Thursday, August 21, 2008

अनुभव..

अनेक दिवसांनी trekking ला जायचा योग आला. गडाच्या पायथ्याशी एका ओळखीच्या मुलीचे घर होते. तिच्याकडे रात्री मुक्काम केला. मुलगी अतिशय कष्टाळू.. गावात घर.. पुण्यात राहून शिकणारी. गावातले घर डोंगराच्या पायथ्याशी.. घरात एकूण माणसे सात..

आजी.. शहरात एखादया दिवशी वीज नसेल तर गॅसवर पाणी तापविण्यासाठई एखादे जड पातेले उचलताना मला त्रास होतो. आजीबाई भराभर चार पाच पातेली चुलीवर चढवत – उतरवत होत्या.

आई.. सर्व मुलींवर सारखीच माया.. आणि अंगात ताप असताना व आम्ही आमचे डबे सोबत नेलेले असताना.. भात, भाजी, पापड, पोळ्या असा एकूण २० माणसांचा स्वयंपाक चूल व स्टोव्ह वापरुन केला. शहरात चार पाहुणे येणार असतील तर काय मेनू करायचा हे चार दिवस ठरत असते आपले..

(सारेगमप या झी मराठी वरील कार्यक्रमात अवधूत गुप्तेने एक जोक केला.. एका मुलीने ’कोण येणार गं पाहुणे’ हे गाणे गायल्यावर अवधूत पल्लवीला म्हणाला.. हे गाणे म्हणणा-या व्यक्तीचे शहर कोणते..

१. पुणे
२. मुंबई
३. कोल्हापूर.

पल्लवीला उत्तर सुचेना.. यावर अवधूत म्हणाला.. पुणे नक्की नाही.. पाहुणे येणार याचा इतका आनंद पुणेकरांना होणे शक्य नाही… )

तर.. घराभोवती शेती.. फ़ुलझाडे, भाज्या.. माझ्या घराभोवती असलेल्या चिमुकल्या बागेत काम करणे मला शक्य होत नाही आणि इकडे प्रपंच, म्हॆस .. पाहुणेरावळे, गावातील एक दुकान सांभाळून ती माऊली शेत पाहात होती.

ज्या मुलीकडे राहिलो ती आरामात डोक्यावर दोन हंडे घेऊन पाणी घेऊन आली.. (लांबून पाणी आणायला लागले तरी ’आम्ही आंघोळी करून गड चढायला का जात नाही अशी आजीबाईंची कुरकुर चालूच होती)..

स्वत:ची लाज वाटावी असे हे अनुभव.

Saturday, July 12, 2008

श्रीधर फ़डके यांच्या गाण्यातील पाऊस.. २

ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा
भिजूनी उन्हे चमचमती,
क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा

मनभावन हा श्रावण,
प्रियसाजण हा श्रावण भिजवी तन,
भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा

नभी उमटे इंद्रधनू,
मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा, जुळवितसे सहज दुवा

गीत : शांता शेळके
संगीत : श्रीधर फ़डके
गायिका : आशा भोसले
अल्बम : ऋतू हिरवा

. ’ऋतू हिरवा’ ही कॅसेट आली तेव्हा एक लक्षात आले, ज्या ज्या मराठी घरात शेल्फ़मध्ये वरती सुधीर फ़डके यांचे गीतरामायण असते. तेथे शेजारी श्रीधर फ़डके यांच्या ऋतू हिरवा आवर्जून विराजमान झालेला असतो.प्रचंड गाजलेला हा अल्बम.. आशा भोसले यांनी या गाण्यांचे सोने केलेले आहे.

