Monday, August 16, 2010

Vertigo

Vertigo – Alfred Hitchcock

१९५८ मधे Vertigo चित्रपटगृहात दाखल झाला तेव्हा लांबलचक आणि फ़ार रटाळ आहे या कारणास्तव लोकांना फ़ार आवडला नाही. रॉबिन वूड नावाच्या एका तज्ञाने ’हिचकॉकचा सर्वात चांगला सिनेमा आणि जागतिक पातळीवरच्या चार पाच उत्कॄष्ट सिनेमांमधील एक’ असे त्याबद्दल मधल्या काळात लिहिले. नंतर तो परत एकदा १९८३ मधे दाखल झाला तेव्हा प्रचंड गाजला. त्यावर लोकांनी भरभरुन लिहिले.

हा सिनेमा बघताना सुध्दा असेच होते. प्रथम दर्शनी तो रटाळ वाटू शकतो. विशेषत: त्यातील Madeliene चे museum मधे जाऊन बसणे असे सीन परत परत येतात. पण जरा विचार करता या सिनेमाने किती विषयांना एकाचवेळी हात घातला आहे हे कळत गेले की आपण थक्क होतो.

सोबतच्या पोलिस अधिका-याच्या छतावरुन पडून पाहिलेल्या मृत्यूने डिटेक्टिव्ह John ’Scottie’ Fergussion ला Acrophobia (उंचीची भीती) निर्माण होते. या घटनेनंतर तो पोलिसातील नोकरी सोडून देण्याचे ठरवितो. त्याचवेळी त्याचा मित्र गेव्हिन आपल्या बायकोच्या (Madeliene) जरा विचित्र वागण्याचा शोध लावण्यासाठी Scottie ला नेमतो. कार्लोट्टा नावाच्या एका स्त्रीचे थडगे, तिचे घर आणि museum मधील तिचे चित्र याच ठिकाणी Madeliene परतपरत जात असते. तिचा या सर्व ठिकाणी पाठलाग करताना Scottie च्या लक्षात येते की कार्लोट्टाचे आयुष्य दु:खी होते ज्यामुळे तिने शेवटी आत्महत्या केली. तसेच ती Madeliene ची पणजी होती.

Madeliene San Franisco Bay मधे उडी मारुन जीव द्यायचा प्रयत्न करते. पाठलागावर असणारा Scottie तिला वाचवतो व तिच्या घरी घेऊन जातो. ती कबूल करते की तिला वेड लागेल असे वाटते आहे आणि आत्महत्येचे विचार तिच्या मनात घोळत आहेत. Scottie तिला सावरतो व दोघांमधली जवळीक वाढते.

Madeliene ला स्वप्नात जी जागा दिसते ती कोणती हे Scottie च्या लक्षात येते व तो त्या चर्चमधे (Mission San Juan Bautista)तिला घेऊन जातो. ती पाय-या चढायला लागते. Scottie vertigo च्य भीतीने वर पर्यंत तिच्यासोबत पोहोचू शकत नाही. Scottie ला एक किंकाळी ऎकू येते व Madeliene वरुन खाली पडताना दिसते.

तिचा मृत्यू ही एक आत्महत्या असल्याचा व तिच्यावर असलेल्या कार्लोट्टाच्या प्रभावामुळे असे घडल्याचा यावर शिक्का बसतो.

Scottie चे Madeliene वर प्रेम बसलेले असते व तिच्या मृत्यूने तो अस्वस्थ होतो. ती ज्या ठिकाणी जायची तिथेच तो घिरट्या घालायला लागतो. एके दिवशी त्यापॆकी एके ठिकाणी त्याला अतिशय वेगळ्या केशवेशभूषेतली पण Madeliene ची आठवण करुन देणारी स्त्री दिसते. Scottie तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती स्वत:चे नाव judy barton असल्याचे व ती kansas मधून आल्याचे सांगते. आधी अनेकदा नकार दिला तरी शेवटी ती Scottie सोबत जेवायला जाण्याचे कबूल करते.

Scottie तिच्या रुममधून निघून गेल्यावर प्रेक्षकांना कळते की judy हीच Madeliene आहे. गेव्हिनने तिला ’स्वत:च्या बायकोचे व तिला कार्लोट्टाने पछाडले आहे’ असे नाटक करण्याचे पॆसे दिलेले आहेत. हा सगळा बनाव आहे. चर्चमधून खाली पडते ते गेव्हिनने आधीच मारलेल्या आपल्या बायकोचे प्रेत. Scottie ला असलेल्या vertigo चा फ़ायदा घेऊन या सगळ्या प्रकाराचा साक्षीदार म्हणून तयार करण्यासाठी हे नाटक.

पण मधल्या काळात Madeliene उर्फ़ Judy, Scottie च्या प्रेमात पडते. Scottie तिला Madeliene च्या रुपात परिवर्तित करायचा प्रयत्न करतो. ती madeliene आहे असे त्याला वाटायला लागते व त्याचा संशय बळावतो तो तिने कार्लोट्टाच्या चित्रातल्यासारखाच नेकलेस घातल्यावर..

