Wednesday, March 26, 2008

फ़िटे अंधाराचे जाळे

फ़िटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
दरीखो-यातून वाहे
एक प्रकाश प्रकाश !
रान जागे झाले सारे
पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी संगे
जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य आले भरास भरास..

दंव पिऊन नवेली
झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने
आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास..

झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा
सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास..

सा-या रंगावर आली
एक सोनेरीशी झाक
भिडे काळजाला थेट
निळ्या क्षितिजाची हाक
तुझ्या नसण्याची कळ गेली तळास तळास... .

सुधीर मोघे

या गाण्याबद्दल मनात लिहावेसे खूप वाटत असूनही लिहिले नाही कारण श्रीधरजींची श्रवणीय परंतु रसिकांपर्यंत न पोहोचलेली गाणी निवडून त्याबद्दल लिहावे अशी इच्छा होती... कोणत्याही कार्यक्रमात फ़र्माईश होतेच ते हे गाणे.. या गाण्याबद्दल सर्वपरिचित गोष्टी म्हणजे..
१. हे लक्ष्मीची पाऊले या मराठी चित्रपटातील गाणे आहे.
२. हे सुधीर फ़डके व आशा भ्रोसले यांनी (अप्रतिम) गायले आहे.
३. मुलाच्या संगीतदिग्दर्शनाखाली वडिलांनी गायलेले गीत हे याचे अजून एक वॆशिष्ट्य..
४. यातील शेवटचे कड्वे चित्रपटातील प्रसंगाला अनुरुप नसल्याने ते द्वंद्वगीतात वगळले आहे...

गाणे म्हणून हे किती 'जमले' आहे.. ते त्याच्या लोकप्रियतेमुळे जाहीरच आहे.. पण गाणे झाले नसते तरी मूळ कविता अतिशय सकारात्मक दृष्टीकोन मांडणारी आहे.

अगदी वॆयक्तिक अशी एक आठवण माझ्यापाशी या गाण्याची आहे.. ..मनावर काजळी धरलेले काही अतिशय उद्विग्न क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात.. तसे ते माझ्याही आयुष्यात असतानाच्या काळात मी सिध्द समाधी योगाचा कोर्स केला. तो कोर्स करताना शेवट्चे चार दिवस आम्ही शांतिवन येथे गेलो होतो. मनात येईल ते गाणे म्हणा असे ठरले. खरे तर वेळ संध्याकाळची होती.. 'सांज ये गोकुळी' सारखे गाणे जास्त शोभले असते.. पण त्या वातावरणामुळे मनातला काळोख दूर झाला होता.. आणि माझ्या मनात हेच शब्द आले..
झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा
सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास

'फ़िटे अंधाराचे जाळे' या अल्बममध्ये हे स्वत: श्रीधरजींनी गायले आहे.. 'एक अनोखे लावण्य'.. किंवा 'सोनसळी अभिषेक' या शब्दातील 'चित्र' संगीत व सूर यांच्या साहाय्याने जिवंत झाले आहे..

सा-या रंगावर आली
एक सोनेरीशी झाक
भिडे काळजाला थेट
निळ्या क्षितिजाची हाक
तुझ्या नसण्याची कळ गेली तळास तळास..
हे चित्रपटात नसलेले शब्द.. Our sweetest songs are those that tell of saddest thought. Percy Bysshe Shelley.. किंवा हवेहवेसे दु:ख तुला जर हवेच आहे नकोनकोसे हळवे कातर बोलू काही.. या दोन्हीतले ते 'हवेहवेसे दु:ख' या श्रीधरजींनी गायलेल्या गाण्यात उतरले आहे.. 'रंग किरमिजी' .. 'अवेळीच केव्हा दाटला अंधार' .. या गाण्यांमधून असेच दु:ख झिरपते.. दु:खी दर्दभरी .. हळवी गाणी संवेदनाशील मनांना एक वेगळा आनंद देऊन जातात.. असे स्वर आहेत तलत मेहमूद किंवा मेहंदी ह्सन यांचे..

'मन मनास उमगत नाही' ने एक अस्वस्थता निर्माण होते.. तर 'फ़िटे अंधाराचे जाळे' या गाण्याने जगण्याची नवीन उर्मी प्राप्त होते..

सुधीर मोघे.. सुधीर फ़ड्के.. आशा भोसले व श्रीध्रर फ़ड्के यांनी हे गाणे अजरामर केले आहे

दिवे देहात स्पर्शाचे


दिवे देहात स्पर्शाचे जळाया लागले होते
तुझ्या बाहूत मी जेव्हा ढळाया लागले होते

ऋतू एकेक स्वप्नांचे फ़ुलाया लागले होते
तुझ्याशी रेशमी नाते जुळाया लागले होते

तुला मी सांगण्या आधी
मला तू सांगण्याआधी
मनातील एकमेकांना कळाया लागले होते

तुझ्यामाझ्यातील जेव्हा
गळाली बंधने सारी
सुखाचे शहर चंदेरी दिसाया लागले होते

दंवाने चिंब झालेल्या कळीचे फ़ूल होताना
पहाटे स्वप्नरंगांनी दिशा उजळून येताना
मला आकाश पूर्वीचे मिळाया लागले होते

गीत : अनिल कांबळे
संगीत : श्रीधर फ़डके
गायक : श्रीधर फ़डके / अनुराधा पॊडवाल
अल्बम : अबोलीचे बोल

अगदी एक सहज वाटणारं प्रेमगीत.. युगुलगीत.. असं या गाण्याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर होतं.. पण एके रात्री निवांतपणे गाडी चालवत असताना गाणं जरा जास्त लक्षपूर्वक ऎकलं. आणि त्यातील 'सुखाचे शहर चंदेरी' मला दिसले.

तुला मी सांगण्या आधी
मला तू सांगण्याआधी
मनातील एकमेकांना कळाया लागले होते

याचा अनुभव प्रेमात पडल्यावर येतो... पण

तुझ्यामाझ्यातील जेव्हा
गळाली बंधने सारी
सुखाचे शहर चंदेरी दिसाया लागले होते..

ही बंधने किती आणि कोणती 'गळाली' हे ज्याचे त्याने ठरवावे.. ती गळाली आहेत हा अनुभव फ़ार फ़ार वॆयक्तिक असतो. आणि ती जाणीव फ़ार सुखद असते. कारण

प्रीतीची वाट नेहमीच जात असते अथांग जळातून
वाळूवरच्या पावलांनी तिचा माग लागत नसतो..

पण एकेक पापुद्रा निघत जातो.. तसतसे त्या रेशमी नात्यातील पदर उलगडत जातात.. यात 'मी' पणाचेही बंधन कधीतरी गळून पडते.....

जवळपणात होतो दूर आता दुरून झालो जवळ
म्हणू नकोस जाणूनबुजून मीच माया केली पातळ

तशी आठवण येत नाही भेटीचीही काय जरूर ?
सूर वाहे ऊर भरुन घरांत देखील चांदणे टिपूर

इतके दिवस हसत रुसत वाटले सृष्टीत नटली आहेस
आता कळते खोल खोल माझ्याच दॄष्टीत मिटली आहेस

गंध होऊन हुलकावण्यांनी अवतीभवती राहिलीस खेळत
आता माझ्यात श्वास होऊन वहात असतेस सहज नकळत

कधी कामात कधी गाण्यात फ़ुलताफ़ळता भानात नसतो
तुला विसरुन अष्टौप्रहर तुझ्यात असतो

आता तारे पिकत चालले आकाश झाले निरभ्र निवळ
दुरुन जवळ झालो तसे क्षितिजदेखील आले जवळ...

बा.भ.बोरकर

'तुला विसरुन अष्टौप्रहर तुझ्यात असतो'.. यात सगळी बंधने गळाली आहेत असे लक्षात येते.

दंवाने चिंब झालेल्या कळीचे फ़ूल होताना
पहाटे स्वप्नरंगांनी दिशा उजळून येताना
मला आकाश पूर्वीचे मिळाया लागले होते

प्रेमात पडल्यावर परत एकदा आयुष्यातले सोनेरी दिवस जागे होतात..

आकाश पाणी तारे वारे सारे
सारे सारे ताजे होतात
वर्षांच्या विटलेल्या बधीर मनाला
आवेगांचे तुरे फ़ुटतात..

याचा प्रत्यय येतो..

पाऊस या विषयाप्रमाणेच प्रेम या विषयावर कविता न लिहिलेला कवी सापडणे दुर्मिळ..

'ऋतू एकेक स्वप्नांचे'.. खरोखर फ़ुलाया लागले आहेत असे वाटावे असे ते शब्दोच्चार येतात.. श्रीधरजींची युगुलगीते फ़ारशी नाहीत. पण या कवितेशी. गाण्याशी मनाचे नाते या गीतातून नक्कीच जोडले जाते..

Tuesday, March 25, 2008

सल..

सल..

संध्याकाळची हुरहुर लावणारी वेळ.. रिकामपण असेल तर मनात अशा वेळी हमखास कातर आठवणी जाग्या होतात. शांता शेळके यांच्या

कोमल हळवी उदास झाली मावळतीची किरणे
आतआतूनी दाटुन आली विस्मृत काही स्मरणे..

या ओळी आठवल्या. आज तर अचानक मोबाईलवर एक मेसेज आला होता. त्या मेसेज पाठविणा-या व्यक्तिचे नाव पाहून ती अजूनच हळवी झाली.. मन थेट दहा वर्ष मागे गेले..

डोळ्यात आनंदाची फ़ुलपाखरे घेऊन ती अल्लडपणे नाचतच घरी आली. शनिवार रविवार शाळेला सुट्टी .. थोडा गृहपाठ संपवला की टीव्ही बघायला, लायब्ररीतील पुस्तक वाचायला ती मोकळी होणार होती.. आल्या आल्या आई रागावली.. “अगं गधडे.. आता तू लहान आहेस का? नववीत गेलीस तरी नाचानाच थांबत नाही तुझी..!”

ती काहीच बोलली नाही. तितक्यात टेबलाजवळ खुर्ची ओढून मटारचे दाणे सोलणारा इंद्रनील तिला दिसला. इंदरदादा आला की नेहमीच त्याच्या आत्याला म्हणजे तिच्या आईला मदत करायचा. आई त्याच्याशी माहेरचा माणूस म्हणून गप्पा मारण्यात रमून जायची. तो लहान असल्यापासून मोठ्या भावाचा मुलगा.. असे ममत्वाचे, जिव्हाळ्याचे नाते आईचे त्याच्याशी जडलेले तिला जाणवायचे.

आत्तादेखील आता नेहमीप्रमाणे मटारची उसळ न करता ’सामोसे’ करायची स्पेशल फ़र्माईश इंद्राने आत्याला केलीच होती. आणि सामोसे हवे असतील तर मुकाट्याने मटार सोलायचा त्याला हुकूम मिळाला होता.