२. ’ऋतू हिरवा’ हे कायम हिरवेगार असणारे एक पावसाचे गाणे आहे. शांता शेळके यांचे शब्द अतिशय चपखल.. तोच चंद्रमा नभात, रेशमाच्या रेघांनी पासून अनेक गाणी त्यांनी दिली आहेत. या गाण्यात ’नितळ निळ्या अवकाशी, मदनाचे चाप जणू’.. हे शब्द किती सुरेख गायले गेले आहेत. सुधीर फ़डके यांच्या गायनाचे वॆशिष्ट्य म्हणून ’त्यांचे शब्द गाण्यात भाव घेऊनच उतरायचे’ असे नेहमी सांगितले जाते. तोच वारसा ऋतू हिरवा व श्रीधरजींच्या इतर अल्बममध्ये स्पष्ट जाणवितो. गगनाशी धरणीचा, जुळवितसे सहज दुवा .. ही कल्पना किती सुंदर आहे. एका कवितेत ’माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाशशृतींनी जरा कानोसा देऊन कधी ऎकशील का रे.. अशी विनवणी . आणि पहिल्या पावसानंतर आकाश व धरतीचे मिलन दाखविणारे वरचे गाणे .. शब्दांचे सामर्थ्य दाखविणा-या दोन्ही कविता..

३. तर पाऊस..

आपण असतो
कुणी कुणाकुणाचे.
तसा पाऊसही....

पाऊस कधी जिवलग
कधी सखा कधी स्नेही
कधी दूरचा
कधी अगदी आतला अनाम....
नात्यातला.

कधी तोच असतो अनावर आवेग
कधी तोच असतो अचेतनाचा रंग
आणि अनेकदा
विशुद्ध पाऊसदेखील....

जगजीतने गायलेल्या एका गझल मध्ये हा पाऊस
बरसात का बादल तो आवारा हॆ क्या जाने
किस छतको भिगोना हॆ किस राहसे बचना हॆ.. असे आवारापन घेऊन येतो.

४. भिजूनी उन्हे चमचमती.. याचा प्रत्यय नुकताच कोकणात केलेल्या प्रवासात आला. कानाला लावलेल्या आयपॉडवर ’ऋतू हिरवा’ वाजत होतं.. बाहेर रिमझिम पाऊस… क्षण दिपती.. क्षण लपती.. याचा परत एकदा प्रत्यय आला.

५. थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा .. हाच आशय मांडणारी अजून एक कविता..

असे मृगाचे दिवस
धुंद कोसळे पाऊस
गर्द पोपटी रानात सखे हरवून गेले

वेळ जांभळी जांभळी
उन्हे चाफ़्यात लपली
रंग माखून हसले डोळा सांजस्वप्न झेले

झिरमिळती पालवी
वेल उसासली नवी
मॆनेसवे राघू बाई काही भलतेच बोले..

६. गाण्यातून सुध्दा भिजवी तन, भिजवी मन हा प्रत्यय देणारे गाणे. कितीही वेळा ऎकले तरी ते ’हिरवेगार’ सतेज, टवटवीत आहे.. श्रीधर फ़डके यांचे कविता निवडण्याचे, त्याला योग्य त्या चाली बांधण्याचे वेगळेपण, विलक्षण तन्मयता या त्यांच्या सुरूवातीच्या अल्बमपासून दिसते.

Friday, June 27, 2008

श्रीधर फ़डके यांच्या गाण्यातील पाऊस.. १

रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी
आठवणींच्या गंधफ़ुलांनी दरवळणारा श्रावण मी
आकाश पावसाचे ते रंग श्रावणाचे..
ओथंबल्या क्षणांचे
हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फ़िरताना
पाऊसओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना
तुझ्या मनाच्या हिरव्या रानी भिरभिरणारा श्रावण मी..
रंगली फ़ुगडी बाई रानात रानात
वाजती पॆंजण बाई तालात तालात
फ़ांदीवरला झोका उंच उंच गं झुलताना
हात तुझा मेंदीचा हळूच पुढे तू करताना
तुझ्या गुलाबी ओठांवरती थरथरणारा श्रावण मी..
पावसातले दिवस अपुले शोधतेस आज जिथे
तुझे नि माझे गीत कालचे ऎकतेस आज जिथे
तिथेच कोठेतरी अजूनही मोहरणारा श्रावण मी
अजूनीच त्या ठिकाणी ती श्रावणओली गाणी
माझी तुझी कहाणी..

गीत: अनिल कांबळे
संगीत : श्रीधर फ़डके
गायक : सुरेश वाडकर
अल्बम : तेजोमय नादब्रम्ह

१. अनिल कांबळे व श्रीधरजी यांचे गाजलेले गाणे म्हणजे ‘त्या कोवळ्या फ़ुलांचा बाजार पाहिला मी’..