परत तो तिला त्याच चर्चमधे घेऊन जातो. त्याच पाय-या चढता चढता तो तिला ओळखल्याचे व गुन्हा कबूल करण्याचे आवाहन करतो. त्याचा Vertigo प्रकार संपल्याचे तिला कळते. ती फ़सविल्याचे कबूलही करते. आणि Scottie वर तिचे प्रेम असल्याचे सांगते.. ते मिठी मारतात.. पण एक सावली बघून ती घाबरते एक पाऊल मागे सरकते व कोसळून मरते. यावेळी खरोखरच मरते.

सिनेमा सुरू होतो तेव्हा Scottie स्वत:च्या Acrophobia (fear of heights – vertigo) बद्दल प्रचंड निराश आहे. स्वत:तील या वॆगुण्यावर मात करायचा तो आटोकाट प्रयत्न करतो. मात्र गेव्हिन च्या बायकोचे Madeliene चे रहस्य शोधून काढता काढता त्याचे हे प्रयत्न तिला तिच्या निराशाजनक विचारांमधून बाहेर काढण्याकडे झुकतात (स्वत:च्या दु:खातून बाहेर यायच्या ऎवजी दुस-याला मदत सुरु करणे असे transformation). तिला येणा-या जुन्या आठवणी, तिच्या स्वप्नांचा अर्थ लावणे, तिला तिच्या पणजीमधे दिसणारी प्रतिमा व स्वत: त्याच्याशी साधर्म्य सांगणे या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी तो मदत करतो.

ग्रीक पुराणात orpheus ची कथा आहे. Eurydice या त्याच्या बायकोला साप चावतो. Orpheus चे तिच्यावर विलक्षण प्रेम .. तो तिचा जीव परत मागण्यासाठी Hades Persephone या जोडप्याकडे जाण्यासाठी स्वर्गाचा प्रवास करतो. (persephone ही भूतलावरची एकमेव व्यक्ती जी स्वर्गात न मरता पोहोचू शकलेली आहे.) orpheus ला eurydice चे प्राण परत मिळतात ते एका अटीवर.. त्याने त्याच्या जगात पोहोचेपर्यंत एकदाही मागे वळून पाहायचे नाही. पण शेवटच्या क्षणी तो ती अट मोडतो व Eurydice ला गमावतो. (जी ए कुलकर्णी यांची यावर फ़ार सुरेख कथा आहे..)

Vertigo मधला Scottie सुध्दा Orpehus सारखाच Madeliene आत्महत्येचा प्रयत्न करते तेव्हा तिला वाचविणे स्वत:चे कर्तव्य समजतो इतकेच नव्हे तर एकदा जीव वाचवला म्हणजे ती त्याची कायमची जबाबदारी असल्याचे सूचित करतो. (once you’ve saved a person’s life, you are responsible for them forever)

आता आपण एकदम सुटकेचा निश्वास टाकतो की नायकाने नायिकेला वाचविले and they lived happily ever after वगॆरे.. पण अचानक Madeliene चर्चच्या मनो-यावरुन पडते. नायक परत एकदा हताश, असहाय्य. Vertigo मुळे तिला वाचवू शकलो नाही याने scottie ला मनस्वी अपराधी वाटत राहते. कोणीतरी मृत व्यक्ती, भूतकाळातील घटना समोर येऊन अचानक एका चालत्याबोलत्या व्यक्तीचा बळी घेऊ शकते हेही यातून सूचित होते.

नंतर scottie सॆरभॆर होतो. त्याला परत एकदा jude भेटते. आधी आपल्यालाही वाटते की ही दुसरी व्यक्ती आहे. मग हे सगळे कसे घडले ते उलगडत जाते. तिचे scottie वरचे प्रेम जाणविते. चित्रपटभर आपल्याला scottie किंवा jude यापॆकी कोणाची बाजू पटते ते आपल्यालाच कळत नाही. दोन जिवापाड प्रेम करणारे जीव, ज्यांचा प्रेम करण्याचा हेतू वेगवेगळा आहे त्यातील तडफ़ड, वेदनाही जाणवत राहते.

Scottie jude ला सतत madeliene सारखे बनावे असा आग्रह धरतो. तिचे scottie वर प्रेम आहे, ते मिळवण्यासाठी ती स्वत:ची प्रतिमा बदलण्याचा अतिशय अवघड निर्णय घेते. ती madliene बनून येते.. scottie (orphues) अखेरीस मृत्यूला हरवून madeliene (eurydice) ला परत आणण्यात यशस्वी होतो.

पण ती ’एकदा मागे वळून पाहाण्याची’ घटका येतेच, ती कार्लोट्टाचा नेकलेस घालते.. scottie ला एका क्षणात सगळे कळते. प्रेमी, भावुक, हळवा प्रियकर संपतो व चर्चच्या पाय-यांवर तिला तो अक्षरश: खेचत नेतो. स्वत:चा vertigo नाहीसा करताना तो माणुसकी गमावतो.

शेवटी ते दोघे एकमेकांना मिठीत घेतात तेव्हा क्षणभर आशा वाटते. पण एक चर्चच्या घंटेपाशी एक नन येते… त्याने घाबरुन jude मागे सरकते व मरते..(orpheus अखेरीस eurydice ला मृत्यूपासून वाचवू शकत नाही.) चर्चची घंटा ऎकून आठवते ते हेच

No man is an island,
Entire of itself.
Each is a piece of the continent,..