झाले..आईला आता दोन दिवस तिच्याकडे लक्ष द्यायला फ़ार वेळ मिळणार नव्हता.. बाबा शनिवार रविवारी फ़क्त यायचे.. त्यांनाही या रविवारी यायला जमणार नव्हते.. तिच्या भावविश्वातील कार्यक्रमांना काहीही अडथळा नव्हता. आता पटापट अभ्यास संपवून मस्तपॆकी आवडती गाणी ऎकत.. कांदबरी घेऊन स्वत:च्या कोशात शिरणे फ़ार सोपे झाले होते..

सोपस्कार म्हणून जेवणाच्या टेबलावर ती आई व इंदरदादाबरोबर जेवायला बसली. नेहमी ती त्यांच्या ’नातेवाईकांच्या’ गप्पात नसेच. पण अचानक रेडिओवर ’चुपके चुपके’ ऎकू आली.. आणि दादा म्हणाला.. “अरे वा.. हा तर गुलाम अली”.. ती तिला नव्यानेच प्राप्त झालेले ज्ञान प्रकट करत म्हणाली ’हे तर निकाह या सिनेमातील गाणे आहे. मला फ़ार आवडते’. मग इंदरदादाने तिला गुलाम अली हा कसा एक गजल गायक आहे.. ही त्याची लोकप्रिय गजल आहे.. म्हणून सिनेमात घेतली आहे.. इ.इ. तपशील पुरवले.. तसेच त्या रेकॉर्डमधे नसलेले दोन शेर अर्थांसहित उलगडून दाखविले..

जेवणाच्या टेबलावर मग स्वत:ला नव्याने आवडायला लागलेला एक क्रिकेटवीर..त्याचे पोस्टर.. नव्याने प्रदर्शित झालेला एक ’लव्हस्टोरी’ असलेला सिनेमा. त्यातला नवोदित हिरो.. आवडत्या कविता.. पुस्तके.. मनाला अचानक आवडायला लागलेल्या आर्ट फ़िल्मस.. हे सगळे इंदरदादाशी किती बोलू अन किती नको असे तिला होऊन गेले.. त्या सगळ्यातली त्याला किती माहिती आहे हे जाणवून ती स्तिमितच झाली.

दोन दिवस स्वत:च्या विश्वात घालविण्याचा निर्धार कुठल्या कुठे पळून गेला. आणि इंदर पण त्याच्या मावशीकडे जायचा होता तो न जाता त्यांच्याकडेच थांबला. रात्री पण ब-याचवेळ त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. मग रात्री बारा वाजता कॉफ़ीचा एक राऊंड झाला… परत गप्पा.. पहाटे कधीतरी ती भारावलेल्या मनाने झोपी गेली.

रविवारची सकाळ एकदम सुंदर उजाडली. बागेतील जुईच्या फ़ुलांचा गजरा आपल्या लांबसडक वेणीवर माळून व नव्यानेच शिवलेला एक चुडीदार घालून ती तयार झाली. दादाच्या एका हॉस्टेलवर रहाणा-या मॆत्रिणीला भेटायचे ठरले होते. मग काय .. तिला हॉस्टेलपर्यंतचा रस्ता चांदण्यांच्या पायवाटेसारखा भासला. त्याच्या मॆत्रिणीला भेटणे, हॉटेलमध्ये जाणे, दादाने स्वत:च्या मॆत्रिणीला हिची ’हुशार आहे हं अगदी’ अशी करून दिलेली ओळख.. सगळे काही तिला सुगंधी, हळव्या स्वप्नांसारखे भासत होते.

दोन दिवस आलेला इंदर तिच्या आयुष्यात एक अनोखे दालन उघडून त्याच्या नोकरीच्या गावी निघून गेला. मग तिला काही दिवस एकदम सुने सुने वाटले. मॆत्रिणींना त्याच्याबद्दल सांगून झाले होते.

दहा बारा दिवसात मग एक नवल घडले. आईला आलेल्या इंदरच्या पत्राच्या पाकीटात एक पत्र तिच्यासाठीही होते. त्याने इतर गोष्टींबरोबरच स्वत:ची एक कविता लिहून पाठवली होती. नोकरीला लागल्यापासून कविता करणे विसरलो होतो पण ’तिच्याशी’ गप्पा झाल्याने परत कविता स्फ़ुरल्याचा आवर्जून उल्लेख त्यात होता. पत्ररूपाने त्याच्याशी संवाद साधणे त्यानंतर सुरू झाले.. त्याच्या पत्रातल्या ’बूर्ज्वा’ या शब्दाचा अर्थ तिला कळलाच नाही. तेव्हा मग त्या एका ’शब्दावर’ त्याचे चार पानी लांबलचक उत्तर आले. शाळा, अभ्यास, परीक्षा यात दिवस आनंदाने जात होते. आणि त्या आनंदात या पत्रांच्या संवादाची भर पडत होती.

त्याला पत्रात लिहीण्यासाठी कविता जमवणे (कधीतरी स्वत: लिहिणे) चालू झाले.. एखादे पुस्तक ..चित्रपट आवडला की त्याच्याबरोबर ’शेअर करायला हवे’ हे आपोआप मनात यायचे.
इंदर दिवाळीत, मे महिन्याच्या सुट्टीत येत राहिला .तो असायचा तेवढे चार पाच दिवस नुसती धमाल असायची. एका सुट्टीत तो आला आणि एका सिनेमाची तिकीटे काढली आहेत असा फ़ोन आला. ती तिच्या मावसबहिणीसोबत थिएटरवर पोहोचली तोपर्यंत जरा उशीरच झाला होता.. इंदर सहज म्हणाला.. “आली नसतीस तर तिकीटे फ़ाडून टाकणार होतो”… ती पाहातच राहिली. आता अकरावीत.. कॉलेजमध्ये नुकतीच गेलेली ती.. इंदरबरोबर एक लोभस नाते तयार होत होते. कॉलेजमध्ये तिला इतरही मित्रमॆत्रिणी मिळाले होते. पण या नात्यात जास्त आनंद होता.

इंदरच्या बहिणीचे लग्न झाल्यापासून त्याच्या लग्नाचाही नातेवाईकांनी धोषा लावला होता. तीही त्याच्यात सामील झाली.. त्याला त्याच्या हॉस्टेलवरच्या मॆत्रिणीवरुन चिडवून झाले. मग एकदा लग्न व लग्नसंस्था यावर त्याच्याशी बोलणे हे ओघाने आलेच.

कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या दिवाळीच्या सुट्टीत इंदर आला. त्याने मुलगी पसंत केल्याची बातमी तिला मावसबहीणीकडून कळली होतीच. त्याचे मधल्या काळात पत्रही नव्हते.. त्याच्यावर ’मला का सांगितले नाहीस सर्वांच्या आधी’ असे रूसण्याचे मनात पक्के झाले होते. पण यावेळेला तिच्या एकटीशी इंदर बोललाच नाही. जो काही आला तो माणसांच्या गराड्यात.. आईला ती म्हणालीसुध्दा ’नेहमी तर पत्र पाठवतो मला.. मग ही आयुष्यातील महत्त्वाची बातमी का नाही कळवली. मी रागावले आहे त्याच्यावर’.. त्यावर शांतपणे आई म्हणाली ’अगं गडबडीत राहून गेलं असेल’.. ’मला’ सांगायला गडबडीत राहून गेलं.. डोळे नकळत पाण्याने भरले..

त्यानंतर एका नातेवाईकांकडे इंदर भेटला. बाहेर पडताना ते दोघेच बाहेर पडले. तो गप्पगप्पच होता. तो काहीतरी सांगेल अशी काही क्षण वाट बघून तिनेच न राहवून विचारले.. ’कशी आहे मुलगी… नाव काय आहे ? फ़ोटो तरी दाखव’.. मला तुझ्या लग्नाची साडीच घे बरं का” .. त्यावरही जुजबी उत्तरे देऊन त्याने विषय बदलला. तिचे कॉलेज कसे चालले आहे हे आवर्जून विचारले. खूप ठाम स्वरात म्हणाला.. नीट शिक.. तू फ़ार हुशार आहेस. मनात आणलंस तर कुठल्या कुठे जाशील. बोलता बोलताच त्याने एक रिक्षा थांबवली आणि तिला त्यात बसवून देऊन रिक्षावाल्याला पत्ता सांगितला..

तिच्या तोंडून तर शब्दच फ़ुटेना.. त्याला तिची पर्वा नाही म्हणावे तर त्याचे आत्ताचे शब्द काळजीतून आलेले होते.. मग लग्नाच्या बाबतीत का विषय टाळत होता तो ? घरी परतताना तर नुकताच घडलेला प्रसंग खरा आहे असे वाटतच नव्हते.. मग कित्येक दिवस आणि रात्री ’तो असा का वागला ?’ याच विचारात गेल्या.

लग्नाचे रीतसर निमंत्रण आले. आईने किती आग्रह केला तरी परीक्षा, अभ्यास याची कारणे सांगून तिने जाणे टाळले. तिचे शिक्षण पूर्ण झाले. नोकरी मिळाली..लग्न झाले.. मनासारखा जोडीदार लाभला. हळूहळू इंदर शेवटी जाताना असे का वागला हा प्रश्न मनाआड गेला..

आणि आज त्याच्या अचानक आलेल्या मेसेजने तो सल परत बोचायला लागला.

आज अचानक ’त्या’ मेसेजने सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. मनाच्या तळाशी काहीतरी खोलवर जाऊन दडलेले असते.

इंदर त्याच्या ऑफ़िसच्या कामासाठी तिच्या शहरात येणार होता. भेटता येईल का? असा मेसेज होता. त्यांचे नाते पहाता त्याला घरी रहायलाच बोलविणे तिला आवडले असते. पण मधल्या काळात एक दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे एक दिवस संध्याकाळचे ’जेवायला ये’ असे निमंत्रण देऊन तिने त्याक्षणी मनातले विचार थांबविले.

ठरल्यादिवशी, ठरलेल्या वेळेला घरातील सर्वांसाठी रीतसर भेटवस्तू घेऊन इंदर आला. . सूपपासून स्वीट डिशपर्यंत नीट जेवण झाले. सुपारी झाली. जेवताना नवीन पुस्तके, चित्रपट, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम या विषयावर चर्चा झाल्या.

कोणे एके काळी इंदरला किती माहिती असते याचे तिला किती आकर्षण वाटले होते. आता तिलाही त्या सगळ्या विषयांमध्ये माहिती होतीच.. हरवला होता तो संवादातील सहजपणा. संवादात मोकळेपणा,
दुस-याशी शेअर करण्याची वृत्ती असणे आणि छाप पाडण्यासाठी माहितीचे प्रदर्शन करणे वेगळे असते. .. त्यामुळे इंदर उगाचच छाप पाडण्यासाठी ते सगळे संवाद वाढवतो आहे असे वाटले.

तिने मनाशी परत विचार केला. पूर्वग्रह मनात धरुन बघत होती का ती या सगळ्याकडे ? तिची हुशारी मनमोकळेपणाने कबूल करणारा इंदर आता तिच्यावर कुरघोडी करण्यासाठी बोलत होता. मूळ विषय बाजूला राहून ’मला किती माहिती आहे’ हेच सारखे त्यातून प्रकट होत होते.