२. हे वरचे गाणे म्हणजे रोमॅंटिक या सदरातले.. हुरहुर लावणारे.. ती त्याच्या आयुष्यात आता नाही. त्याच्या संसारात तो सुखी असावा.. तीही आहे तिथे सुखात असावी.. पण श्रावणातल्या थेंबांसोबत आठवणी मनाला बिलगतात..
मोरपिसांचा पाऊस यावा
निळसर हिरव्या हळव्या रात्री
स्पर्शलिपीतून लिहिले जावे
हस्तीदंती रेखीव गात्री

त्या अवस्थेत कॉलेजमध्ये असतानाच्या श्रावणातल्या आठवणी आल्या आणि हे गीत बनले. हे दोन वेगळ्या कवितांचे मिळून एक केले आहे. (असावे !).. कारण ‘श्रावण मी’ हे यमक जुळणारी एक कविता आहे व मधल्या काही ओळी दुस-या कवितेतील असाव्यात.. असा प्रयोग श्रीधरजींनी ‘हे गगना’ मध्ये तीन कविता एकत्र करून ‘क्षितीजी आले भरते गं’ मध्ये केला आहे.

३. एकाच श्वासात पहिली व दुसरी ओळ म्हणणे यात अपेक्षित आहे असे मध्यंतरी झालेल्या एका कार्यक्रमात स्वत: श्रीधर फ़डके यांनीच सांगितले.’रंगली फ़ुगडी बाई’ आणि ‘वाजती पॆंजणे तालात’ मध्ये ‘फ़ुगडी’ घालणा-या मुली साक्षात डोळ्यासमोर येतात.. रिमझिम हा शब्द मध्ये या गाण्यात आठ वेळा म्हणला गेला आहे. तो रिमझिम पाऊस भोवताली पडतो आहे असे नीट्पणे ऎकले तर वाटेल.४. सुरेश वाडकर व सहका-यांनी हे गाणे सुरेख गायले आहे. दरवळणारा, थरथरणारा, भिरभिरणारा, मोहरणारा श्रावण साक्षात मनात उभा राहतो. ‘गुलाबी ओठ’ हे शब्द किती गुलाबी मुलायमपणे म्हणले गेलेत ते ऎकूनच कळेल.. ‘ये आंखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते हॆ’ या गाण्यातला सुरेश वाडकर यांचा आवाज आठवतो.

५. गच्च भिजलेले रान, थेंबाथेंबात दाटलेला पाऊस, हिरव्या मखमली वाटा.. एकटाच आठवणी मनात घेऊन फ़िरणारा तो.. असे शब्दचित्र शब्द, सूर व गीत यांच्या माध्यमातून सहज उभे राहाते..

६. तिनेही जर हे गीत ऎकले तर ..
देह झाला कस्तुरीचा केवडाही घमघमे
इथे तिथे ठायीठायी गंधभारला पाऊस..

अशीच तिची अवस्था होईल..

आकाशात फ़ुललेली
मातीतील एक कहाणी
जो प्रवास सुंदर होता
आधार मातीला धरती
तेजोमय नक्षत्रांचे
आकाश माथ्यावरती
सुख आम्रासवे मोहरले
भोवताल सुगंधी झाले
शून्यामधली यात्रा
वा-यातील एक विराणी
गगनात विसर्जित होता
डोळ्यात कशाला पाणी..

कुसुमाग्रज

याच कवितेतील भाव ‘रोज तुझ्या’ मधे आहे. ती श्रावणओली कहाणी ऎकून मनातल्या सुप्त तारा झंकारतात. सुखद आठवणींचे सूर उमटून एक हलकेसे स्मित ओठांवर येते..

‘मेरे दुश्मन तू मेरी दोस्तीको तरसे’ वगॆरे गाण्यांमधला शाप या गाण्याला नाही. ‘हॆ दुनिया उसीकी जमाना उसीका मुहोब्ब्त में जो हो गया हो किसीका’.. असे शांतपणे स्वीकारणा-या वृत्तीचे हे गाणे आहे..

Wednesday, March 26, 2008

फ़िटे अंधाराचे जाळे

फ़िटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
दरीखो-यातून वाहे
एक प्रकाश प्रकाश !
रान जागे झाले सारे
पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी संगे
जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य आले भरास भरास..