Therefore, send not to know
For whom the bell tolls,
It tolls for thee.

Wild Strawberries – Ingmar Bergman




Wild Strawberries – Ingmar Bergman

या सिनेमाचा गुलजार यांच्या मौसमवर बराच प्रभाव आहे असे ऎकून माहिती होते. हे Wild Strawberries चे आकर्षण असण्याचे पहिले कारण. सिनेमा स्वीडीश दिग्दर्शक Ingmar Bergman चा आहे जो Autumn Sonata, Scenes from a marriage मुळे माहिती होता.

Wild Strawberries ची कथा बर्गमनने हॉस्पिटलमधे असताना लिहिली. ’स्व’ चा व माणुसकीचा घेतलेला शोध यामुळे बर्गमनचा हा सर्वात भावुक, सकारात्मक व आणि उत्कृष्ट सिनेमा समजला जातो. यातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे इझाक बोर्गची. इझाकला सभोवताली घडणा-या गोष्टींचे मानसशास्त्राच्या दॄष्टिकोनातून आकलन होऊ शकते अशी देणगी लाभलेली आहे.

’इझाक बोर्ग’ हा ७५ वर्षांचा एक डॉक्टर आहे. त्याची पत्नी मरण पावलेली आहे. सून मुलाबरोबर झालेल्या मतभेदांमुळे त्याच्यासोबत राहाते व त्याची आई ९५ वर्षांची आहे. लुंड विद्यापीठातून त्याने त्याची डिग्री मिळवलेली आहे. आता त्या विद्यापीठाने त्याच्या विज्ञान व मानवजातीच्या भल्यासाठी केलेल्या कार्याचा एक पदक देऊन विशेष गौरव करण्यासाठी त्याला बोलावले आहे. Stockholm ते लुंड असा ४०० मॆलांचा प्रवास तो या सिनेमात स्वत:च्या सुनेबरोबर करतो. या प्रवासात तो स्वत:च्या पूर्वायुष्यात डोकावतो. त्या भूतकाळातील आठवणींचा प्रवास त्याला घडतो. चित्रविचित्र स्वप्ने पडतात.निरनिराळे लोक भेटतात. त्याचा एकटेपणा व एकाकीपणा त्याला स्वत:च्या आईमधे व मुलामधे आहे असेही जाणविते.अखेरीस तो स्वत:चा भूतकाळ, वर्तमानकाळ व लवकरच येऊ घातलेला मृत्यू स्वीकारतो. अशी काहीशी स्थूलमानाने कथा.

सिनेमात मानसशास्त्रीय बारकावे मात्र असंख्य सापडतात. यातील स्वप्नदॄश्यांसाठी हा सिनेमा फ़ार गाजला. सिनेमाच्या सुरुवातीलाच इझाकला एक स्वप्न पडते.

अज्ञात ठिकाणी तो उभा आहे. जिवंतपणाचा आजूबाजूला लवलेश नाही. तो रस्त्यावरच्या एका घड्याळाकडे पाहातो.. त्या घड्याळाला काटेच नाहीत. मग तो खिशातून एक घड्याळ काढतो… त्यालाही काटे नाहीत. काटे नसलेले घड्याळ म्हणजे काळ पुढे जात नाही.. तो थांबलेला आहे. अशी अवस्था उदभवते याची एकच शक्यता – म्रूत्यू.. गोंधळलेल्या इझाकला लांबवर एक पाठमोरा माणूस दिसतो. त्याला स्पर्श केल्यावर तो सामोरा येतो.. तर त्याचा चेहरा असंख्य bandages ने भरुन गेला आहे. जो ओळखणे शक्यच नाही. त्याचे डोके अचानक धडापासून तुटते व रक्ताचे ओहोळ वाहतात. तेवढ्यात चर्चच्या घंटेचे आवाज ऎकू येतात व दोन घोडे एक शववाहिका घेऊन येतात. गाडीवानाचा पत्ता नाहीच. मग ती गाडी दिव्याच्या खांबाला अडकते. एक चाक तुटते. गाडी निघून जाते व त्यातील प्रेत बाहेर येते.. ज्यात इझाक ला स्वत:चाच चेहरा दिसतो. इथे तो स्वप्नातून जागा होतो.

जागा झाल्यावर तो प्रथम काय करतो तर लुंडला जाण्याचा मार्ग बदलतो. मुलगा त्याची जिथे वाट पाहाणार आहे ते सोडून थेट लुंडला जायचे ठरवतो. दिसलेल्या मृत्यूला हुलकावणी देण्याचा तो प्रयत्न करतो आहे का ? Freud च्या ट्रेन चुकली आहे अशा स्वप्नाचा जो अर्थ आहे तोच यात येतो. म्रुत्यू येणार आहे तेव्हा आपण तिथे नसावेच (ट्रेन चुकावी) अशी इच्छा असलेले स्वप्न.