बोलता बोलता रात्र अंधारली. घरातल्या सगळ्यांचा ऒपचारिक निरोप घेणे झाले. त्याला सोडण्यासाठी म्हणून ती बंगल्याच्या फ़ाटकापर्यंत आली. जुईचा गंध आवडणारी तिच्यातली ’ती’ तशीच होती. आणि अचानक तिला जाणीव झाली.. की पाऊस पडतो आहे. घरात बसून ते कळलेच नव्ह्ते. नाजूकसे थेंब पडत होते. जुईच्या पाकळ्यांवर अलगद पाऊस थरथरत होता. बागेतल्या दिव्याच्या प्रकाशवलयात पावसाचा शिडकावा दिसत होता. मनाला सुगंधित करणा-या त्या वातावरणात ती अजूनच हळवी झाली.

अनेक वर्षापूर्वी इंदर अचानक का सोडून गेला ते तो सांगेल.. त्याने ते सांगावे अशी अपेक्षा तिच्या मनात आली. त्या विचाराने ती विलक्षण चकित झाली. मनाच्या कप्प्यात ’तो अचानक गेला’ हा सल .. व त्याचबरोबर एकदा कधीतरी त्याने त्याचे कारण सांगावे ही अपेक्षा हातात हात घालून होती याची एखाद्या साक्षात्कारासारखी तिला जाणीव झाली.
स्वत:च्या मनाला आपण पूर्ण ओळखतो असे तिला नेहमी वाटे.. आज लक्षात आले की.. नात्यातले अनेक धागे, पीळ, गुंफ़ण आपल्या मनातील अदृश्य पातळीवर असतात.

हा सगळा मॆलोगणती प्रवास तिच्या मनाने काही सेकंदात केला. त्याला मात्र ते कळलेही नाही. इतकी वर्षे तिने बाळगलेली वेदना त्याच्या खिजगणतीतही नव्ह्ती. ऑफ़िसच्या ज्या कामासाठी तो आला होता त्याबद्दल तो आत्मीयतेने बोलत होता. त्यातही तिला उगाचच वाटून गेले की तो स्वत:चे काम, पंचतारांकित हॉटेलातील वास्तव्य याचे प्रदर्शन करतो आहे. परदेशात जाण्याच्या संधीचा आवर्जून उल्लेख त्यात होता. तिने व तिच्या नव-याने स्वखुषीने परदेशातील मानाच्या संधी सोडून भारतात राहणे स्वीकारले होते. तिचे १०-१२ देश बघून झाले होते.. ते इंदरला खुपते आहे म्हणून परदेशात जाण्याच्या संधीचा उल्लेख होतो आहे का?

“उगीचच असाच विचार करू नकोस.. “ स्वत:च्या मनानेच तिला फ़टकारले.

“परत भेटू.. “ इंदर जाताना म्हणाला. त्याच्या घरी यायचे आमंत्रण त्याने दिले नाही हा विचार तिच्या मनात अकारण चमकून गेला.

इंदर ’त्यावेळी’ असा का वागला हे कधीतरी परत भेटला की सांगेल ही आशा बाळगणे जास्त सोपे होते. आपण आपल्या जवळच्या माणसाकडून केलेली अपेक्षा त्याला समजली नाही हा नवीन सल मात्र आता कायमचा सोबती होता.

समाप्त..

संचित..

संचित..

स्टेशनचा गजबजलेला परिसर.. लोकल पकडण्याची प्रत्येकाची धांदल.. कोणाच्या मनात शानिवार, रविवार आता आनंदात घालवायची स्वप्ने.. कोणी शुक्रवारची संध्याकाळ ’ति’च्या सहवासात घालविण्यासाठी आतुर.. कोणी दोन दिवसांची सुट्टी एकट्याने कशी घालवावी या चिंतेत.. तर कोणी पाच माणसांच्या घरात एकांत कसा मिळेल याचा मनात विचार करतो आहे.

त्याच्याही मनात एक विलक्षण व्याकुळता.. लोणावळ्याला जाणारी लोकल पकडण्याची ही पहिली वेळ नव्हेच.. नोकरीच्या निमित्ताने पाच वर्षापूर्वीपर्यंत तर ते रोजचे आयुष्य होते.. मग पुण्यात नोकरी मिळाली. सुंदर, समजूतदार बायको.. एकुलता एक मुलगा.. घर, गाडी .. सगळे काही गेल्या पाच वर्षात जमले. आईला समजून घेणारी बायको मिळाल्याने तो दॆवावर जास्तच खुष होता. वडील गेल्या वर्षी गेले.. सावत्रपणाचा दुरावा वडिलांच्या वागण्यात कधी आला नाही. ते गेल्याचे दु:ख ताजे होते..

पण.. पण स्वत:च्या सख्ख्या वडिलांना न पाहिल्याची खंत मनातून कधीच गेली नाही. आईला जास्त वाईट वाटेल म्हणून शाळेत कालेजमध्ये मित्रांसोबत झालेली चर्चा तो घरी कधीच बोलून दाखवत नव्ह्ता.. पण मित्रांचे वडिल हक्क दाखवून रागवायचे.. चुकीच्या गोष्टींवर डाफ़रायचे.. ते ’सुख’ त्याला लाभले नाही. हा आपला सख्खा मुलगा नाही हे त्याच्या सावत्र वडीलांच्या मनातून कधीच गेले नाही. भरपूर खेळणी.. खाऊ.. कपडेलत्ते.. हवे ते शिक्षण घेण्याची मुभा .. सगळे काही त्यांनी दिले.. पण एक अंतर दोघांच्या दरम्यान कायम राहिले..

आईचे दु:ख त्याला लहानपणापासूनच जाणवायचे. अतिशय विलक्षण पध्दतीने तिची व वडिलांची ताटातूट झालेली होती. १९४५ च्या काळात त्याचे आजोबा मुलानातवंडांना घेऊन कराचीला उद्योगधंद्यासाठी गेले.. दोन वर्षे सगळे आलबेल होते. भारत पाकिस्तान फ़ाळणी ही स्वातंत्र्याची किंमत घेऊन आली..

त्याच धामधुमीत दंगली उसळल्या आणि त्याच्या वडिलांची इतर कुटुंबियांशी ताटातूट झाली. पुष्कळ शोध घेऊनही ते सापडले नाहीत. आपला जावई दंगलीत मारला गेला या विचाराने कितीही दु:ख झाले तरी ते दाखवायलाही क्षणाची उसंत नव्हती.
नाईलाजाने आजोबा लेकीला व नातवंडांना घेऊन भारतात परत आले. त्याची आई तेव्हा जेमतेम पंचविशीची.. तिच्यासमोर तर सगळे पुढचे आयुष्य पडले होते.. दोन मुले पदरात होती.. शिक्षण फ़ारसे नाही.. आजोबांनी एक धाडसी निर्णय घेऊन मुलीचे एका होतकरू तरूणाशी मुलीचे लग्न लावून दिले.

यावेळेस तो होता जेमतेम पाच वर्षांचा. पुढचे जीवन सुखात गेले. पण मनावर एक चरा उमटलेला घेऊन.. वडिलांचा फ़ोटोसुध्दा कधीच पाहिलेला नव्हता..

वर्षांमागून वर्षे उलटत गेली. काळ कधीच कोणासाठी थांबत नसतो. आणि अखेरीस कोणाचेच कोणावाचून अडत नसते. मनात एक ठसठसणारी वेदना घेऊन आपण सर्वजण पुढे जातो.

मागच्या आठवड्यात मात्र या सगळ्याला छेद देणारी एक विलक्षण घटना घडली. त्याला एक फ़ोन आला.. “….. तुम्हीच ना ?”

“होय , बोला काय काम आहे”?

“हं.. काम जरा वॆयक्तिक आहे.. आपण भेटू शकतो का?”

अनेकविध विचार त्याच्या मनात डोकावून गेले.

पण अखेरीस फ़ोनवर पलीकडच्या माणसाच्या बोलण्यातल्या आर्जवाला त्याने होकार दिला. दोन दिवसांनंतर संध्याकाळी एका हॉटेलमध्ये भेट ठरली. अतिशय उत्सुकतेने तो ठरलेल्या ठिकाणी वेळेच्या आधी पोहोचला.

’तो’ आलेलाच होता.. अंदाजावरुन त्याने नाव विचारुन पडताळणी केली व हस्तांदोलन घडले.

त्याला पाहिल्यापासून काहीतरी विलक्षण भावना मनात दाटत होत्या.

त्या माणसाने त्याला स्वत:चे पूर्ण नाव सांगितले .. ते ऎकून तो उडालाच. त्याच्या सख्ख्या वडिलांचे आईने सांगितलेले नाव त्याही माणसाच्या वडिलांचे होते..

“कसे शक्य आहे ?.. जाऊ दे.. एकाच नावाच्या व आडनावाच्या दोन व्यक्ती असणे फ़ार दुर्मिळ नाही..” दुस-या मनाने लगेच उत्तर दिले..

तो पुढे ऎकू लागला. तो माणूस हसला.. म्हणाला.. ’होय, तुझ्या मनात जे विचार चाललेत ते योग्य आहेत’. तुझे व माझे वडिल एकच होते.. “

“पण हे कसे शक्य आहे ?.. ते तर कधीच ..कित्येक वर्षांपूर्वीच गेले. आणि मी एकटाच मुलगा आहे त्यांचा..” हा म्हणाला.

तो माणूस म्हणाला.. “नाही.. ते पाकिस्तानातून जीव बचावून कसेबसे आले. तुम्हा सर्वांचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला. तुम्ही सापडला नाहीत. मग त्यांनी पुनर्विवाह केला. माझा जन्म झाला. तुम्हा सर्वांची ते खूप आठवण काढायचे. त्यांच्या दृष्टिने तुम्ही दंगलीत मारले गेलात. अनेकदा त्यांच्या ओठांवर तुझे नाव यायचे. मागच्या वर्षी ते गेले. मागच्या महिन्यात अचानक तुला पुरस्कार मिळाला तेव्हाचा तुझा फ़ोटो व त्याखालचे नाव पाहून मी चमकलो. मग माहिती काढत गेलो. तुझ्या आईची माहिती कळली.. मग खात्री पटली की आपण दोघे भाऊ लागतो. तुझा फ़ोन नंबर शोधून फ़ोन केला. आणि आज आपण येथे आहोत”.

समाप्त

एक वेस ओलांडली..


एक वेस ओलांडली गाव एक दूर राहिले
एकट्याच वाटेस या दिशांनीच सांभाळले

इथेच मधेच क्षणॆक उगाच का मी थांबलो
सावलीत माझिया एकटा विसावलो
पुन्हा उन्हात चाललो
एक वेस ओलांडली गाव एक दूर चालले


उसासे फ़ुलांचे खुलासे सनांचे का मी ऎकतो
मातीच्या उरातल्या स्पंदनात गुंगतो पुन्हा मनात भंगतो
पावलास स्पर्श सांगतो गाव दूर दूर थांबले

संपल्या जुन्या खुणा जरी नवा ठसा दिसे प्रवासी पुन्हा
हाच खेळ संचिती असे
एक वेस ओलांडता गाव नवे दिसू लागले..