दंव पिऊन नवेली
झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने
आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास..

झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा
सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास..

सा-या रंगावर आली
एक सोनेरीशी झाक
भिडे काळजाला थेट
निळ्या क्षितिजाची हाक
तुझ्या नसण्याची कळ गेली तळास तळास... .

सुधीर मोघे

या गाण्याबद्दल मनात लिहावेसे खूप वाटत असूनही लिहिले नाही कारण श्रीधरजींची श्रवणीय परंतु रसिकांपर्यंत न पोहोचलेली गाणी निवडून त्याबद्दल लिहावे अशी इच्छा होती... कोणत्याही कार्यक्रमात फ़र्माईश होतेच ते हे गाणे.. या गाण्याबद्दल सर्वपरिचित गोष्टी म्हणजे..
१. हे लक्ष्मीची पाऊले या मराठी चित्रपटातील गाणे आहे.
२. हे सुधीर फ़डके व आशा भ्रोसले यांनी (अप्रतिम) गायले आहे.
३. मुलाच्या संगीतदिग्दर्शनाखाली वडिलांनी गायलेले गीत हे याचे अजून एक वॆशिष्ट्य..
४. यातील शेवटचे कड्वे चित्रपटातील प्रसंगाला अनुरुप नसल्याने ते द्वंद्वगीतात वगळले आहे...

गाणे म्हणून हे किती 'जमले' आहे.. ते त्याच्या लोकप्रियतेमुळे जाहीरच आहे.. पण गाणे झाले नसते तरी मूळ कविता अतिशय सकारात्मक दृष्टीकोन मांडणारी आहे.

अगदी वॆयक्तिक अशी एक आठवण माझ्यापाशी या गाण्याची आहे.. ..मनावर काजळी धरलेले काही अतिशय उद्विग्न क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात.. तसे ते माझ्याही आयुष्यात असतानाच्या काळात मी सिध्द समाधी योगाचा कोर्स केला. तो कोर्स करताना शेवट्चे चार दिवस आम्ही शांतिवन येथे गेलो होतो. मनात येईल ते गाणे म्हणा असे ठरले. खरे तर वेळ संध्याकाळची होती.. 'सांज ये गोकुळी' सारखे गाणे जास्त शोभले असते.. पण त्या वातावरणामुळे मनातला काळोख दूर झाला होता.. आणि माझ्या मनात हेच शब्द आले..
झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा
सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास

'फ़िटे अंधाराचे जाळे' या अल्बममध्ये हे स्वत: श्रीधरजींनी गायले आहे.. 'एक अनोखे लावण्य'.. किंवा 'सोनसळी अभिषेक' या शब्दातील 'चित्र' संगीत व सूर यांच्या साहाय्याने जिवंत झाले आहे..

सा-या रंगावर आली
एक सोनेरीशी झाक
भिडे काळजाला थेट
निळ्या क्षितिजाची हाक
तुझ्या नसण्याची कळ गेली तळास तळास..
हे चित्रपटात नसलेले शब्द.. Our sweetest songs are those that tell of saddest thought. Percy Bysshe Shelley.. किंवा हवेहवेसे दु:ख तुला जर हवेच आहे नकोनकोसे हळवे कातर बोलू काही.. या दोन्हीतले ते 'हवेहवेसे दु:ख' या श्रीधरजींनी गायलेल्या गाण्यात उतरले आहे.. 'रंग किरमिजी' .. 'अवेळीच केव्हा दाटला अंधार' .. या गाण्यांमधून असेच दु:ख झिरपते.. दु:खी दर्दभरी .. हळवी गाणी संवेदनाशील मनांना एक वेगळा आनंद देऊन जातात.. असे स्वर आहेत तलत मेहमूद किंवा मेहंदी ह्सन यांचे..

'मन मनास उमगत नाही' ने एक अस्वस्थता निर्माण होते.. तर 'फ़िटे अंधाराचे जाळे' या गाण्याने जगण्याची नवीन उर्मी प्राप्त होते..

