Monday, August 31, 2009

इतनीसी बात..

माणसाचा खरा चेहरा दिसतो तो आपण ज्यांना आपल्याहून कमी दर्जाचे समजतो त्यांच्याशी वागताना. काटेकोरपणे सामाजिक रीतीरिवाज सांभाळणारे लोक… आपल्या driver किंवा घरकाम करणा-या नोकरांशी कसे वागतात ते कधीतरी एखाद्या क्षणी दिसते मग गंमत वाटते..

मला लालजी आठवला. परदेशात असताना माझ्या office मध्ये तो office boy होता. आम्ही दोघेही भारतीय असल्याने माझ्याशी त्याच्या गावाकडच्या गोष्टी सांगायच्या. राजस्थानात कुठेतरी त्याचे गाव होते. सुखदु:खे सांगायला व आपल्या भाषेत बोलायला जीव व्याकुळ झाल्यावर काय होते त्याचा अनुभव दोघांचा सारखाच..

Office मध्ये coffee प्यायला मी माझ्या आवडीचा नाजूक फ़ुलाफ़ुलांचा एक मोठा थोरला मग आणला होता. लालजी त्यातून मला coffee आणून द्यायचा..

एक दिवस अक्षरश: थरथरत तो आला व मला म्हणाला.. madam तुमचा कप फ़ुटला चुकून माझ्या हातून.. मी अर्थातच सहजपणे म्हणाले.. त्यात काय.. आणेन की नवीन..

मी रागावले देखील नाही याचे त्याला आश्चर्य वाटले आणि मी इतक्या क्षुल्लक गोष्टीवरुन त्याला रागावेन अशी त्याने अपेक्षा धरावी याची मला लाज वाटली. कमला या सिनेमात कमलाला मालकीण वर सोफ़्यावर बसायला सांगते व तिला ते शक्य होत नाही.. अशा गोष्टींमुळे मनाला कायमचे चरे पडतात…