मरियान , इझाकची सून त्याच्यासोबत प्रवासाला निघते. आयुष्यात पहिली २० वर्षे उन्हाळी सुट्ट्या जिथे घालवल्या त्याच ठिकाणी तो वाटेत थांबतो. सगळे मिळून ती दहा भावंडे असतात पण आता तो एकटाच उरला आहे. मरियानला या सगळ्या जुन्या आठवणी सांगाव्याशा त्याला वाटतात. पण तिला त्यात रस नाही. मग तो एका strawberry च्या झुडुपांपाशी बसून जुने दॄश्य आठवतो.. (मौसम मधील झाडाआडून स्वत:च्या जुन्या दिवसांकडे पाहाणारा संजीवकुमार.)

त्याला आता दिसतो आहे तो इझाकच्या वडिलांचा वाढदिवस आहे तो दिवस.. त्याला त्याची दूरची बहीण सारा strawberry वेचताना दिसते. ते एकमेकांच्या प्रेमात आहेत. एकमेकांशी लग्न करणार आहेत. तेवढ्यात त्याला त्याचा भाऊ सिगफ़्रिड दिसतो.. जो सारावर बळजबरी करतो आहे. इझाक यात दुबळा पडतो. व सिगफ़्रिड आपल्या कार्यात यशस्वी होतो.

पुढच्या प्रसंगात हे सगळे पाहिल्याचे इझाकच्या वडिलांना दोन जुळ्या बहिणी सांगतात. सारा रडत रडत आत जाते व एका नातेवाईक स्त्रीसोबत बोलते. ती म्हणते की इझाक शांत, दयाळू वृत्तीचा असला तरी सिगफ़्रिड आक्रमक, exciting आहे. एका लहान मुलापेक्षा ती पुरूषाला हो म्हणणे पसंत करेल.

या प्रसंगाचे दोन अर्थ एक, इझाक (Issac) हा बायबल मधे साधा, समजूतदार आहे तर अब्राहम (येथे सिगफ़िड) आक्रमक आहे. दुसरा म्हणजे आत्ताचा इझाक हा संशयी, स्वार्थी आहे. जो एकेकाळी संवेदनाशील तरुण होता. जणू काही आता त्याने स्वार्थी, दुष्ट अशा सिगफ़्रिडचे रुप घेतले आहे.. (transformation)..आणि तो साराला म्हणतो आहे की तुला जसा हवा होता तशा प्रकारचा पुरुष मी बनलो आहे. तो जणू सूड घेतो आहे.. पण असे सूडाचे प्रकार व्यक्तिमत्व दुभंगतात. माणूस नंतर स्वत:चाच द्वेष करू शकतो.

आता वाटेत त्याला परत एक सारा भेटते. एक तरुण, नटखट पोरगी.ती इझाकला म्हणते की सारा आणि इझाक असे जोडपे होते ना ? तो म्हणतो नाही.. जोडपे होते ते अब्राहम आणि सारा. (सारा ही इझाक ची आई.) सारा त्याला सांगत रहाते की तिच्यासोबत असलेल्या दोन तरुणांपॆकी एकजण स्वप्नाळू आणि आदर्शवादी आहे तर दुसरा तडफ़दार आणि व्यवहारचतुर आहे.. ती दुस-याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करते आहे. परत एकदा सिगफ़्रिड, इझाक द्वंद्व या रुपात दिसते.

नंतरच्या एका प्रसंगात ते इझाकच्या वयोवृध्द आईला भेटायला जातात. आई मरियानला इझाकची बायकोच समजते. ती मरियानला सांगते की मला दहा मुले होती आता इझाक एकटाच उरला आहे.. (इझाकचे वडिल, सिगफ़्रिड असे त्याचे प्रतिस्पर्धी नाहीसे झालेत..आणि आता या अर्थहीन आयुष्यात तो एकटाच उरला आहे.) आई तिच्याकडच्या जुन्या वस्तूंमधून एक मनगटी घड्याळ काढते व सांगते की ते ती सिगफ़िडच्या मुलाला देणार आहे जो आता ५० वर्षांचा होईल. ते तेच काटे नसलेले (इझाकला स्वप्नात दिसलेले) घड्याळ आहे.

यानंतर इझाकला परत एकदा स्वप्न दिसते..

ज्यात सारा strawbetrry पाशी आहे. व ती इझाकला दूषण देते आहे. ती म्हणते की तू लवकरच मरशील इतका म्हातारा आहेस व मला तर अजून सगळे आयुष्य पडले आहे…मी जाते. मला सिगफ़्रिडच्या मुलाची काळजी घ्यायला हवी. यानंतर त्याला सिगफ़्रिड व सारा आनंदात पियानो वाजवताना दिसतात. अचानक दिवे जातात. व एक माणूस लांबलचक passage मधून इझाकला घेऊन जातो. तो एक patient तपासायला सांगतो. पण इझाकला निदान करता येत नाही. मग तो माणूस त्याला याबद्दल क्षमा मागायला सांगतो. इझाक ती मागतोही.. मग त्याला एका स्त्री रुग्णाचे निदान करायला सांगतात. तो म्हणतो पण ती तर मेलेली आहे. मग ती स्त्री (त्याची बायको) हसायला लागते. तो माणूस म्हणतो तुझ्यावर स्वार्थी, दुस-याचा विचार न करणारा असे गुन्हे दाखल केले आहेत. (अर्थातच त्याच्या बायकोने) पण ती तर मेली आहे. असे इझाक म्हणतो.