सुधीर मोघे.. सुधीर फ़ड्के.. आशा भोसले व श्रीध्रर फ़ड्के यांनी हे गाणे अजरामर केले आहे

दिवे देहात स्पर्शाचे


दिवे देहात स्पर्शाचे जळाया लागले होते
तुझ्या बाहूत मी जेव्हा ढळाया लागले होते

ऋतू एकेक स्वप्नांचे फ़ुलाया लागले होते
तुझ्याशी रेशमी नाते जुळाया लागले होते

तुला मी सांगण्या आधी
मला तू सांगण्याआधी
मनातील एकमेकांना कळाया लागले होते

तुझ्यामाझ्यातील जेव्हा
गळाली बंधने सारी
सुखाचे शहर चंदेरी दिसाया लागले होते

दंवाने चिंब झालेल्या कळीचे फ़ूल होताना
पहाटे स्वप्नरंगांनी दिशा उजळून येताना
मला आकाश पूर्वीचे मिळाया लागले होते

गीत : अनिल कांबळे
संगीत : श्रीधर फ़डके
गायक : श्रीधर फ़डके / अनुराधा पॊडवाल
अल्बम : अबोलीचे बोल

अगदी एक सहज वाटणारं प्रेमगीत.. युगुलगीत.. असं या गाण्याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर होतं.. पण एके रात्री निवांतपणे गाडी चालवत असताना गाणं जरा जास्त लक्षपूर्वक ऎकलं. आणि त्यातील 'सुखाचे शहर चंदेरी' मला दिसले.

तुला मी सांगण्या आधी
मला तू सांगण्याआधी
मनातील एकमेकांना कळाया लागले होते

याचा अनुभव प्रेमात पडल्यावर येतो... पण

तुझ्यामाझ्यातील जेव्हा
गळाली बंधने सारी
सुखाचे शहर चंदेरी दिसाया लागले होते..

ही बंधने किती आणि कोणती 'गळाली' हे ज्याचे त्याने ठरवावे.. ती गळाली आहेत हा अनुभव फ़ार फ़ार वॆयक्तिक असतो. आणि ती जाणीव फ़ार सुखद असते. कारण

प्रीतीची वाट नेहमीच जात असते अथांग जळातून
वाळूवरच्या पावलांनी तिचा माग लागत नसतो..

पण एकेक पापुद्रा निघत जातो.. तसतसे त्या रेशमी नात्यातील पदर उलगडत जातात.. यात 'मी' पणाचेही बंधन कधीतरी गळून पडते.....

जवळपणात होतो दूर आता दुरून झालो जवळ
म्हणू नकोस जाणूनबुजून मीच माया केली पातळ

तशी आठवण येत नाही भेटीचीही काय जरूर ?
सूर वाहे ऊर भरुन घरांत देखील चांदणे टिपूर

इतके दिवस हसत रुसत वाटले सृष्टीत नटली आहेस
आता कळते खोल खोल माझ्याच दॄष्टीत मिटली आहेस

गंध होऊन हुलकावण्यांनी अवतीभवती राहिलीस खेळत
आता माझ्यात श्वास होऊन वहात असतेस सहज नकळत

कधी कामात कधी गाण्यात फ़ुलताफ़ळता भानात नसतो
तुला विसरुन अष्टौप्रहर तुझ्यात असतो

आता तारे पिकत चालले आकाश झाले निरभ्र निवळ
दुरुन जवळ झालो तसे क्षितिजदेखील आले जवळ...

बा.भ.बोरकर

'तुला विसरुन अष्टौप्रहर तुझ्यात असतो'.. यात सगळी बंधने गळाली आहेत असे लक्षात येते.

दंवाने चिंब झालेल्या कळीचे फ़ूल होताना
पहाटे स्वप्नरंगांनी दिशा उजळून येताना
मला आकाश पूर्वीचे मिळाया लागले होते

प्रेमात पडल्यावर परत एकदा आयुष्यातले सोनेरी दिवस जागे होतात..

आकाश पाणी तारे वारे सारे
सारे सारे ताजे होतात
वर्षांच्या विटलेल्या बधीर मनाला
आवेगांचे तुरे फ़ुटतात..

याचा प्रत्यय येतो..

पाऊस या विषयाप्रमाणेच प्रेम या विषयावर कविता न लिहिलेला कवी सापडणे दुर्मिळ..