It is always important to know when something has reached its end. Closing circles, shutting doors, finishing chapters it doesnt matter what we call it; what matters is to leave in the past those moments in life that are over.

कोणतेही आयुष्यातील आवर्तन पूर्ण करण्याची वेळ आली आहे हे ओळखणे ..ते योग्यपणे पूर्ण करणे..आणि भूतकाळ मनातून काढून टाकून जगणे या तीन टप्पे हे गाणे विशद करते.

पण

बेनाम सा यह दर्द ठहर क्यूं नहीं जाता
जो बीत गया हॆ गुजर क्यूं नही जाता

अशी अवस्था भूतकाळातील कोणत्याही घटनेबद्दल सर्वांचीच असते.

आयुष्यातील एक प्रकरण संपवून या गाण्यातील प्रवासी दूर निघाला आहे. वाटेत उन आहे..आणि फ़क्त स्वत:ची सावली..जुन्या आठवणींनी क्षणभर थबकणे साहजिक आहे.पण पुढे निघणे तितकेच अपरिहार्य..

पण या जुन्या अनुभवाने 'तो' निराश झाला असला तरी हताश नाही.कळ्याफ़ुलांच्या हाका..मातीतून इवले लवलवणारे कोंब त्याला खुणावतात..आयुष्य जगण्यासाठी आहे या़ची एकीकडे प्रचीती येत असतानाच मनात ती दुखरी ठसठ्सती कळ उमटते..ह्रुदय भंगते..'तो' गाव दूर गेल्याची वेदनाच नुसती उरते.

नवीन काहीतरी हाका घालतंच..जरा प्रवास केल्यावर नवी वेस दिसते..नवीन घाव सोसण्यासाठी 'तो' परत एकदा सिध्द होतो.

अतिशय सकारात्मक द्रुष्टिकोन मांडणारं हे गाणं आहे. वरवर जरी मागे गेलेला गाव ही एक प्रेयसी वाटली तरी प्रत्यक्षात 'ती' शिक्षणाची संधी,नोकरी,हुकलेले काहीही असू शकते..किंवा कोणतेही नाते असू शकते. मागे काही गेले याची अवाजवी खंत न बाळ्गता आयुष्याचा प्रवास 'पुढची वेस' दिसेपर्यंत उमेदीने..सगळे क्षण 'जगत' चालू ठेवायचा असतो हे समर्पकपणे सांगणारे गीत.

श्रीधरजींनी गाण्यातून ही कविता आपल्यापर्यंत पोहोचविली आहे हे त्यांचे ऋण मानायला हवे.संगीत नेहमीप्रमाणेच योग्य.पहिल्या कडव्यात 'तो' निराश आहे हे आणि शेवटच्या कडव्यात 'सावरला' आहे हे उच्चारांच्या किमयेतून कसे कळते ते मुळातून अनुभवायला हवे.'क्षणॆक' मधे 'क्षण' थांबल्याचा भास होतोच. 'हाच खेळ संचिती असे' यात 'दॆव' याबद्दल एक हताशता जाणवेल असा 'संचित' हा शब्द कानावर येतो. एखाद्या लांबलचक बोगद्यातून प्रकाशकिरणाच्या टोकाकडे श्रीधरजीं आपल्याला या गाण्यातून प्रवास घडवितात.

हे गाणे ऎकताना निरनिराळ्या संदर्भात गुलजारचे 'मुसाफ़िर हू यारों' आठवतेच..विशेषत: 'एक राह रुक गयी तो ऒर जुड गयी' ही ओळ..

जळण्याचे बळ तूच दिले रे


. जळण्याचे बळ तूच दिले रे, दे आता जगण्याचे
कणकण फ़ुलण्याचे बळ दिधले, तसेच दे झिजण्याचे

आकाशासम धुंद बरसलो रचित दिनान्त दिगंती
माध्यान्हासम क्षालो दधी मज पिऊ दे शांत निवांती
मत्त चांदणे प्यालो त्यापरी घनतम गिळू दे आता
अगणित नक्षत्रांच्या द्वारे जड होई तो माथा..

धुवाधार मी प्रपात झालो जॆसा लक्ष स्वरांचा
जाऊनी उगमी भेदू दे मज स्थिरही मदिरी मॊनाचा
आनंदांकुर होऊन जॆसा आलो रुपाकारा
सुटूनी त्यातून घेऊ दे मज मूळ अरुप निवारा..

बा.भ.बोरकर..


१. हे गगना अल्बममधील श्रीधरजींनी संगीत दिलेले व स्वत: गायलेले हे गीत.. त्यांचा आवाज या गाण्यात सुधीर फ़डकॆ यांच्यासारखा वाटतो. पण बाज स्वतंत्र आहे. मला ही कविता आणि गाणे दोन्ही अतिशय प्रिय आहे.

संगीत सुरेख.. 'पिऊ दे शांत निवांती'.. मधला 'निवांतपणा' .. 'धुंवाधार प्रपाताचा' रोरावत येणारा आवाज.. 'आनंदांकुर' मधला खरोखर गवताचे वा-यावर डोलणारे पाते डोलावे तसा हेलकावा.. 'अगणित' शब्दातून निर्माण होणारा अगणितपणा.. संगीत, शब्दोच्चार व आवाज यांच्या साहाय्याने प्रकट होते.

'त्या नदीच्या पार वेड्या यॊवनाचे झाड आहे'.. किंवा 'जपानी रमलाची रात्र' अशा कविता लिहिणा-या बोरकरांची ही जरा तत्वज्ञानाकडे झुकणारी कविता..आपल्या पुलंनी त्यांच्यावर 'बाकीबाब : एक आनंदयात्री' असा अप्रतिम लेख लिहिलेला आहे.. त्यातून मला बोरकर प्रथम भेटले..

यज्ञी ज्यांनी देऊनी निज शिर.. घड्ले मानवतेचे मंदिर..
परि जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती..
तेथे कर माझे जुळती..

या गाण्याने त्यांच्या कवितेशी परिचय वाढला.. ..

ही वरची कविता

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाचि अंत..

या ओळींसारखा आहे.. जीवनात चढावर सगळे खुष असतात.. वार्धक्य ..उतरता काळ कोणालाच नको असतो. तारुण्य भोगायचे सामर्थ्य मागावे लागत नाही.. पण विझण्यासाठी बळ मागावे लागते.. सगळ्या चांगल्या क्षणांमधे आपण कधीच मला हे सुख का लाभले ?.. असे विचारत नाही. दु:खात मात्र माझ्याच नशिबी हे का ? असे सह्ज म्हणतो..

मत्त चांदणे प्यालो त्यापरी घनतम गिळू दे आता..

या ओळीत तो अर्थ आला आहे..

आनंदांकुर होऊन जॆसा आलो रुपाकारा
सुटूनी त्यातून घेऊ दे मज मूळ अरुप निवारा..

यात मात्र सरळ अरूप म्हणजे देहाच्या पलीकडे जाण्याचे मागणे आहे. चॊ-याएंशी लक्ष योनींनंतर मानवाचे आयुष्य लाभते असे म्हणतात.. त्यामुळे सर्व संत महात्मे या जन्मानंतर जन्म मरणाच्या फ़े-यातून सुटका मागतात.. तेच मागणे बोरकरांनी यात मागितले आहे.. हे गाणे सुरु झाले की संपेपर्यंत आपल्याला खिळवून ठेवते.. फ़ुलणे आणि विझणे श्रीधरजी अचूक उभे करतात

.असे विझण्याचे बळ मागणारा कवी एकीकडे..

तुला कसे कळत नाही फ़ुलत्या वेलीस वय नाही..
क्षितिज ज्याचे थांबले नाही त्याला कसलेच भय नाही..
त्याला कसलाच क्षय नाही त्याला कसलेच भय नाही...

असेही सहज लिहून जातो.. अशी क्षितिजाकडे द्रुष्टी असणा-यांना विझण्याचे बळ मागावे लागत नाही. ते मिळतेच.

काही बोलायाचे आहे


काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची कधी फ़ुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गल्बत रुपेरी
त्याचा कोश किनार्यास कधी लाभणार नाही

तुझ्या क्रुपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्यात कधी तुला जाळणार नाही

कुसुमाग्रजांची एका अतिशय मनस्वी माणसाचे ह्र्दगत व्यक्त करणारी कविता. गाणे म्हणून ऎकण्याआधी अनेक वर्षे मला ही माहिती होतीच. माझ्या स्वत:च्या स्वभावाशी साधर्म्य सांगणारी म्हणून लाडकी.. यात खरे चटका लावते ते शेवटचे कडवे..

तुझ्या क्रुपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्यात कधी तुला जाळणार नाही

'प्रेम कुणावर करावं' हे अतिशय महान,चिरंतन सत्य सांगणार्या कुसुमाग्रजांनी या वरील दोन ओळींत 'प्रेम कसं करावं' हे अदभुतपणे सांगितलं आहे असं मला नेहमी वाटतं.

एखाद्याने / एखादीने आपल्या आयुष्यात आणलेले प्रेम हे त्याचा 'धनी' झालो म्हणून क्रुतज्ञ पणे त्याचा स्वीकार आणि आनंद मानावा..त्याचा कोणताही त्रास त्याला /तिला होऊ नये याची काळजी घ्यावी हे महान तत्व यात आले आहे.

श्रीधरजींना लोक 'फ़िटे अंधाराचे जाळे' 'ओंकार स्वरुपा' इतकेच या गाण्यासाठी ओळखतात. यातील भाव गाण्यात फ़ारच योग्यपणे व्यक्त झाले आहेत. मनस्वीपणा जाणवतो.हे शब्द उच्चारणारा माणूस एकाकी आहे पण हेकट, दुराग्रही नाही..तो कलंदर आहे..'हम हॆ राही प्यारके' अशी त्याची मनोव्रुत्ती आहे.. ते यात गाणे म्हणून स्पष्ट होते. 'एकटा मेघ' 'गल्बत' इतर अनेक गाण्यांप्रमाणेच उच्चारांवरुन नजरेसमोर येऊन मन व्याकुळ करते. शेवटच्या दोन ओळी जास्त ठासून म्ह्टल्या जातात कारण तोच त्याचा सारांश आहे.

श्रीधरजींचा वेगळेपणा मला जाणवून त्यांच्या गाण्याच्या प्रेमात मी पडले त्यातील हे पहिले गाणे..

दोन रात्रीतील आता


दोन रात्रीतील आता संपला वेडेपणा
वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा

वाजली वेडी कडी अन दार हे शहाण्यापरी
मोगरा माळून आला देखणा वेडेपणा

उंबरा ओलांडताना धीट हे झाले धुके
ही धिटाई झेलताना लाजला वेडेपणा

अजून मजला कळत नाही वेड कोणी लावले
वेड मज हा लावणारा कोणता वेडेपणा..?