पण तो माणूस त्याला भूतकाळ समोर आणायला लावतो. इझाक ची बायको व्यभिचार करते. ती क्षमा मागते तेव्हा इझाक म्हणतो त्यात क्षमा करण्यासारखे काय आहे ? त्याच्या या दयाळूपणानेच ती हळूहळू मरत जाते.( एखाद्या गुन्ह्याची शिक्षा मिळावी, त्यातूनच त्याचे क्षालन होईल अशी मानवी मनाची प्रवृत्ती असते.. )

इझाक विचारतो याला आता शिक्षा काय? तो माणूस म्हणतो.. नेहमीचीच. एकांतवास..(मृत्यू ?)

इथे इझाक स्वप्नातून जागा होतो. तो मरियानला म्हणतो की जागेपणी स्वत:पाशी ज्या गोष्टी तो सांगू शकत नाही त्या त्याला स्वप्नात दिसतात. मुख्य म्हणजे जिवंत असताना आपला मृत्यू झाला आहे अशी कल्पनादेखील तो करु शकत नाही. मरियान म्हणते की तिचा नवरा (इझाकचा मुलगा) देखील असेच म्हणतो. तो फ़क्त ३८ वर्षांचा असला तरी तो म्हातारा होऊन मेला आहे असे त्याला भास होतात.

मरियानचे नव-याशी भांडण मूल होण्यावरुन आहे. तिला ते हवे आहे आणि त्याला अर्थातच नको आहे. एका दु:खी जोडप्याचे आपण नको असलेले मूल आहोत आणि तसेच सगळे एकाकी, वॆफ़ल्यग्रस्त आयुष्य अजून एका मुलाला आपण देऊ नये असे त्याला वाटत असते.

सिनेमाच्या शेवटी इझाकला ते पदक मिळते.

त्यानंतर तो दोन चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो. त्यातील एक म्हणजे मुलाला त्याने दिलेले कर्ज तो माफ़ करायची इच्छा व्यक्त करतो. पण मुलगा ते करु देत नाही. मागे जाऊन भूतकाळ कधीच बदलता येत नाही. त्याला साराचा आवाज ऎकू येतो.. “इझाक, सर्व strawberries संपल्या आहेत.” भूतकाळातील रम्य आठवणी आणि काहीसा पश्चात्ताप मनात घेऊन इझाक झोपी जातो. एक दिवस संपतो आणि सिनेमाही..

काळ कोणासाठीच कधी थांबत नाही हे अटळ सत्य या सिनेमात सतत सांगितले आहे. काळ आपल्यावर हुकुमत गाजवत रहातो.. बालपणी आपल्याला अधिकार नसतात, म्हातारपणी संधी मिळत नाही. हा सिनेमा पाहून सुधीर मोघेची कविता अपरिहार्यपणे आठवते.

मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा ?

मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले
मन ऩक्षत्रांचे रान अवकाशी अवतरलेले
मन रानभूल मन चकवा

मन काळोखाची गुंफ़ा मन तेजाचे राऊळ
मन सॆतानाचा हात मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा ?

चेहरा मोहरा याचा कधी कुणी पाहिला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही याच्याविण दुसरा नाही
या अनोळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा ?

Friday, July 2, 2010

पाऊस (कुमार गंधर्व यांस)


झाडे गदगदा हलविणारा वनघोर पाऊस
थेंबांचा अपार उत्सव मनस्वी पानापानातून
फ़ांद्यांच्या हिरव्या जत्रेत गरगरणारे बिलोरी पाळणे
आत्मा पिसा-याहून फ़ुलवणारा मुक्त मनमोर पाऊस

पाऊस असित्वाचा कळण्याहून अपरंपार
अनादिमल्हार : कंठाला जन्म देणारा पाऊस
वाटांचे आलाप क्षितिजाच्या समेवर कोसळताना
धुंवाधार बरसणारा आनंदअनावर पाऊस

हजार तंबो-यांची षड्जगाज झोकणारा अवलिया पाऊस
गोरखनाथाच्या हाकेसारखा अलखनिरंजन पाऊस
हाक ऎकून नकळत उठून चालू लागतो आपण
दुर्लघ्य पहाडापल्याडच्या निर्विकल्पात असा पाऊस

मंगेश पाडगावकर.

Wednesday, March 31, 2010

अज्ञात झ-यावर रात्री, मज ऎकू येतो पावा



“मृत्यू कुणाचीही कदर करत नाही. कशाचीही पर्वा बाळगीत नाही. जीवनात येणारे ते अनादी, अनंत आणि आंधळे असे चक्रीवादळ आहे.”… अमृतवेल.. वि.स.खांडेकर

विहीर..

हा सिनेमा पाहाताना सतत या वाक्याची आठवण येत होती. रक्ताच्या माणसाचा मृत्यू होईपर्यंत त्याचे गांभीर्य कळत नाही. तसे घडल्यानंतर आपण अचानक ’आयुष्यात ज्या गोष्टी नाहीत त्याची तक्रार करत असतो’ ते कमी होते. कारण जित्याजागत्या माणसाची उणीव कधी भरुन येणार नसते.. बाकीच्या गोष्टी मिळण्याची शक्यता तरी असते.. एखादे जिवलग माणूस आपल्या आधी जाईल आणि तो किंवा ती नसलेल्या जगात आपल्याला जगावे लागेल याची भीती ही सर्वात मोठी भीती असे मला वाटते.