'ऋतू एकेक स्वप्नांचे'.. खरोखर फ़ुलाया लागले आहेत असे वाटावे असे ते शब्दोच्चार येतात.. श्रीधरजींची युगुलगीते फ़ारशी नाहीत. पण या कवितेशी. गाण्याशी मनाचे नाते या गीतातून नक्कीच जोडले जाते..

Tuesday, March 25, 2008

सल..

सल..

संध्याकाळची हुरहुर लावणारी वेळ.. रिकामपण असेल तर मनात अशा वेळी हमखास कातर आठवणी जाग्या होतात. शांता शेळके यांच्या

कोमल हळवी उदास झाली मावळतीची किरणे
आतआतूनी दाटुन आली विस्मृत काही स्मरणे..

या ओळी आठवल्या. आज तर अचानक मोबाईलवर एक मेसेज आला होता. त्या मेसेज पाठविणा-या व्यक्तिचे नाव पाहून ती अजूनच हळवी झाली.. मन थेट दहा वर्ष मागे गेले..

डोळ्यात आनंदाची फ़ुलपाखरे घेऊन ती अल्लडपणे नाचतच घरी आली. शनिवार रविवार शाळेला सुट्टी .. थोडा गृहपाठ संपवला की टीव्ही बघायला, लायब्ररीतील पुस्तक वाचायला ती मोकळी होणार होती.. आल्या आल्या आई रागावली.. “अगं गधडे.. आता तू लहान आहेस का? नववीत गेलीस तरी नाचानाच थांबत नाही तुझी..!”

ती काहीच बोलली नाही. तितक्यात टेबलाजवळ खुर्ची ओढून मटारचे दाणे सोलणारा इंद्रनील तिला दिसला. इंदरदादा आला की नेहमीच त्याच्या आत्याला म्हणजे तिच्या आईला मदत करायचा. आई त्याच्याशी माहेरचा माणूस म्हणून गप्पा मारण्यात रमून जायची. तो लहान असल्यापासून मोठ्या भावाचा मुलगा.. असे ममत्वाचे, जिव्हाळ्याचे नाते आईचे त्याच्याशी जडलेले तिला जाणवायचे.

आत्तादेखील आता नेहमीप्रमाणे मटारची उसळ न करता ’सामोसे’ करायची स्पेशल फ़र्माईश इंद्राने आत्याला केलीच होती. आणि सामोसे हवे असतील तर मुकाट्याने मटार सोलायचा त्याला हुकूम मिळाला होता.

झाले..आईला आता दोन दिवस तिच्याकडे लक्ष द्यायला फ़ार वेळ मिळणार नव्हता.. बाबा शनिवार रविवारी फ़क्त यायचे.. त्यांनाही या रविवारी यायला जमणार नव्हते.. तिच्या भावविश्वातील कार्यक्रमांना काहीही अडथळा नव्हता. आता पटापट अभ्यास संपवून मस्तपॆकी आवडती गाणी ऎकत.. कांदबरी घेऊन स्वत:च्या कोशात शिरणे फ़ार सोपे झाले होते..

सोपस्कार म्हणून जेवणाच्या टेबलावर ती आई व इंदरदादाबरोबर जेवायला बसली. नेहमी ती त्यांच्या ’नातेवाईकांच्या’ गप्पात नसेच. पण अचानक रेडिओवर ’चुपके चुपके’ ऎकू आली.. आणि दादा म्हणाला.. “अरे वा.. हा तर गुलाम अली”.. ती तिला नव्यानेच प्राप्त झालेले ज्ञान प्रकट करत म्हणाली ’हे तर निकाह या सिनेमातील गाणे आहे. मला फ़ार आवडते’. मग इंदरदादाने तिला गुलाम अली हा कसा एक गजल गायक आहे.. ही त्याची लोकप्रिय गजल आहे.. म्हणून सिनेमात घेतली आहे.. इ.इ. तपशील पुरवले.. तसेच त्या रेकॉर्डमधे नसलेले दोन शेर अर्थांसहित उलगडून दाखविले..