या गाण्याबद्दल 'अजून मजला कळत नाही वेड कोणी लावले' या शेवटच्या ओळी माझ्यासाठी अ़क्षरश: खर्या आहेत. यातील शब्द,स्वर,उच्चार ..भावार्थ कोणी खरे वेड लावलेले आहे ते आजतागायत कळलेले नाही. 'ओलांडताना'मधला 'लां' लांबविलेला आहे. नीट ऎकले तर 'ओलांडून' ती मुग्ध युवती आत येते आहे असे वाटते. हे गाणे ऎकण्याआधी मी प्रवीण दवणे यांच्या कविता फ़ारशा ऎकलेल्या नव्ह्त्या.पण ही रचना मस्त आहे. दवणे यांच्याच 'रंग किरमिजी' मध्ये एक 'भग्न भाव' आहे. आणि या वरच्या गाण्यात 'मुग्ध प्रणय..'

'राखी सावंत' च्या जमान्यात हे गाणे जुनाट ठरेल. पण फ़ार गहिरे,नाजुक भाव यात व्यक्त होतात. 'मोगरा' या शब्दावरुन मला नेहमीच कुसुमाग्रजांच्या 'मोगरा' या कवितेची आठवण होते.

असा मोगरा
समोर फ़ुलता
दूरपणाचा
द्त्तक बाणा
कसा रहावा

मलयगंध
देहात दाटता
गतागताचा
शीर्ण नकाशा
कुणी पहावा

इंद्रजाल हे
असे उमलता
स्वप्न म्हणे
ही जमीन माझी
घटकेकरिता

सागर विसरुनि
धवल फ़ुलांनो
तुमच्यासाठी
उभी राहिली
जीवन सरिता

यातील अंतरा ऎकला तर 'तो' वेडेपणा आता 'संपला' आहे असे काहीसे खिन्न भाव कळतात..आणि मुखडा ऎकताना जुन्या आठवणीत रममाण होताना माणूस हळवा, म्रुदू होतो..तसेच स्वर,शब्दोच्चार येतात. आणि माझी खरी 'दाद' आहे ती 'हाय' या मधल्या एका उच्चाराला...या गाण्याने लावलेले वेड कधी संपूच नये असे वाटायला लावणारे एक सुरेल गीत..

तुला पाहिले मी नदीच्या किनारी


तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे

तुझी पावले गे धुक्याच्या महाली
ना वाजली ना कधी नादली
निळा गर्द भासे नदीचा किनारा
न माझी मला अन तुला सावली

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा चंद्र हा डोंगरी मावळे
पुढे का उभी तू तुझे दु:ख झरते
जसे संचिताचे ऋतू कोवळे

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातून ही मंद ता-याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा

श्रीधर फ़डके यांनी गायलेले व स्वरबध्द केलेले हे माझे सर्वात लाड्के गाणे...ग्रेससारख्यांच्या कवितेला चाल लावणे हेच मुळात आव्हान..ते यात फ़ार समर्थपणे पेलले गेले आहे. यात एक music piece गाण्याच्या शेवटी वाजतो..तो ऎकेपर्यंत गाणे संपले असे मला वाटतच नाही इतका तो गाण्याचा भाग आहे. 'धुक्याच्या महालातील पावले' ऎकताना मला धुपाचा धूर होतो तशा धुरात दोन नाजुक अस्फ़ुट पावले दिसतत.यात 'गर्द' हा शब्द श्रीधरजी असा काही गातात की क्षणात मनाला निळ्या गर्द आकाशाखाली आपण व्याकुळपणे उभे आहोत असा भास होतो. 'चंद्र मावळे' यात अचूकपणे स्वर असे खाली येतात की .. 'मावळणे' जाणवावे. 'दु:ख' हा शब्द उच्चारण्याबद्दल तर लिहायलाच नको. 'आकांत' असा काही येतो की मनात कल्लोळ माजतो. 'शब्दचित्र' या शब्दाचा अर्थ अशी गाणी ऎकताना उलगडतो..प्रथम हे गाणे ऎकल्यावर मला 'तलत मेहमूद' यांचे एखादे आर्त गीत ऎकते आहे असा भास झाला. स्वररचना, शब्द..आवाज सर्व अतिशय जमलेले एक उत्तम गाणे..परत परत अनेकदा ऎकावे असे वाटणारे सुरेख,अप्रतिम गीत..कितीही याबद्दल लिहिले तरी कमीच..

अवेळीच केव्हा दाटला अंधार


अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिला गळा जड झाले काळे सर
एकदा मी तिच्या डोळ्यात पाहिले
हासताना नभ कलून गेलेले

पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार

कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली
तिच्या पोटी कुण्या राव्याची सावली
जरा डोळियांत तिच्या मी पाहिले
काजळात चंद्र बुडून गेलेले

ना.धों.महानोर

या गाण्याबद्दल लिहीण्याची इच्छा खूप होती पण धीर होत नव्हता. मला याचा अर्थ जो वाटतो तो लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. कोणी वेगळे काही interpret केले असेल तर जरुर सांगा.

या कवितेतील 'ती' त्याची प्रेयसी असावी. तिचे तिच्या मनाविरुध्द लग्न झाल्यामुळे.. 'तिला गळा जड झाले काळे सर'..आणि मग त्याच्या आयुष्यात 'अवेळीच दाटला अंधार'... अनेक दिवसांनी अवचित भेटल्यावर तिच्या विषण्ण हासण्याचे वर्णन 'हासताना नभ कलून गेलेले' यात येते. 'कलून' हा शब्द ऎकताना मनात कालवाकालव होते इतका अप्रतिम गायला गेला आहे.

तिला लग्नानंतर पाहिल्यावर 'ती' आधी 'त्याची' असल्याने तो तिच्याकडे बघतो.. ते वर्णन पहिल्या कडव्यात आहे. यात 'अंगभर', 'तिच्या काचोळीला चांदण्याचा जर' तसेच 'थरके ' हे श्रीधरजींचे उच्चार ऎकल्यावरच कळेल की ते किती भावपूर्ण, शब्दांना न्याय देणारे गाणे गातात. 'थरके' मध्ये ते बेभान थिरकणे जाणवतेच..

दुसर्या कडव्यात तिला झालेले मूल दुसर्याचे आहे..यामुळे तिच्या डोळ्यातील चंद्र बुडून म्हणजे दु:खात काजळून गेले आहेत. 'कितीक दिसांनी'..ऎकताना विदग्ध, एकलेपणाची व्यथा कळेल असे सूर आले आहेत. फ़ार जीवघेणे वर्णन या गाण्याच्या शब्दात आहे.. ते तितकेच खोल गाण्यातूनही पोहोचते. 'रंग किरमिजी' याच धर्तीचे नंतरचे गाणे..तेही असेच एक 'जमलेले' गाणे आहे.
अशी गाणी ऎकल्यानंतर दीर्घकाळ एक कातर मूड अंतर्मनात रहातो.. तेच त्याचे खरे यश असते.

तल्लीन गोविंदे....


पुष्कळ दिवस अधीरपणे वाट पाहिल्यावर आणि नेहमीच्या दुकानदाराकडे खेपा घातल्यावर ही cassette हातात आली. ती घेतल्यावर मनाचा ठाव घेतला ते त्रिभंगी देहुडा या अभंगाने.. हा अभंग शब्द,स्वर, आवाज, वाद्ये याने असा काही जमला आहे की एकदा ऎकून चॆन पडत नाही.

पहिला अंभंग आहे तो ज्यावरुन शीर्षक दिले आहे तो..

पावया छंदे तल्लीन गोविंदे
नाचती आनंदे गोपाळ कॆसे

यमुनेच्या तीरी गाई चारी हरी
गोपाळ गजरी आनंद्ले

ठायी ठायी पेंधा पॆ नाचतु
वाकुल्या दावितो हरी..छंदे..

ठायी ठाती उभ्या विसरल्या माया
हाकितु लवलाया क्रुष्ण हरी हरी

ज्ञानदेवा जिवी क्रुष्णचिरंजीवी
गोपाळ रंजवी प्रेमभक्ता

..संत ज्ञानेश्वर..


या अभंगातील शब्दरचना या विषयावर लिहिण्याचा अधिकार माझा नाही. ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग असल्याने आशय किती खोलवर असेल त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहेच. आवाज आणि संगीत याबद्द्ल लिहिण्याचे धाडस मात्र करणार आहे.

या अभंगाची चाल मनाचा ठाव घेते. आधी लिहिल्याप्रमाणे हे कसेट्मधील पहिले गाणे आहे. ते ऎकण्याआधीच्या क्षणी मनाची स्थिती काही असली तरी गाणे खरे तर .. त्याआधीचे नुसते संगीत सुरू झाल्याक्षणी चित्तव्रुत्ती उल्हसित होतात. श्रीधरजींच्या इतर गाण्यांप्रमाणेच शब्दचित्र रेखाटण्याची किमया यातही आहे. यमुनेच्या काठावर खेळणारे श्रीक्रुष्णासोबतचे साथी डोळ्यांसमोर येतात. 'वाकुल्या दावितो हरी'..मधे संगीताच्या किमयेने तो 'हरी' साक्षात वाकुल्या दाखवितो आहे याची मजा आणि आनंद अनुभवायलाच हवा. ते शब्दात मांडणे शक्य नाही. हे संगीताचा समर्पक वापर म्हणजे काय याचे साक्षात उदाहरण आहे.

हे गाणे गोपाळांचे सहज खेळाचे वर्णन असले तरी ... सावळ्या श्रीक्रुष्णाचे गीता सांगणारे उदात्त धीरगंभीर रूप.. 'क्रुष्णचिरंजीवी.. गोपाळ रंजवी' यात सुरेश वाडकर यांच्या आवाजाच्या आणि स्वरांच्या साहाय्याने समोर येते.

तालावर डोलायला लावणारे एक नादमय गाणे.. तल्लीन शब्दाची व्याप्ती.. किंवा ती अवस्था 'कळण्या'साठी हे गाणे मद्त नक्की करेल...

२.कोमल वाचा दे रे राम
विमळकरणी दे रे राम

प्रसंग ओळखी दे रे राम
धूर्तकळा मज दे रे राम
हितकारक दे रे राम
जनसुखकारक दे रे राम
अंतरपारखी दे रे राम
बहुजन मॆत्री दे रे राम

संगीत गायन दे रे राम
आलापे गोडी दे रे राम
धात माता दे रे राम
अनेक धाटी दे रे राम
दस्तक टाळी दे रे राम
न्रुत्यकला मज दे रे राम

पावनभिक्षा दे रे राम
दीनदयाळा दे रे राम
सज्जन संगती दे रे राम
अलिप्तपण मज दे रे राम
मजवीण तू मज दे रे राम
दास म्हणे मज दे रे राम..

समर्थ रामदास..


या गाण्याबद्द्ल पहिला आणि महत्वाचा अभिप्राय म्हणजे.. 'कोमल वाचा दे रे राम' हे मागणे मागायची स्व्त: श्रीधरजींना अजिबात गरज नाही.त्यांच्याशी ओळख असलेल्या सर्वांना हे पटेल. कारण ते अतिशय म्रुदू ..कोमल स्वरात विनम्रपणे बोलतात. यात अतिशयोक्ती करण्याचा हेतू नाही.