विहीर च्या नामावलीत दि.बा.मोकाशी, जी.ए.कुलकर्णी व चिं.त्र्यं. खानोलकर यांचे आभार मानले आहेत. सिनेमाची कथा कोणत्या अंगाने जाणार याची कल्पना हे तीन लेखक वाचलेल्यांना येऊ शकते.

नचिकेत.. याची गोष्ट येते गरुड पुराणात. नचिकेताच्या वडिलांनी त्याला यमाला दिले आहे असे सांगितले. आणि यमाकडे जाऊन नचिकेताने मृत्यूवर विजय मिळवला अशी कथा आहे. जन्ममरणाच्या फ़े-यातून मुक्ती मिळवलेला नचिकेत एक पात्र होऊन या सिनेमात भेटतो. नातेवाईकांच्या गराड्यात त्याला गुदमरल्यासारखं वाटतं.. त्याला कुठेतरी पळून जायचं आहे.. तसंच आपण आहोत तसे कोणालातरी दिसलो नाहीत म्हणजे आपले अस्तित्व कुठे आहे.. असे अनेक प्रश्न व विचार तो मांडतो.. सगळ्यातून अलिप्त आणि तरीही सगळ्यांचा लाडका.. असे हे पात्र आहे. आलोक राजवाडे याने ती भूमिका उत्तम केली आहे. त्याच्या प्रत्येक entry मधे एक विशिष्ट आवाज ऎकू येतो.. ’अज्ञात झ-यावर रात्री, मज ऎकू येतो पावा’.. म्हणजे काय ते तो आवाज ऎकून कळले.

समीर.. म्हणजे स्वच्छंदी वाहणारा वारा.. इतरांसाठी तो चौकटीत वागतो. पण नचिकेताचे त्याला झपाटल्यासारखे आकर्षण आहे. तो ज्या वयात आहे.. त्या वयात असे झपाटलेपण असतेच.. नचिकेत खरा संवाद साधतो तो फ़क्त समीर सोबत.. पण तरीही नचिकेत समीर मधे गुंतलेला नाही.. सगळं सोडून तो जाणार आहेच.

तू पळून जाणार नाहीस असे समीर त्याला म्हणतो व नचिकेत फ़क्त मंद हसतो..

पोहोण्याच्या स्पर्धेसाठी एका दिवसासाठी समीर जातो व परत येतो तर दिसते ते नचिकेताचे प्रेत.. त्याच्या मनाला हा आघात सहन होणे शक्यच नसते.

तो पिसाटल्यासारखा वागतो. रात्री बेरात्री उठून नचिकेतला लिहितो.. नचिकेत त्याला न भेटता गेला याचे एक दु:ख सतत आहे. खरे तर असेही वाटले.. की तो गेला याचे दु:ख अधिक आहे.. की ’न सांगता’ गेला याचे ? काळजात जपलेल्या नात्यात फ़सवणुकीचे दु:ख नेहमी काळीज चरचरुन झोंबते…… !

समीरचा प्रवास.. बाहेरपासून आतपर्यंत कसा होतो ते बघण्यासारखे आहे. खरे तर कळून घेण्यासारखे आहे.

समीरचे काम मदन देवधर याने सुंदर केले आहे.

सिनेमात हे दोघे मावसभाऊ.. त्यांच्या अनुषंगाने येणा-या त्यांच्या आया.. म्हणजे बहिणी.. ते ज्या निमित्ताने सुट्टीत गावी भेटतात.. जिचे लग्न ठरले आहे ती मावशी.. एक ओली बाळंतीण.. एक भ्रमिष्ट आजी.. आजी आजोबा..मामा.. तो ऎकत असलेल्या वसंतराव देशपांडे यांच्या records.. त्याची खोली.. सगळाच वाडा.. समीरचे पुण्यातील राहते घर.. त्याचा जिना.. विशिष्ट झाडे.. सगळी पात्रेच आहेत. अगदी संवादात येणारा पण न दिसणारा तित्तिर पक्षी सुध्दा..

विहिर.. हे या सिनेमाचे नाव. त्यातील एक प्रमुख पात्र.. त्या विहिरीत ते दोघे पोहोतात. आणि त्याच विहीरीत नचिकेतचा मृत्यू होतो.. तिच्याच काठावर समीरला नचिकेत नंतरही एकदा बसलेला दिसतो.. विहीरीचे प्रतीक आयुष्याला दिले असावे का ? तेही असेच गूढ, काळोखे, तर कधी.. उबदार.. जीवन म्हणजे पाणी देणारे असे असते.. ?

यात फ़णस हा एक symbol म्हणून येतो.. समीरच्या पत्रात.. नंतर दोन वेळा.. मला त्याचा अर्थ उमगला नाही.

या सिनेमाचे background music.. आणि cinematography उत्कॄष्ट आहे.. या साठी तो थिएटर मध्येच पाहावा लागेल. प्रत्येक frame मनात ठसतेच.. त्यासाठी सिनेमा परत पाहावा असे वाटले.

