़ॉर्मवर थांबणार ? तो बाहेर पडून शहरात भटकायला निघतो. भुकेने व्याकुळ होऊन तो एका हॉटेलमध्ये सामोसे, मिठाईकडे आशाळभूत नजरेने पाहत असतो. त्याच्या अशा फ़िरण्याने ग्राहक निघून जाऊन नयेत म्हणून त्या हॉटेलची मालकीण त्याला पोटभर खायला देते व छोटीमोठी कामेही सांगते.
इकडे स्टेशनवर एकट्या बसलेल्या मिंजीला एक स्त्री सुचवते की हुईके हरवल्याची बातमी एका कागदावर लिहून तो कागद स्टेशनात चिकटवला तर उपयोग होऊ शकेल. मिंजी आपल्याकडचे सर्व पॆसे खर्च करुन कागद, पेन व शाई आणते. रात्रभर जागून ती शंभरएक कागदांवार हुईके हरवल्याची बातमी लिहिते. स्टेशनवरचा एक प्रवासी ते पाहून पुटपुटतो की पाणी घालून पातळ केलेल्या शाईने लिहिलेला मजकूर कोण वाचणार आणि त्यात पत्ता तर लिहिलेलाच नाही. कोणाला मदत करावीशी वाटली तर तो/ती संपर्क कुठे साधणार ? थकल्या भागलेल्या आणि भुकेने व्याकुळ झालेल्या मिंजीला तर काहीच सुचेनासे होते. कोणीतरी योग्य मार्ग सुचविला तर तो ती अमलात आणू शकते. सल्ला द्यावा म्हणून ती त्या प्रवाशाच्या मागेच लागते. तिला टाळण्यासाठी तो टेलिव्हिजनकडे जायचा मार्ग सुचवितो.
आता बिचारी मिंजी येणा-या जाणा-यांना टेलिव्हिजन केंद्राचा पत्ता विचारायला लागते. एक खेडवळ मुलगी टेलिव्हिजन स्टुडिओच्या ऒफ़िसमध्ये पोहोचून करणार तरी काय ? कोणी तिचे म्हणणे कशाला ऎकेल ? मिंजीकडे ना जाहिरात द्यायला पॆसे आहेत ना शिफ़ारसपत्र, ना ती शिक्षिका असल्याचा दाखला. ती रिसेप्शनिस्ट च्या पुढे कोणापर्यंत पोहोचूच शकत नाही. रिसेप्शनिस्ट या ब्यादीला कंटाळून संचालकांना भेटायला सांगते. पण ऒफ़िसमध्ये आत जाऊन नाही तर गेट्च्याबाहेर उभे राहून.. आता चौकीदार ही तिला बाहेर घालवून देतो.
झाले.. मिंजी आता टेलिव्हिजन केंद्राच्या बाहेर येणा-या जाणा-यांना थांबवून विचारायला लागते की ते या केंद्राचे संचालक आहेत का ? चौकशी करण्यातून कोणी सुटू नये म्हणून ती सायकलवाल्यांचा लांबवर पाठलाग करुन हा प्रश्न विचारते. संध्याकाळ होते. रात्री गार वा-याने तिचे कागद उडून जातात व पहाटेच्या काळोखात सफ़ाईसाठी आलेले कामगार ते कागद कचरा म्हणून घेऊन जातात.
मिंजी थंडीत गारठून झोपलेली असते. सकाळ झाल्या झाल्या जवळच्या नळावर तोंड धुवून ती परत केंद्राच्या आयुक्तांना शोधायची मोहीम चालू ठेवते.
दुपारनंतर संचालकांना कोणीतरी सांगते की एक गरीब, ग्रामीण मुलगी दीड दिवस त्यांना शोधते आहे. ते खिडकीतून बाहेर डोकावतात. एक दुबळी, लाचार मुलगी येणा-या जाणा-यांमागे चौकशी करताना दिसते. ते हॆराण होतात. नियमावर बोट ठेवून काम करणारे लोक माणुसकी पूर्णपणे विसरुन गेले होते की काय ? त्यांना आधीच हे कोणी का सांगितले नाही म्हणून रागावतात देखील. आता संचालक स्वत: जाऊन मिंजीला घेऊन येतात.
तिला तर परमेश्वर भेटल्यासारखा आनंद होतो. एका विशेष कार्यक्रमाद्वारे कॅमे-याच्या लेन्समध्ये बघत हुईकेल परत येण्याचे आवाहन करताना तिला रडू फ़ुटते. तिचे आवाहन दर्शकांच्या व हॉटेलमध्ये भांडी घासणा-या हुईकेच्या मनाला स्पर्शून जाते.