'त्रिभंगी देहुडा' नंतरचे माझे या अल्बममधील हे आवडते गाणे.. हे गाणे अल्बममधे सहाव्या क्रमांकावर आहे.म्हणजे ते सुरु होईपर्यंत श्रोते भक्तिरसात बुडालेले असतात. कोमल, शांत, गंभीर आर्त अशा स्वरात 'रामा' कडे हे मागणे मागितलेले आहे. 'प्रपंच करावा नेटका' असे रामदासस्वामी सांगतात. तो 'नेटका' करण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. अंगात अनेक गुण असावे लागतात. ते या अभंगात येतात.

इतके सगळे आल्यावर मुख्य म्हणजे अलिप्तपण यायला हवे.. कमळाच्या पानासारखे पाण्यात राहून ते पाणी अंगाला लागू द्यायचे नाही हे जमावे लागते. मला श्रीधरजींनी गायलेले बा.भ.बोरकर यांचे 'जळण्याचे बळ तूच दिले रे' हे 'हे गगना' मधील गाणे फ़ार प्रिय आहे. त्यात त्यांचा जो आवाज आहे त्याची आठवण 'कोमल वाचा' ऎकून आली. 'दे रे राम' हे यात वीसवेळा गायले गेले आहे. आणि ते दरवेळेला वेगळ्या पध्द्तीत गायले गेले आहे.. थोर संगीतकार आणि गायक याची ती लक्षणे आहेत.

अलिप्तपण यावरून नुकताच घडलेला एक प्रसंग लिहिण्याचा अनावर मोह होतो आहे.. माझ्या कामाच्या ठिकाणी काही कारणाने 'कल्पना चावला' यांचे वडिल आले होते. वयाच्या बाराव्या वर्षी पाकिस्त्तानातून पळून आल्यावर जगण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. टायर बनविण्याचा कारखाना काढला. सामाजिक कार्यही खूप केले.ते सांगत होते की ..अनेक योगी साधूंना भेटलो.प्रत्येकाला एक प्रश्न आवर्जून विचारला.. 'की अनेक विद्या असतात तशी इहलोकात मिळवलेले 'वर' घेऊन जायची विद्या असते का ?'.. याची सतत जाणीव ठेवून वागायला हवे. 'मजविण तू मज दे रे राम' याचा अर्थ मला कळला आहे असे नाही. पण 'अहंकार' असलेला 'मी' त्याविण माझा मी मला दे असे रामाला यात विनवले आहे. फ़ार अवघड सूक्ष्म मागणे आहे.

संतांच्या रचनांतून नेमक्या निवडून त्यांना सुरेख, चपखल चाली लावण्याचे काम 'तल्लीन गोविंदे' मधे श्रीधर फ़डके यांनी केले आहे. अशीच त्यांची नवनवीन गाणी 'मज दे रे राम'..

रंग किरमिजी..


रंग किरमिजी
सांज ति-हाईत
मी दुखणाईत
दिठीतली सल
अंधुक चंचल
बघ आंदोलीत
विझता तगमग
आलीस तू मग
पदर सावरीत
क्षण उजळावा
चंद्र फ़िरावा
हीच नसे रीत

जिवलग हात
मूर्तिमंत घात
दंश सराईत
आता सांजरंग
काळीज दुभंग
मना जोजवीत
तुझ्याच पाऊली
जुन्याच चाहुली
कण बोलवीत
आठ्वांचे पीस
गमते आकाश
चंद्र सजवीत

कुठले कुठ्ले
उठ्ले काहूर
मग दूरवर
क्षण पाजळीत
आयुष्य वेल्हाळ
मन रानोमाळ
कुठे हारजीत
सुटलेला शर
खोल खोलवर
तोच मनमीत
चाललो चाललो
काठाशी बोललो
जिवा उधळीत

प्रवीण दवणे..

'हे गगना' यातील माझे हे सर्वात लाड्के गाणे. स्वत: श्रीधरजीच याचे वर्णन सांगताना..एक भग्न ह्रुदयी माणूस एकटाच संध्याकाळी गात चालला आहे...असे सांगतात. कविता फ़ार भावपूर्ण आहे. मनाला भिडणारी आहे.संध्याकाळ ही नेहमीच कातर करून जाते. 'भूली बिसरी चंद उम्मीदे चंद फ़साने याद आये'..असं नेहमी संध्याकाळीच होते.

या गाण्यातील शब्द अप्रतिम आहेत. 'तगमग' हा शब्द ऎकताना जिवाची 'तगमग' होते. शब्द योग्य पोचावेत अशी चाल आहे..वाद्यांचा संयत वापर 'जमला' आहे..

यातील शेवटचं कडवं ऎकताना..

हुई शाम उनका खयाल आ गया
वही जिंदगीका सवाल आ गया..

हे किती खरं आहे ते कळ्तं. 'दुखणाईत' हा शब्द गीतरामायणात 'लीनते चारुते सीते' मध्ये आहे..

जो दुखणाईत नेत्रांचा
दीपोत्सव त्याते कॆचा..

त्यानंतर मी तरी याच गाण्यात ऎकला. एकूण हे स्वत: श्रीधरजींचे लाडके गाणे असावे. ते हे गाणे फ़ार मन लावून गातात. मनस्वीपणा हे त्यांच्या गायनाचे वॆशिष्ट्य आहे. सर्व गाण्यात ते जाणवितेच...यात एक शीळ आहे..तीही चपखल बसते. आनंदी मूड मध्ये आणि विषण्ण मूडमध्ये शीळ वाजवण्यात काय फ़रक आहे ते कळ्ण्यासाठी ही शीळ ऎकावी...

किशोरकुमारच्या 'बडी सूनी सूनी हॆ' ऎकल्यावर जसं एक खोल रितेपण एकलेपण..'तनहा' अवस्था येते ती या गाण्याने येते. या पॆलूतून परत एकदा 'तलत मेहमूद' यांचं 'शाम ए गम की कसम' आठ्वतं..

कोणावर असं ह्रुदयभंगाचं दु:ख येऊ नये असं कळवळून वाटावं इतकं दु:ख 'रंग किरमिजीतून' झिरपतं....

वारा लबाड आहे..



वारा निघे लपाया
झाडात आड आहे
गिल्ला करुन पाने
सांगून राहिली की
वारा लबाड आहे

झाडात मोहराचे
सारे घबाड आहे
वाकून एक फ़ांदी
सांगून राहिली की
भुंगा उनाड आहे

वाड्यास भोवताली
राई उफ़ाड आहे
पडवीवरील बोले
छपरी उजाड आहे

चोरून दे मुका तू
वस्ती चहाड आहे
वा-यास साखळी ही
सांगून राहिली की
उघडे कवाड आहे..

-- शिरीष गोपाळ देशपांडे..

अबोलीचे बोल या अल्बममधील रचना.. या कवीचे नाव या गाण्यामुळे मला माहिती झाले. अनुराधा पौड्वाल व स्वत: श्रीधर फ़ड्के यांनी हे गायले आहे. मूळ कवितासंग्रहात हे गीत पूर्ण नाही. दोनच कडवी आहेत. यातल्या सगळ्या शब्दांचा अर्थ मला माहिती नाही. विदर्भाकड्च्या भाषेचा प्रभाव या गाण्यावर स्पष्ट जाणवतो.

या गाण्याचे संगीत मला फ़ार आवडते. कार्यक्रमातही हे गाणे फ़ार म्हटले जात नाही. पण गाणे एकदा ऎकून पुरे वाट्त नाही.. नर्म श्रुंगार अशी गाणी श्रीधरजींनी तुलनेने कमी दिली आहेत. ही कविता शोधणे.. आवर्जून त्याला चाल बांधणे.. हे किती तन्मयतेने केले आहे ते गाणे ऎकून कळ्ते. शब्दांची श्रीधरजींना किती जाण आहे ते नेहमीच त्यांच्या गाण्यातून जाणवते. शब्दांना न्याय देणारे संगीत असे शब्द आपण सह्ज वापरतो. पण त्याचा अर्थ अशा गाण्यातून, वाद्यांतून किती कळ्तो त्यासाठी गाणे ऎकायलाच हवे.

मी एक तुला फ़ूल दिले


मी एक तुला फ़ूल दिले
मी एक तुला फ़ूल दिले सहज नकळता
त्या गंधातून मोहरली माझी कविता..

त्या झरणीतून रुणझुणला शब्द ह्रुदयीचा
त्या शब्दातून मोहरली माझी कविता..

हे गगन निळे चांदण्यात भिजून चिंबले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभले
त्या चांद्ण्यास कनकाचे साज लाभता
त्या साजातून मोहरली माझी कविता..

का पान फ़ूल लज्जेने चूर जाहले ?
का सळसळत्या वा-याचे नुपूर वाजले ?
त्या नुपूरांचे किणकिणकिण सूर बहरता
त्या बहरातूनी मोहरली माझी कविता..

बघ उमलताच कलिकेची पाकळी जशी
का शब्द शब्द फ़ुलवीतसे काव्यमानसी..
त्या दोन मनी काव्याचे भाव लोटता
त्या भावातून मोहरली माझी कविता..

..शांताराम नांदगावकर..

. एमिली डिकिनसन या कवयित्रीची एक ’शब्द’ या शब्दावर अप्रतिम कविता आहे..
A WORD is dead
When it is said,
Some say.
I say it just
Begins to live
That day.

तसेच कविता म्हणजे काय ? या विषयावर अनेक परिसंवाद, चर्चा .. कविता घडतात. या कवितेत कविता कशी जन्माला आली त्याचे सुरेख वर्णन आहे. त्या चांदण्यास कनकाचे साज लाभता.. ही कल्पना फ़ार हळुवार आहे.. संदीप खरेची..

असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा.. ही भावना काय असते ते ’हळुवार हलण्याचा’ अनुभव ही कविता देते. परत एमिलीचीच एक ’कविता’ या विषयावर कविता आहे.
Potery..
Words on a paper
An expression
An emotion
Songs for the soul
A ray piercing in the dark
Filling the void
spreading warmth in cold mist
melting the frozen hearts

And yet
Incomplete when alone
Just empty words
Dormant,
Wisdom lying waste
Waiting for a reader

Poetry..
Words on a paper..
Waiting..


हे गाणे मला फ़ारसे माहीत नव्हते. ’तेजोमय नादब्रम्ह’ या अल्बममध्ये हे गाणे आहे. संगीत श्रीधर फ़डके व गायक सुरेश वाडकर.. खूप छान गोड गायले आहे.

हे गाणे स्वत: श्रीधर फ़डके यांच्याकडून ऎकण्याचा एकदा योग आला होता. ’नकळता’ हा शब्द त्यांनी सहजपणे ’नकळ्त सारे घडले’ हा भाव व्यक्त करत उच्चारला .. ’निळे गगन’ .. हे या गाण्यात प्रसन्न भाव घेऊन येते. ’हे गगना’ मधले ’गगन’ उदास आहे.. निळाच रंग.. पण कवितेतील भावछटा घेऊन येतो. ’रूणझुण’ ’किणकिण’ हे शब्द चालीतून व उच्चारातून तो नाद योग्यपणे प्रकट करतात.. अगदी ती नाजूक, सलज्ज किणकिण ऎकू येते. संगीतकाराकडून गाणे ऎकण्याची वेगळीच मजा असते.. ती परत एकदा अनुभवायला मिळाली. ’फ़िटे अंधाराचे जाळे’ हे गाणे याच नावाच्या अल्बममधे श्रीधरजींनी गायले आहे.. ते ऎकूनही हेच जाणवते.