सिनेमाच्या मध्यंतरात खुद्द Big B चे दर्शन घडले. नंतर गिरीश आणि उमेश कुलकर्णी यांना भेटता आले. (श्रेय माझा मित्र हर्षद..) त्यांना मी एकच सांगितले.. की एकदा बघून सिनेमा सगळा कळला असे वाटत नाही. तो परत पाहावा लागेल.

मात्र कोणतेही एक conclusion काढता येत नाही. सिनेमातून वेगवेगळे आपल्या मनाला पटतील असे अनेक अर्थ निघू शकतात.. ’आणि ते सुखाने नांदू लागले’.. असा शेवट अपेक्षित असणा-यांना हा सिनेमा आवडणार नाही कदाचित.. !! पण एकूण मनावर नंतर सिनेमाचा effect राहतो.. त्यावर आपण विचार व चर्चा करतो हेच त्याचे यश असते. तसे विहीरचे आहे.

Thursday, March 4, 2010

एकट्याने एकटे गर्दीत चालावे


एकट्याने एकटे गर्दीत चालावे
एकट्याने आपुल्याशी फ़क्त बोलावे

थांबते गर्दी फ़ुलांच्या उंब-यापाशी
एकट्याने आतूनी निर्माल्य हुंगावे

दार हे अपुले ति-हाईत होतसे जेव्हा
एकट्याने ओळखावे अन पुढे जावे

एकट्याला हाक येते रानपक्ष्याची
एकट्याने पाखरु प्राणांत झेलावे

लागते जावेच या अंधारयात्रेला
एकट्याने एकटा अपुला दिवा व्हावे

गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : श्रीधर फ़डके
गायक : अवधूत गुप्ते
अल्बम : संगीत मनमोही रे


एकांत, एकटेपणा, एकाकीपणा.. किती शब्द..

बेताबी क्या होती हॆ, पूछो मेरे दिलसे
तनहा तनहा लौटा हूं मॆं तो भरी महफ़िलसे..

या ओळी मला फ़ार आवडतात. गर्दीत असतानाचा एकटेपणा यात दिसतो.

एकट्याने एकटे गर्दीत चालावे
एकट्याने आपुल्याशी फ़क्त बोलावे
यात हा विचार आहे. खरे तर आपण हे करतच असतो कायम.. गर्दीत असताना कधी दुसरा माणूस काय विचार करत असेल याचा विचार केलाय ? कोणी त्रासलेला, चिडलेला, अस्वस्थ, आनंदात, व्याकुळ, व्यथेत.. दु:खात.. सगळे एकटेच.. आपण आपल्या माणसाबरोबर असलो तरी ते नुसतेच सोबत असणे होते अनेकदा.. आपण आपले एकटेच असतो. सोबत असलेल्या माणसाशी खरोखर बोलतो असे किती क्षण असतात ?

उधळून अलख निरंजन व्हावे असे किती जण भेटतात ?
सारे काही उधळून द्यावे असे किती क्षण भेटतात ?

…………………
दार हे अपुले ति-हाईत होतसे जेव्हा
एकट्याने ओळखावे अन पुढे जावे

मनाला चटका लावणा-या ओळी आहेत. याचा दाहक अनुभव ज्याने घेतला आहे…. काहीही केले तरी हाताला राखच लागते अशी संघर्षाची वर्षे ज्यांच्या आयुष्यात येतात त्यांना ’अपुले दार ति-हाईत’ कसे होते ते नीट कळेल. पण एकट्याने ते ओळखून पुढे गेलो अणि काही काळानंतर स्वकर्तॄत्वावर सर्व दारे आपल्याला ओळखायला लागली आणि काही दारे पायघड्या घालायला लागली की येथवर पोहोचल्याचा आनंद ही एकट्याला उपभोगता येतो. मग पुढे रानपक्ष्याची हाक ही ऎकू येतेच..
………………….

लागते जावेच या अंधारयात्रेला
एकट्याने एकटा अपुला दिवा व्हावे

ही अंधारयात्रा ति-हाईत दारापासून सुरू होते.. त्यात तो दिवा आपल्याला व्हावेच लागते.. आनंदाने व्हायचे की दु:खाने .. कटकट करुन ते फ़क्त आपण ठरवू शकतो. तुम्हीच सांगा कसं जगायचं.. यात पाडगावकरांनीच तो विचार नीट मांडला आहे. अंधारयात्रेला असे दोन वेळा म्हणताना… दुस-या वेळेला स्वर एकदम हळवा झाला आहे… तो एकदम भिडतो..
…………….

श्रीधर फ़डके यांचा हा नवीन अल्बम आला त्याला एक महिना होतोय.. या गाण्यातून उलगडणारे अनेक अर्थ अजून पुढे यायचे आहेत.. पण लिहायला त्या गाण्याने भाग पाडलं.. मधुमती मधला.. सुहाना सफ़र वाला दिलीप कुमार किंवा जमीर मधला फ़ूलोंके साये हॆ.. वाला अभिताभ.. एकटे आनंदाने निघालेत.. मनात एकटेपणाचा हळवेपणा असला तरी दु:ख नाही. तोच भाव या गाण्यात आहे. कवितांची निवड ही श्रीधर फ़डके यांच्या गाण्यात एक खासियत आहे.. या अल्बममधेही ते लक्षात येते.

