Wednesday, February 18, 2009

The Red Balloon




पाय-या उतरुन शाळेत निघालेला एक चिमुरडा. त्याला अचानक एक मोठा लाल फ़ुगा दिसतो.. आता उरलेल्या चित्रपटात प्रत्येक फ़्रेम मध्ये तो लाल फ़ुगा आहे. हलकेच तो टांगलेला फ़ुगा सोडवून घेतो व पुढे निघतो. काही क्षणांतच लक्षात येते की त्या फ़ुग्याला त्याचे स्वत:चे मन व इच्छाशक्ती आहे. आता पास्कल (चिमुरड्याचे नाव.. ) जाईल तिकडे फ़ुगा जातो. घरात स्थान मिळत नाही तर रात्रभर पास्कलच्या बेडरुमबाहेर लटकत राहातो. शाळेत, दुकानात, बाजारात तो सतत पास्कलच्या अवतीभवती असतो.
लवकरच गावातील टारगट मुलांना या फ़ुग्याबद्दल कळते. एका गल्लीच्या टोकाशी ती दबा धरुन बसतात. पास्कल व त्यांची पळापळ होते. यात ती मुले तो फ़ुगा कसा हस्तगत करतात ती ट्रिक बघताना मजा येते व दु:खही होते. अखेर ब-याच झटापटीनंतर ती मुले लाल फ़ुगा हस्तगत करतात. एकजण गलोलीने तो फ़ुगा फ़ोडतो.. फ़ुगा लहान होत जातो.
एक नवल घडते.. शहरात त्या क्षणी जिथे जिथे फ़ुगे असतात ते आपापल्या ठिकाणाहून निघून पास्कलपाशी पोहोचतात.. चित्रपटाच्या शेवटी पास्कल त्या फ़ुग्यांना धरुन हवेत तरंगतो आहे.
सुखाच्या फ़ुग्यांच्या मागे लागणे सोडले तर आपोआप अनेक सुखे आपल्याला येऊन बिलगतात असे त्या क्षणी मला वाटले. कारण पास्कल सोबत मी ही तरंगत होते.
15, Park Avenue हा सिनेमा पाहून आम्ही जे कोणी सोबत होतो त्यांचे शेवटच्या दॄश्याबद्दल काय मत आहे ? असा नंतर परतताना विषय झाला. तसे Red Balloon चे आहे. त्याच्यातली प्रतीके, शेवट यावरुन अनेक अर्थ निघतील.
तर असा हा The Red Balloon.. अवघ्या ३४ मिनिटांचा खिळवून ठेवणारा हा चित्रपट. ही कथा पूर्वी वाचली होती पण सिनेमा हे माध्यम कसे परिणामकारक आहे ते परत एकदा जाणविले. Albert Lamorisse या फ़्रेंच दिग्दर्शकाचा हा १९५६ मधील सिनेमा. त्यांना याचे Oscar ही मिळाले आहे. पास्कल हा या दिग्दर्शकाचाच मुलगा. यात संवाद नाहीत. फ़क्त background music.. पण पास्कलची निरागसता, शाळेतील शिक्षकांचा उग्रपणा व शिस्त, टारगट मुलांचा मस्तीखोरपणा सुरेख चित्रित झाला आहे.
चिमुरड्या पास्कलसोबत लाल फ़ुग्यासारखा मीही प्रवास केला. तो जे काही जग त्याच्या नजरेतून पहातो ते मलाही अनुभवायला मिळाले. पास्कलच्या घरातील लोक त्याला तो फ़ुगा आत आणून देत नाहीत तेव्हा, रोजच्या सकाळमधला कुत्र्याचे पिल्लू आणून देत नाहीत म्हणून नाराज होणाराचिंटू समोर आला.
गल्लीच्या तोंडाशी दबा धरुन बसलेल्या त्या कार्ट्याची भीती व राग असे एकाचवेळी मनात आले. Khalid Hussaini च्या The kite runner मधला पतंगामागे धावणारा हसन आठवला. कथेत साधर्म्य काही नाही. पण जिवाच्या आकांताने धावणा-या त्या चिमुकल्यांमध्ये नक्कीच एक समान धागा आहे.
लाल फ़ुगा पाहाताना एक गोष्ट अजून आठवली. या चित्रपटात फ़ुग्याचा लाल रंग प्रत्येक फ़्रेममध्ये प्रकर्षाने उठून दिसतो असे बाकीचे रंग राखी, फ़िके निळे आहेत. तसेच speilberg च्या schindler’s list मध्ये तीन प्रसंग रंगीत आहेत. सुरुवात, शेवट व एक लहान मुलीचा लाल फ़्रॉक आहे. चित्रपट black and white आहे. पण त्या मुलीचा लाल फ़्रॉक दोन वेळा दिसतो. प्रथम तो लाल फ़्रॉक दिसतो तेव्हा का ते कळत नाही. पण दुस-या वेळी तो प्रेतांच्या ढिगा-यात दिसतो.. आणि प्रातिनिधिक तत्वावर असे हजारो लाखो मुलांचे बळी गेलेत हे सूचित करतो.
लहान मुलांच्या निरागस दॄष्टिकोनातून एक फ़ुगा, त्याबरोबरची गंमत अनुभवणे मात्र मला नाही जमले. Charlie Chaplin चे चित्रपट लहानपणी बघताना हसू यायचे तसे आता येत नाही.. त्यामागचे हसरे दु:ख जाणवत राहते तसे काहीसे..