तर वाचकहो, गोष्ट तशी बरीच मोठी आहे. पण थोडक्यात सांगायचे तर शेवटी शिक्षिकेला आपला हरवलेला विद्यार्थी परत मिळतो. इतकेच नव्हे तर टेलिव्हिजन वरील कार्यक्रमामुळे शाळेसाठी भेटवस्तू, फ़र्निचर व पॆसेसुध्दा मिळतात. फ़ुलांनी मढलेल्या गाडयांच्या काफ़िल्यात मिंजी व हुईके टेलिव्हिजनच्या लोकांसोबत गावी परत येतत. तेव्हा सगळे आश्चर्यचकित होतात. त्यांच्या स्वागतासाठी सर्वात पुढे असतो तो गावचा सरपंच.. ज्याने शिक्षिकेला शहरात जायला मनाई केली होती. मिंजीच्या ऎवजी तो सरपंच गावात गेला असतात तर जरी हुईके सापडला असता तरी त्याचे मन पालटून तो परत आला असता का ? त्याला भेटवस्तू व आर्थिक मदत मिळाली असती का ?
हा प्रवास तर मिंजीनेच करायला हवा होता. यामुळेच तिच्या हट्टी स्वभावाचे रुपांतर आपले ध्येय ठामपणे साध्य करणा-या स्वभावात होणार होते. विद्यार्थ्यांचे या मुलीशी मनाने नाते आधीच जुळले होते. पण ती त्यांची शिक्षिका बनायला या सर्व घटनांमुळे पात्र होते. परिस्थितीमुळे करावी लागलेली नोकरी तिला आयुष्यभराचे धडे देऊन जाते. भले तिला दहा युआन मिळणार होते पण आव्हानांबरोबरच तिचे ध्येय ठरत जाते. महिन्याभरात आपल्या कम्युनिटीत परतलेली मिंजी आता एक अल्लड तरूणी रहात नाही.
Not one less.. हा चिनी सिनेमा सत्यघटनेवर आधारित असल्याचा दावा करत नाही. पण प्रत्यक्ष असे वेळ पडल्यास करण्याची प्रेरणा नक्की देतो. चमकदार पोशाख. गाजलेले अभिनेते याऎवजी धुळीने भरलेली रखरखीत दृश्ये असूनही हा सिनेमा आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवतो. याचे निर्देशक झांग यिमू यांना Raise the red lantern या सिनेमासाठी देखील नावाजले गेले आहे.
हा सिनेमा बघितल्यावर एका कवितेची आठवण आली. जी पद्मा गोळे यांची आहे.
पांढरे निशाण उभारण्याची,
घाई करु नकोस,
मूठभर हृदया,
प्रयत्न कर,
तगण्याचा, तरण्याचा,
अवकाश भोवंडून टाकणा-या,
या प्रलंयकारी वादळाचाही,
एक अंत आहे,
काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत,
लढत राहा,
तुझ्या नाजूक असित्वानिशी,
वादळे यासाठीच वापरायची असतात,
आपण काय आहोत,
ते तपासण्यासाठी नव्हे,
काय होऊ शकतो,
हे आजमावण्यासाठी.
6 comments:
हा मी चित्रपट पाहीला आहे, खुपच हृदयस्पर्शी. आणि याची कथा ही आपण मस्त लिहिली आतेत त्याने पुन्रप्रत्ययाचा आनंद उपभोगता आला.
आणि हो,
पद्मा गोळेंची कविता सुरेख आहे.
काही वादळे अशी
वादळे नसतात
ना पाचोळा उठतो
नाही एखादी लहर
तरीही असतात
ती अति वादळी.
वादळी वादळांना
भेटण्यास हवी
तशीच हळवी मने
नी हळुवार हात
वादळी शांततेला
असे त्याचीच आस
वा नरेंद्रजी,
अभिप्राय झक्कास
निलांबरी ,
खूप खूप धन्यवाद. आपली नवीन पोस्ट ही खूप विचार करायला लावणारी आहे.
आपला नम्र,
अभी
सगळ्यांच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.. अरविंद गुप्तांच्या कृपेने हा सिनेमा पाहायला मिळाला.
नरेन्, कविता अगदी apt and appropriate लिहिली आहेस.
Khup hrudaysparshi goshta ahe ani tu sangitlisahi titkyaach chaanpane!
Post a Comment