Language... has created the word "loneliness" to express the pain of being alone. And it has created the word "solitude" to express the glory of being alone. ~Paul Johannes Tillich..

Tuesday, March 2, 2010

दिलसा कोई कमीना नही…



ऎसी उलझी नजर उनसे हटती नहीं, दात से रेशमी डोर कटती नही
उम्र कब की बरस के सफ़ेद हो गयी, कारी बदरी जवानी की छटती नही
वल्ला यह धडकन बढने लगी हॆ, चेहरे की रंगत उडने लगी हॆ
डर लगता हॆ तनहा सोनेमें जी…
दिल तो बच्चा हॆ जी, थोडा कच्चा हॆ जी
किसको पता था पहलू में रखा, दिल ऎसा पाजी भी होगा
हम तो हमेशा समझते थे कोई, हम जॆसा हाजी ही होगा
हाय जोर करे कितना शोर करे, बेवजह बातें पे गौर करे,
दिलसा कोई कमीना नही…
कोई तो रोके कोई तो टोके, इस उम्र में अब खाओगे धोके
डर लगता हॆ इश्क करने में जी, दिल तो बच्चा हॆ जी…१
ऎसी उदासी बॆठी हॆ दिल पे, हंसने से घबरा रहे हॆ
सारी जवानी कतरा के काटी, पीरी में टकरा गये हॆ
दिल धडकता हॆ तो ऎसे लगता हॆ वह, आ रहा हॆ यही देखता ही न वह
प्रेम की मारे कटार रे…
तौबा यह लम्हे कटते नही हॆ क्यूं , आंख से मेरी हटते नही हॆ क्यूं
डर लगता हॆ मुझसे कहने में जी, दिल तो बच्चा हॆ जी…. २

इश्कियां मधील हे राहत फ़तेह अली खान यांनी अतिशय उत्तम गायलेले गाणे.. काहीसे ६० च्या दशकातील गाण्यांच्या संगीताची आठवण करुन देणारे. यात मधेच अरेबिक संगीत आहे.. विशाल भारद्वाज यांचे या चित्रपटातील मला हे गाणे सर्वात जास्त आवडले आहे.
गुलजार यांच्या नेहमीच्या शॆलीतील गाणे आहे.. त्यांनी ते सहज लिहिले असावे.. गदिमांची गीते कशी .. ’झाला महार पंढरीनाथ, काय द्येवाची सांगू मात’… मध्ये गावरानपणा व ’निजरुप दाखवा हो’ मधे एक सदाशिव पेठी बाज आणतात.. तसे’प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो’.. व ’दिलसा कोई कमीना नही’ मध्ये गुलजार यांचे झाले आहे.. दोन्ही प्रेमाचीच गाणी पण.. इश्किया मधील भाषा हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यात हे गाणे चपखल बसते.
अर्धसत्य मधला लोबो, त्रिदेव चा ओये ओरडणारा नायक, मासूम मधला जेके, मंडीमधला तुंद्रूस.. नसिरुद्दीन शहा यांचे किती रोल्स आठवावेत.. इश्किया मधे त्यांचा अभिनय उत्तम आहेच.. पण दिल तो बच्चा हॆ हे गाणे व नंतर एक सत्य कळल्यावरचा अर्धा तास दुखावलेपणाचा अभिनय केवळ अप्रतिम.. मनात गाणे घर करुन राहाते.. एक ठसठसती जखम असावी तसे..

Sunday, February 28, 2010

वह जो इश्क था वह जुनून था...



इश्किया... गुलजार आणि बरेच काही..


अब मुझे कोई इंतिजार कहां ?
वह जो बहते थे आबशार कहा?
आंख के इक गांव में, रात को ख्व्वाब आते थे
छूने से बहते थे बोले तो कहते थे
उडते बादलों का ऎतबार कहां ?

जिन दिनों आप थे आंख में धूप थी
जिन दिनों आप रहते थे आंख में धूप रहती थी
अब तो जाले ही जाले हॆ यह भी जाने वाले हॆ
वह जो था दर्द का करार कहां

चित्रपट : इश्कियां
संगीत : विशाल भारद्वाज
गायिका : रेखा भारद्वाज
आणि
गीत : गुलजार

इश्कियांमध्ये चार गाणी आहेत.. गुलजार – विशाल भारद्वाज या दोघांनी दिलेली..

अब मुझे कोई.. थोडीशी .. ’आपकी याद आती रही’ ची आठवण करुन देते. शब्द तर दिलेच आहेत. पण expressions ऎकूनच कळतील. दर्द का करार कहां मधला करार काळजाचा ठोका चुकवितो.. उडते बादलों का ऎतबार कहां ? अनेक अधुरी स्वप्ने यातून एका क्षणात मनात तरळून जातात.. स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे या शांता शेळके यांच्या ओळी आठवतात.. स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा.. तसे हे गाणे स्वप्नासारखे ऎकावे / पाहावे.. ते एक सुख आहे..