Thursday, February 12, 2009

परिचय..

म्हणेन ओळख झाली अपुली
परंतु परिचय झाला नाही..

कुसुमाग्रज

परिचय चित्रपटात प्राण शेवटी जितेंद्रला म्हणतो की ’तुमने मेरे बच्चोंसे मेरा परिचय करा दिया’ .. तेव्हा प्रत्येकवेळी सिनेमा बघताना अपरिहार्यपणे कुसुमाग्रजांच्या या वरच्या ओळी आठवतात.

परिचय हा सिनेमा लहानपणी कसा पाहिला याची माझ्यापाशी एक मजेदार आठवण आहे. माझी आई व आत्या मधूनमधून आम्हा भावंडांना माझ्या वडिलांपाशी ठेवून सिनेमाला जात असत. मला एकदा त्यांच्या बेताचा सुगावा लागला. मग रडून ओरडून गोंधळ घातला व त्या दोघी मला सिनेमाला घेऊन गेल्या. त्या वयात लक्षात राहिलेल्या दोन गोष्टी एक म्हणजे कासवाच्या पाठीवर मेणबत्ती लावलेला तो सीन व सा रे के सारे हे गाणे ..

पुढे अनेक वर्षांनी sound of music पाहिला. त्यातले सेट म्हणे अजूनही ज्या देशांमध्ये shoot झाले (Austria) येथे जपून ठेवले आहेत.

तर परिचय.. नुकतेच विजय पाडळकर यांचे गुलजार च्या सिनेमांवर ’गंगा आये कहां से’ हे पुस्तक आणले. त्यात या सिनेमाबद्दल फ़ार सुंदर लिहिले आहे. एका ठिकाणी ते म्हणतात..

माणसामाणसातील नाती का तुटतात या प्रश्नाकडे गुलजारांचे मन सतत वळत राहिले आहे. आयुष्यभर अव्याहतपणे ते या प्रश्नाचे उत्तर शोधत राहिले आहेत. त्यांच्या जवळजवळ सा-या चित्रपटांत तुटलेल्या नात्यांचे व त्यांना पुन्हा जुळवू पाहाणा-या माणसांच्या धडपडीचे चित्रण आढळते. शेवटी माणसाला काय महत्वाचे वाटते ? प्रेम की जीवनातले आदर्श ? सहजीवन महत्वाचे वाटते की व्यक्तिनिष्ठ मार्गावरुन एकाकी चालत राहणे ? निवड माणसाच्या हातात असते आणि नसतेदेखील, प्रत्येकाला आपला मार्ग हीच योग्य दिशा वाटते, आणि मग अपरिहार्यपणे माणसामाणसांत अंतर पडत जाते.
सर्व प्रकारच्या नात्यांमध्ये हे किती खरे आहे याची प्रचीती रोजच्या आयुष्यात आपल्याला येतच असते. वॆयक्तिक किंवा professional नात्यांनाही हे लागू होते. एखादा client, सहकारी, नातेवाईक, साधा रोजचा भाजीवाला व त्याच्याशी होणारी घासाघीस..जिथे कुठे बोलण्यात stretch येतो तिथे हे लक्षात येते की प्रत्येकाला आपला मार्ग बरोबर वाटतो. व त्यातून अंतर निर्माण होते.

परिचय चित्रपटाबद्दल मला जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे.. गुलजार यांचा देहबोलीचा अभ्यास.. जया भादुरी जेव्हा कधी प्राणच्या समोर येते तेव्हा ती हाताची नखे खाताना दिसते. कारण Nail biting हे shyness, stressful situation, nervousness बरोबर निगडित आहे. आणि प्राणचे व जयाचे नाते या सिनेमात सुरूवातीला तरी त्याच प्रकारचे आहे. गुलजार यांच्या सिनेमातले असे बारकावे मन वेधून घेतात.

परिचय या चित्रपटाशी लहानपणापासून ओळख होती पण त्याच्याशी परिचय विजय पाडळकर यांच्या पुस्तकाने करुन दिला.