यात तिला दिलेले फ़ूल हे सोनचाफ़्याचे असावे असे मला नेहमी वाट्ते..

कधी रिमझिम


कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला
कधी टपो-या थेंबांचा आला ऋतू आला
कधी पुलकित हर्षाचा
हळव्या क्षणस्पर्शाचा..
आला ऋतू आला

पानावर थिरकत नाचे पाणी
मनामध्ये जुळतात गाणी दिवाणी
साद गंधातूनी
ओल्या मातीतूनी
आला ऋतू आला

अंग अंग स्पर्शतात मोती रुपेरी
आठवे ती भेट आधी अधुरी
मन चिंब ओले
शहारत बोले
आला ऋतू आला

हा पाऊस वागे तुझ्यासारखा
हा येतो नि जातो तुझ्यासारखा
उन पावसाचा
खॆळ श्रावणाचा
आला ऋतू आला

..नितीन आखवे..


तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता कधी यायचा पाऊसही.. ..संदीप खरे..

'पाऊस' या विषयावर कविता लिहिली नाही असा कवी सापडणे मुष्किल.. तेजोमय नादब्रम्ह याच अल्बममध्ये ही रचना आहे. सुरेश वाडकर यांनी गायली आहे. रिमझिम झरणा-या पावसाची आठवण जितकी लोभस.. आणि त्याचा स्पर्श जसा हळुवार तसेच हे गाणे मनाला ह्ळुवार स्पर्श करुन जाते. ओल्या मातीचा वास 'मृदगंध' गाणे ऎकताना मनात दरवळतो. 'ति'ची भेट आठवते.. रजनीगंधा सिनेमातला छत्रीची गळकी बाजू आपल्या डोक्यावर धरणा-या माणसाचे हे गाणे आहे असे मला नेहमी वाटते.

रिमझिम के तराने लेके आयी बरसात
याद आयी किसीसे वह पहली मुलाकात..

मधल्या गीता द्त्तचा नटखट व रफ़ीचा मुलायम आवाज हे गीत ऎकून नक्कीच आठवतो..

गाणं म्हणून परत एकदा श्रीधरजींच्या अचूक कविता निवडण्याला दाद.. 'ऋतू आला' या शब्दांच्या चालीत हवासा वाटणारा 'तो' आल्याचा लाडिक आनंद सामावला आहे. 'पानावर थिरकत नाचे पाणी' मध्ये पानावर अलगद थरथरणारे दंवबिंदू दिसतात..

हेही गाणे मला स्वत: श्रीधरजींकडून ऎकण्याचा योग आला होता. आणि उन्हाळा असून बाहेर पाऊस पडत असल्यासारखे वाटावे इतके हे गाणे ते सुंदर गायले.. !

हा पाऊस वागे तुझ्यासारखा
हा येतो नि जातो तुझ्यासारखा
उन पावसाचा
खॆळ श्रावणाचा
आला ऋतू आला..

यावरुन मला नेहमीच कुसुमाग्रजांची एक कविता आठवते..


आल्या आल्या म्हणतेस
आता
पुन्हा कधी जाणार नाही

जाता जाता म्हणतेस
आता
पुन्हा कधी येणार नाही

येणं जाणं कुणास ठाऊक
घडेल कसं ?
वा-यावरती तरंगणारी
सारीच पिसं

नसतानाही भरपूर असतेस
एवढं तुला कळणार नाही..

तू माझ्या आयुष्याची पहाट..


तू माझ्या आयुष्याची पहाट..
तू माझ्या कॆफ़ाची मत्त लाट..

तू मागील जन्मांची आर्त साद..
तू मानसकुंजातील वेणू नाद..

तू माझ्या एकांताचा प्रकाश..
तू माझ्या गीतांचा बाहुपाश..

तू माझ्या दु:खाची चांदरात..
तू माझ्या स्वप्नांचा पारिजात..

तू अम्रुतभासांचा अंग राग..
तू विझल्या नयनांचा दीप राग..

तू माझ्या जगण्याची वाटचाल..
तू माझ्या रक्ताचा रंग लाल..

तू माझ्या असण्याचा अंश अंश..
तू माझ्या नसण्याचा मधुर दंश..

सुरेश भट..

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी.. अशी असते 'ती'.. सुरेश भट यांचे शब्द याबद्दल काही लिहिण्याची गरज नाहीच.

'श्वास तुझा मालकंस..स्पर्श तुझा पारिजात'.. मधेही पारिजात आहे.. 'मानसकुंजातील वेणुनाद'.. या शब्दातून राधा आठवते...

'तू माझ्या रक्ताचा रंग लाल'.. इतकी 'ती' त्याच्यात सामावली आहे.. पण यात सर्वात उंची गाठली आहे ती

तू माझ्या असण्याचा अंश अंश
तू माझ्या नसण्याचा मधुर दंश.. या ओळींनी..

तू माझ्या असण्याचा अंश अंश हे आपण समजू शकतो.. जिवंत असताना ती तनामनात भरून राहिली आहे.. हे सह्ज समजण्यासारखे आहे.

पण "For Whom the Bell Tolls" या सिनेमात (जो Ernest Hemingway च्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे).. त्यातली 'ती' 'तो' मरणाच्या दारात असताना विचारते..

Nothing can ever part us now, can it?

किंवा..

Dont be dismayed at good buys, a farewell is necessary before you can meet again..
And meeting again, after moments or lifetimes, is certain for those who are friends..

.. By Richard Bach, Illusions..


या वाक्यांमुळे.. 'तू माझ्या नसण्याचा मधुर दंश' याचा अर्थ कळायला मद्त होते. 'ती' नसताना तिच्या आठवणी.. दंश करणारच.. पण ती असतानाच्या आनंदाच्या क्षणांची आठवण म्हणून तो दंश 'मधुर' असणार आहे.. ख-या प्रेमाला मरणाची सीमारेषा नसते.. हेच या ओळीतून कळते..

ही एक गजल स्वरुपाची रचना आहे. वाचली तर त्याचे गाणे होऊ शकेल असे अजिबात वाट्णार नाही. पण गाणे खरोखर 'जमले' आहे. 'काही बोलायाचे आहे' या अल्बममध्ये आहे.. शब्दोच्चार लक्ष देऊन ऎकले तर गायकाचा त्यावरचा अभ्यास कळतो. 'लाट' हा शब्द.. हा समुद्राच्या दूरवरुन येऊन कोसळणा-या लाटेसारखाच येतो.. 'मानसकुंजातील'.. मधला शेवटचा दीर्घ 'ती' नीट कळ्तो.. 'विझल्या नयनांचा' मधे

'इस इंतिजारे शॊक को जलवोंकी आस हॆ..
इक शम्मा जल रही हॆ पर वह भी उदास हॆ.. ’

मधले जसे तिचे वाट पाहून डॊळे विझलेत ते भाव येतात..आणि 'पहाट' हा उच्चार नवीन आशा पल्लवित करतो. प्रेयसीला..प्रेमाला एक उदात्त अर्थ प्राप्त या गाण्यातून लाभतो.

मंगेश पाड्गावकर यांची 'तू' वर एक कविता आहे..

अजूनही
गंध अनावर बहरच तू
फ़ांदीवरुनी उतू चालला
बकुळ्फ़ुलांचा कहरच तू

अजूनही
उत्सव उधळी भावुक तू
नदीकाठ्च्या एकांताला
सगळी सगळी ठाउक तू….

Monday, March 24, 2008

मन मनास उमगत नाही..


१. मन मनास उमगत नाही
मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा
मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले
मन ऩक्षत्रांचे रान अवकाशी अवतरलेले
मन रानभूल मन चकवा...
मन काळोखाची गुंफ़ा मन तेजाचे राऊळ
मन सॆतानाचा हात मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा..
चेहरा मोहरा याचा कधी कुणी पाहिला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही याच्याविण दुसरा नाही
या अनोळ्खी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा…

सुधीर मोघे या कवितेवरुन पहिली अपरिहार्य आठवण येते ती 'बहिणाबाईंच्या' 'मन वढाळ वढाळ' या कवितेची.. पण सुधीर मोघे यांच्यासारखे कवी जेव्हा कविता लिहितात तेव्हा स्वत:चा ठसा उमटविल्याशिवाय कसे राहतील? दाटून आलेल्या संध्याकाळी जसं अवचित सोनेरी उन पडतं..तसंच काहीसं पाउल न वाजविता आपल्या आयुष्यात प्रेम येतं..अशी प्रेमकविता लिहिणा-या सुधीर मोघे यांच्या 'मन मनास' सारख्या गंभीर,विचारप्रवर्तक कविताही खूप आहेत. ही कविता ऎकल्यानंतर ..मुख्य म्हणजे स्वत:शी प्रामाणिक राहून विचार केला तर या प्रत्येक मनाच्या वर्णनाला साजेसे 'आपले' वर्तन आपल्याला आठवते.. स्वत:ला 'आश्चर्य वाटावे' असे वागणे आपल्याकडून बरेचदा घडते...यामुळे 'धनी अस्तित्वाचा तरीही याच्याविण दुसरा नाही' हे किती 'खरे' आहे ते जाणविते. ही कविता व गाणे ही अनुभव घेण्याची चीज आहे..शांतपणे ऎकताना आणि मनाच्या कोणत्याही अवस्थेत ऎकताना 'सच्चेपणा' परत परत प्रत्ययाला येतो.या कवितेला एक नाद आहे.. तो श्रीधरजींनी चपखलपणे पकडला आहे. 'लाटांनी सावरलेले' यात सावरणे कळते. 'तुला पाहिले मी' मध्ये जसे 'धुक्याची पाऊले' आहेत तसा येथे धुक्याचा पदर आहे..तो अस्फ़ुटपणा..गूढपणा गाण्यात छान आला आहे. मला स्वत:ला 'दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा' ही ओळ फ़ार पटते.. केवढी मोठी देणगी मानवाला 'मनाची' आहे !!..ती देणगी आहे म्हणून तर तो 'मानव' आहे..प्राणी नाही..हे या ओळीत सामावले आहे..ते गाण्यातून खोलवर पोहोचते. पण मनाच्या गाभ्यापर्यंत हे मनाचे गाणे भिडते ते.. 'या अनोळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा' यातून.. श्रीधरजीं त्यांच्या उच्चारातून काहीसा हताशपणा सहज पोहोचवितात....आणि 'स्व' ला आपण ओळखतो असे जर हे गाणे ऎकण्याच्या आधीच्या क्षणी आपल्याला वाटत असेल तर या ओळी ऎकून 'खरंच ओळखतो का आपण स्वत:ला तरी ? असा प्रश्न पडतो. अनुभूती या शब्दाची अनुभूती घ्यायची असेल तर अशी गाणी जरुर ऎका..
मॆत्री… १

अचानक त्या दोघींची ओळख झाली.