जेवणाच्या टेबलावर मग स्वत:ला नव्याने आवडायला लागलेला एक क्रिकेटवीर..त्याचे पोस्टर.. नव्याने प्रदर्शित झालेला एक ’लव्हस्टोरी’ असलेला सिनेमा. त्यातला नवोदित हिरो.. आवडत्या कविता.. पुस्तके.. मनाला अचानक आवडायला लागलेल्या आर्ट फ़िल्मस.. हे सगळे इंदरदादाशी किती बोलू अन किती नको असे तिला होऊन गेले.. त्या सगळ्यातली त्याला किती माहिती आहे हे जाणवून ती स्तिमितच झाली.

दोन दिवस स्वत:च्या विश्वात घालविण्याचा निर्धार कुठल्या कुठे पळून गेला. आणि इंदर पण त्याच्या मावशीकडे जायचा होता तो न जाता त्यांच्याकडेच थांबला. रात्री पण ब-याचवेळ त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. मग रात्री बारा वाजता कॉफ़ीचा एक राऊंड झाला… परत गप्पा.. पहाटे कधीतरी ती भारावलेल्या मनाने झोपी गेली.

रविवारची सकाळ एकदम सुंदर उजाडली. बागेतील जुईच्या फ़ुलांचा गजरा आपल्या लांबसडक वेणीवर माळून व नव्यानेच शिवलेला एक चुडीदार घालून ती तयार झाली. दादाच्या एका हॉस्टेलवर रहाणा-या मॆत्रिणीला भेटायचे ठरले होते. मग काय .. तिला हॉस्टेलपर्यंतचा रस्ता चांदण्यांच्या पायवाटेसारखा भासला. त्याच्या मॆत्रिणीला भेटणे, हॉटेलमध्ये जाणे, दादाने स्वत:च्या मॆत्रिणीला हिची ’हुशार आहे हं अगदी’ अशी करून दिलेली ओळख.. सगळे काही तिला सुगंधी, हळव्या स्वप्नांसारखे भासत होते.

दोन दिवस आलेला इंदर तिच्या आयुष्यात एक अनोखे दालन उघडून त्याच्या नोकरीच्या गावी निघून गेला. मग तिला काही दिवस एकदम सुने सुने वाटले. मॆत्रिणींना त्याच्याबद्दल सांगून झाले होते.

दहा बारा दिवसात मग एक नवल घडले. आईला आलेल्या इंदरच्या पत्राच्या पाकीटात एक पत्र तिच्यासाठीही होते. त्याने इतर गोष्टींबरोबरच स्वत:ची एक कविता लिहून पाठवली होती. नोकरीला लागल्यापासून कविता करणे विसरलो होतो पण ’तिच्याशी’ गप्पा झाल्याने परत कविता स्फ़ुरल्याचा आवर्जून उल्लेख त्यात होता. पत्ररूपाने त्याच्याशी संवाद साधणे त्यानंतर सुरू झाले.. त्याच्या पत्रातल्या ’बूर्ज्वा’ या शब्दाचा अर्थ तिला कळलाच नाही. तेव्हा मग त्या एका ’शब्दावर’ त्याचे चार पानी लांबलचक उत्तर आले. शाळा, अभ्यास, परीक्षा यात दिवस आनंदाने जात होते. आणि त्या आनंदात या पत्रांच्या संवादाची भर पडत होती.

त्याला पत्रात लिहीण्यासाठी कविता जमवणे (कधीतरी स्वत: लिहिणे) चालू झाले.. एखादे पुस्तक ..चित्रपट आवडला की त्याच्याबरोबर ’शेअर करायला हवे’ हे आपोआप मनात यायचे.
इंदर दिवाळीत, मे महिन्याच्या सुट्टीत येत राहिला .तो असायचा तेवढे चार पाच दिवस नुसती धमाल असायची. एका सुट्टीत तो आला आणि एका सिनेमाची तिकीटे काढली आहेत असा फ़ोन आला. ती तिच्या मावसबहिणीसोबत थिएटरवर पोहोचली तोपर्यंत जरा उशीरच झाला होता.. इंदर सहज म्हणाला.. “आली नसतीस तर तिकीटे फ़ाडून टाकणार होतो”… ती पाहातच राहिली. आता अकरावीत.. कॉलेजमध्ये नुकतीच गेलेली ती.. इंदरबरोबर एक लोभस नाते तयार होत होते. कॉलेजमध्ये तिला इतरही मित्रमॆत्रिणी मिळाले होते. पण या नात्यात जास्त आनंद होता.

