Showing posts with label poetry. Show all posts
Showing posts with label poetry. Show all posts

Sunday, December 7, 2008

पाऊस - अमेरिकेतला


प्रिय सरो,

समजलं,

आई अत्यवस्थ आहे,

पण इथे पाऊस लागलाय,

पाऊस आमेरिकेतला

तुला काय समजणार म्हणा,

मी इथून निघणार कसा ?

पण आईच्या म्रुत्यूची व्हिडीओ कॅसेट नक्की पाठव,

शेवटच्या आचक्यापासून क्रियाकर्मापर्यंत सगळं अगदी व्यवस्थित नोंदव,

इथल्या मित्रांना अंत्यविधी आवडतो,

भारतीय लग्न, लग्नाची पार्टि, मधुचंद्र,घटस्फ़ोट,सती,असलं सगळं पाहून झालंय,

श्वास थांबल्यानंतरचं क्रियाकर्म जसं प्रेताला आंघॊळ घालणं,कोरे कपडे चढविणं, तोंडात भाताचा गोळा ठेवणं, अग्नी देणं, मडकं फ़ोडणं,

असलं अजून नाही पाहिलं म्हणून पहायचंय,

पण ब्लॅक आणि व्हाईट आणि रंगीत अशा दोन्ही कसेट वेगवेगळ्या काढा,

ब्लॅक आणि व्हाईट आवड्ते मर्लीनला,

जॅक्लीनच्या मते कलरशिवाय 'चिता-फ़िल्म' ला काय मजा,

व्हिडीओवाला आधीच बुक कर

वेळेवर व्हिडीओ मिळाला नाही,

किंवा आईनं वेळ दिला नाही,

कुठलीच सबब ऎकणार नाही,हवं तर चांगली कॅसेट मी इथून पाठवितो,

पाऊस नसता तर मी सुध्दा आलो असतो,

कॅसेट उत्तम बनली पाहिजे खूपजणांना पाहायची इच्छा आहे..

'दि लास्ट मोमेंट्स आफ़ इंडियन मदर',हेच टायटल ठीक वाटेल नाही तर लग्नाची कॅसेट वाटेल,

दुखवट्याला आलेल्यांच्या चेह-यावरुन कॅमेरा फ़िरव,

ख्रिसमसला खूप मित्र जमतील कॅसेट बघतील॥

त्याआधी पाठव,

कॅसेट मिळाल्यावर बाकीच्या गोष्टी आईला जमवून घ्यायला सांग,

ख्रिसमसच्या आधी,

तिलासुध्दा दे खबर पावसाची,

घे काळजी

तुझा ,अमेरिकन दादा.


-अय्यप्पा पणीकर




Tuesday, November 25, 2008

रुक्मिणी

बाई, काय पाहिलंस, कसं साहिलंस नाही विचारत
वंचनेचा चेहरा दिसतो कधी अगदी करूण आणि भोळा
पण हे उमगण्याचं सहावं इंद्रिय असतंच ना प्रत्येक शहाण्या बाईला

म्हणून विचारायचं ते नंतरच्या उलाथापालथीबद्दल
तुझ्या फ़रपटीबद्दल
सोन्याच्या दिवसांनी उचललेला मेणा तुझा
तू कशी आलीस चालत द्वारकेहून इतक्या लांब पंढरपुरात ?
कशी राहिलीस परक्या मुलुखात, भयाण अनोळखी दिंडीरवनात ?
जगण्याची ठेच अशी खाल्लीस की पावलाला रक्ताची धार लागली
अन तुझी ती हिंमत त्याने रुसवा म्हणून निकालात काढली
पुन्हा तुझ्या शेजारीच वस्ती केली त्यानं नव्यानं
तरी परतली नाहीस मुकाट त्याच्याकडे
एकटीच चूल मांडून ताठ मानेनं जगत राहिलीस
कानठळ्या बसविणारा टाळमॄदंगाचा गजर शेजारी
तो ऎकत उभा जन्म उपेक्षेनं काढणं काय असेल?
पाय दगडाचे केलेस अन ओठही दगडाचे
बाई, तुझ्या कोनाड्यात आकांताचा पोत भडकलाच नसेल?
झाकलं नाहीस तरी उघडलंही नाहीस चव्हाट्यावर
संसाराचं श्रीफ़ळ तुझ्या ओटीतून अलगद काढून घेतलं त्यानं
पण तू दळत राहिलीस तुझ्या दु:खाचा बुक्का शांतपणे
पंढरी काळीनिळी झाली त्याच्या उधळ्यानं..

अरुणा ढेरे

पट्टराणी..

रुक्मिणी

पदराबरोबर प्रपंचाची प्रतिष्ठा खोचून
पट्टराणी तू वावरलीस त्याच्या राजघरात
ठेवलं नाहीस बांधून त्या राधेच्या रमणाला
भामेच्या वल्लभाला, कॄष्णेच्या केशवाला,
तुझ्या असतेपणाच्या तलम भरजरी वेढ्यात

तो पालांडून गेला असेल जेव्हा युगाच्या अवकाशातलं
वर्तमान आणि भविष्याचं विराटपण सहजपणे
तेव्हा राजवाड्याच्या भुलभुलॆय्यातली लहान लहान अंतरं
चकवे आणि तळघरं तू पार करत असशील निर्धाराने

कालयवन, जरासंध, शिशुपाल, कौरव.. दुष्टशक्तींच्या विनाशात
तो महानायक गुंतला असेल
तेव्हा तू असशील मुलाला पाजवत, निजवत, गोष्टी सांगत
बापाच्या दूर असण्यानं तो दुखावू नये म्हणून काळजी घेत
उद्याचा यदुनायक वाढवत असशील

तुझं आईपण अवघड आणि बाईपण त्याहूनही अवघड
तरी कशी सोपंच करत गेलीस तू त्याला
तुझ्या आयुष्यातून निसटून जगडव्याळ पसरत जाणं ?
कसं समजलं तुला हे अवघडातलं सोपेपण
म्हणजे स्वाभाविक जगण्यासाठी दुस-याला मोकळं करणं ?
आणि म्हणजेच संपूर्ण प्रेम करणं

अरूणा ढेरे

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून।
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून…।

तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिनकळणारे
धुंदमदिर निळे तळे…

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले।
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता…।

पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना…

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची

तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं.
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो।
राधे, पुरुष असाही असतो! …………।

अरूणा ढेरे..