रोजच्याप्रमाणेच तो ऑफ़िसमधला अजून एक दिवस होता. विशाखा तिची कामे चटपटीतपणे संपवत होती. तेवढ्यात ऑफ़िसबॉयने येऊन सांगितले..

“सरांनी यांना तुमच्याकडे पाठवलंय”.. ती जरा चकित झाली. तिच्याकडे कोणाला कामासाठी पाठवायचे असल्यास तिच्या बॉसचा तिला आधीच फ़ोन यायचा. कामाच्या स्वरुपाची माहिती दिली जायची. कधी कोणाच्या ओळखीतून आलेल्या एखाद्या माणसाचा इंटरव्ह्यू असे.. तर कधी कोणी मार्केटिंगचा माणूस आपल्याकडच्या product ची माहिती सांगायला आलेला असे.

कधी कधी मात्र पुढ्च्या कामासाठी उपयोगी पडणारा माणूस ’तिला’ कसा वाटतो ते आजमावण्यासाठी ते विशाखाकडे पाठवत. विशाखाच्या कामाच्या पध्दतीवर ऑफ़िसमधले सर्वजण खुष होते. तिच्या मताला तिथे किंमत दिली जाई.

आज मात्र ती जरा वॆतागली. एक presentation बनवायचे होते, तिच्या हाताखालच्या programmer ने लिहिलेले code तपासायचे होते. एक मीटींग होती. तेवढ्यात मधे कोणीतरी टपकल्यामुळे ती वॆतागली. “आपण अकारण जास्त चिडचिड करतो आहोत का ?” तिने स्वत:ला विचारले.

नुकतेच तिचे मिलिंदसोबतचे नाते तुटले होते. गेले सहा महिने ते दोघे लग्न करणार असे जवळजवळ ठरल्यात जमा होते. दोघांनी तशी अनेक स्वप्ने पाहिली होती. ऑफ़िस कधी सुटते व कधी मिलिंदबरोबर फ़िरायला जातो असे तिला होत असे. .इंजिनिअर, चांगली नोकरी, जातीतला, एकुलता एक असे अनेक गुण पाहून तिच्या आईवडिलांनी त्याला पारखला होता.

पण हळूहळू अनेक बाबतीतले विसंवाद लक्षात येऊ लागले आणि लग्न झाल्यावर निभावणार नाही असा तिच्या मनाने निर्णय घेतला. “हे सगळं तुमच्या नवीन पिढीचं फ़ॅड आहे. आमचे नाही का संसार झाले” .. इति तिची आई.. आईला कोणत्या भाषेत समजवावे हे तिला कळेना.

पावसात फ़िरायला गेल्यावर त्याला सर्दी आठवते. जांभळे, कॆ-या खाऊ म्हणालो तर खोकला आठवतो. टेकडी चढायची कल्पना त्याला भयंकर वाटते. शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम रात्री जागून पाहाणे त्याला कल्पनेत सुध्दा अशक्य वाटते.. तर ऑर्केस्ट्रा बघणे विशाखाला अशक्य वाटते … रोजचे वर्तमान पत्र सोडून दुसरे काही वाचणे ही मिलिंदला शिक्षा वाटते. तर तिला रोज एक पुस्तक वाचायला मिळणे ही चॆनीची परमावधी वाटते. पॆसा मिळणार नाही असे कोणतेही काम करणे त्याला अमान्य आहे. आणि समाजासाठी आपण देणे लागतो तर काहीतरी जमेल तेवढे करावे असे तिचे मत..

या सगळ्यातून तिने एकटीने निर्णय घेऊन त्याला ठाम ’नकार’ दिला. आपल्यासारख्या ’स्थळाला’ कोणी नकार देईल असे मिलिंदला स्वप्नात देखील वाटले नसते. त्याने तिला ’बघू कोण मिळणार आहे’ वगॆरे म्हणत तिचा निरोप घेतला. हा अजून एक घाव.. जे नाते तुटले ते समजून घेऊन संपावे अशी तिची (चुकीची ?) अपेक्षा होती. या सगळ्यातून तिची चिडचिड आजकाल जरा वाढली होती. “हे बरोबर नाही.” तिने स्वत:च्या मनाला फ़टकारले.

केबिनबाहेर उभ्या असलेल्या बाईंकडे ती पाहातच राहिली. वय ५०/५५ च्या दरम्यान असावे. नवीन फ़ॅशनप्रमाणॆ कापलेले व रंगविलेले केस.. मुद्दाम मेंटेन केलेली अंगकाठी, अंगाखांद्यांवर नाजूक पण बरेचसे दागिने.. गळ्यातले दोन, तीन लखलखीत हार जरा विसंगतच वाटत होते, वयाला न शोभणारा रंगीबेरंगी पोशाख, चेह-यावर कुर्रेबाज भाव, स्मार्ट पण अहंभावी असे व्यक्तिमत्व.

दार ढकलून त्या बाई आत आल्या. आणि तेवढ्यात तिच्या टेबलावरचा फ़ोन खणखणला. अपेक्षेप्रमाणे तिचे बॉसच बोलत होते. ’तुमच्याकडे वॆजयंती मॅडमना पाठवतोय. आपल्याला नवीन ऑफ़िससाठी काही लोक हवेत ना..त्यांच्या ओळखी आहेत ब-याच.. बोलून घ्या जरा..”

प्रथमदर्शनी तिचे वॆजयंती बद्दल मत फ़ारसे चांगले नाही. संभाषणात वॆजयंतीला स्वत:च्या मित्रपरिवाराचा चांगलाच गर्व होता असे दिसले. त्यात ’आम्ही डॉक्टर’ लोक असे तिच्या बोलण्यात सारखे येत होते. उच्चविद्याविभूषित लोकांबद्दल विशाखाच्या मनात आदर नक्की होता. पण ती एक विशिष्ट प्रकारची हुशारी आहे असे तिचे मत होते. आयुष्य जगण्यासाठी लागणारी हुशारी जरा वेगळ्या प्रकारची असू शकते या मताची ती होती.

पण हळूहळू संवाद पुढे गेले व विशाखा व वॆजयंती स्वत:च्या वॆयक्तिक आयुष्याच्या माहितीची देवाणघेवाण करण्याइतक्या पुढे गेल्या.

वॆजयंती वृध्द आईवडिलांसोबत राहात होती. तिने लग्नाबाबत काही सांगितले नाही. मित्रांबाबत मात्र परतपरत उल्लेख येत होते. सर्व मित्रमॆत्रिणी तिचे कसे ऎकतात, कधीही बोलावले तर कसे तिच्या मदतीला धावून येतात याची वर्णने सतत येत होती.


विशाखाच्या मनातले लग्नाबद्दलचे, मिलिंदबद्दलचे विचार वॆजयंतीने समजून घेतले. विशाखाने लवकरात लवकर पण मनाला पटलेल्या माणसाशी लग्नाचा विचार करावा असे सुचविले. ती आपली हितचिंतक आहे असे विशाखाला वाटायला लागले.

विशाखाच्या कामात वॆजयंतीची काही मदत होणार होती. यासाठी ओळखीच्या लोकांना दोघी भेटणार असे ठरले. त्या भेटी या निमित्त होऊन दोघींची मॆत्री फ़ुलायला लागली. सोबतीने नाटक सिनेमा पाहाणे, भेळ्पुरी खायला, चायनीज खायला जाणे.. फ़िरणे सुरु झाले. विशाखाच्या घरीदेखील त्यांच्या मॆत्रीबद्दल समाधानाचे सूर उमटायला लागले.

अशात एक दिवस वॆजयंतीने तिच्या मित्राच्या घरी जेवायला जायचा बेत आखला. विशाखा त्यांच्याबरोबर गेली… गप्पा झाल्या. ते कुटुंब तिला आवडले. मित्राच्या बायकोमुलांशी तिच्या बोलक्या, लाघवी स्वभावामुळे सहज जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. कविता, पुस्तके असे एकाच आवडीचे विषय निघत गेले. अनेक दिवसांनी विशाखा मनमुराद हसत होती.

वॆजयंती मात्र त्या दिवसापासून बदलली. विशाखा प्रत्येक क्षणी काय करते आहे.. याचा ती अंदाज घेऊ लागली. मोबाईलवर तासनतास कामाच्या नावाखाली बोलणे व सतत विशाखाने आज कोणता ड्रेस घातला आहे.. येथपासून तिने डब्यात काय आणले आहे हे विचारणे सुरु झाले. विशाखाला कोणाकोणाचे फ़ोन येतात हे आडून आडून विचारणे सतत होत असे.

विशाखा हॆराण झाली. एका बाजूने हे सर्व सहज संवाद होते. कोणाला सांगावे तर ती व्यक्ति म्हणे.. “तुझी किती काळजी आहे वॆजयंतीला.. “ ! हे सर्व काळजीच्या पलीकडे चालले आहे असे विशाखाला वाटत राही. सतत मोबाईलवर येणारे वॆजयंतीचे फ़ोन तिने घेणे कमी केले.. तर ’फ़ोन का घेतला नाहीस.. काय करत होतीस “ ? ही प्रश्नोत्तरे सुरु होत.

कामासाठी सुध्दा वॆजयंती सोबत जाणे तिला शिक्षा वाटू लागली. त्यात एक नवीन प्रकार सुरु झाला. विशाखाच्या बॉस बद्दल चे प्रश्नांवर प्रश्न अशी एक सरबत्ती सुरु झाली. ’ते कधी आले’.. “काय करत होते.. “ “त्यांच्या घरातील माणसे कशी आहेत ? बायकोबरोबर त्यांचे पटत नाही. त्यांना intellectual companion ची गरज आहे.. “ “विशाखा त्यांच्या केबिनमध्ये कधी व का गेली होती” .. एक ना दोन.

विशाखाला पटकन तिला तोडून टाकणेही जमेना व सततच्या या पाठपुराव्याचा त्रास सहन होईना. तिने दुस-या एका मित्राला हे बोलून दाखवले.


त्याने तिला दोन तीन प्रसंगातले वॆजयंतीचे वर्तन विचारले.

“तू नवीन फ़ॅशनचा स्कर्ट घेतल्यावर वॆजयंतीने घेतला का ?”

“तू ज्या पुस्तकांचा वॆजयंतीच्या मित्राकडे उल्लेख केलास ती तिने आणली का ?”

“तू योगासनांच्या क्लासला जातेस तसाच वॆजयंतीने क्लास लावला का?”

सगळ्याची उत्तरे निर्विवादपणे ’हो’ येत होती.

“तू वेडी आहेस .. विशाखा.”. मित्र उदगारला..

“वॆजयंती तुझ्याशी स्पर्धा करु पाहते आहे. “

“माझ्याशी” ? विशाखाला डोळ्यासमोरून अनेक गोष्टी जाताना दिसल्या.. वॆजयंती सुंदर होती.. श्रीमंत होती.. डॉक्टर होती. ती विशाखाशी स्पर्धा करेल असे तिला स्वप्नातही वाटले नसते.