इंदरच्या बहिणीचे लग्न झाल्यापासून त्याच्या लग्नाचाही नातेवाईकांनी धोषा लावला होता. तीही त्याच्यात सामील झाली.. त्याला त्याच्या हॉस्टेलवरच्या मॆत्रिणीवरुन चिडवून झाले. मग एकदा लग्न व लग्नसंस्था यावर त्याच्याशी बोलणे हे ओघाने आलेच.

कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या दिवाळीच्या सुट्टीत इंदर आला. त्याने मुलगी पसंत केल्याची बातमी तिला मावसबहीणीकडून कळली होतीच. त्याचे मधल्या काळात पत्रही नव्हते.. त्याच्यावर ’मला का सांगितले नाहीस सर्वांच्या आधी’ असे रूसण्याचे मनात पक्के झाले होते. पण यावेळेला तिच्या एकटीशी इंदर बोललाच नाही. जो काही आला तो माणसांच्या गराड्यात.. आईला ती म्हणालीसुध्दा ’नेहमी तर पत्र पाठवतो मला.. मग ही आयुष्यातील महत्त्वाची बातमी का नाही कळवली. मी रागावले आहे त्याच्यावर’.. त्यावर शांतपणे आई म्हणाली ’अगं गडबडीत राहून गेलं असेल’.. ’मला’ सांगायला गडबडीत राहून गेलं.. डोळे नकळत पाण्याने भरले..

त्यानंतर एका नातेवाईकांकडे इंदर भेटला. बाहेर पडताना ते दोघेच बाहेर पडले. तो गप्पगप्पच होता. तो काहीतरी सांगेल अशी काही क्षण वाट बघून तिनेच न राहवून विचारले.. ’कशी आहे मुलगी… नाव काय आहे ? फ़ोटो तरी दाखव’.. मला तुझ्या लग्नाची साडीच घे बरं का” .. त्यावरही जुजबी उत्तरे देऊन त्याने विषय बदलला. तिचे कॉलेज कसे चालले आहे हे आवर्जून विचारले. खूप ठाम स्वरात म्हणाला.. नीट शिक.. तू फ़ार हुशार आहेस. मनात आणलंस तर कुठल्या कुठे जाशील. बोलता बोलताच त्याने एक रिक्षा थांबवली आणि तिला त्यात बसवून देऊन रिक्षावाल्याला पत्ता सांगितला..

तिच्या तोंडून तर शब्दच फ़ुटेना.. त्याला तिची पर्वा नाही म्हणावे तर त्याचे आत्ताचे शब्द काळजीतून आलेले होते.. मग लग्नाच्या बाबतीत का विषय टाळत होता तो ? घरी परतताना तर नुकताच घडलेला प्रसंग खरा आहे असे वाटतच नव्हते.. मग कित्येक दिवस आणि रात्री ’तो असा का वागला ?’ याच विचारात गेल्या.

लग्नाचे रीतसर निमंत्रण आले. आईने किती आग्रह केला तरी परीक्षा, अभ्यास याची कारणे सांगून तिने जाणे टाळले. तिचे शिक्षण पूर्ण झाले. नोकरी मिळाली..लग्न झाले.. मनासारखा जोडीदार लाभला. हळूहळू इंदर शेवटी जाताना असे का वागला हा प्रश्न मनाआड गेला..

आणि आज त्याच्या अचानक आलेल्या मेसेजने तो सल परत बोचायला लागला.

आज अचानक ’त्या’ मेसेजने सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. मनाच्या तळाशी काहीतरी खोलवर जाऊन दडलेले असते.

इंदर त्याच्या ऑफ़िसच्या कामासाठी तिच्या शहरात येणार होता. भेटता येईल का? असा मेसेज होता. त्यांचे नाते पहाता त्याला घरी रहायलाच बोलविणे तिला आवडले असते. पण मधल्या काळात एक दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे एक दिवस संध्याकाळचे ’जेवायला ये’ असे निमंत्रण देऊन तिने त्याक्षणी मनातले विचार थांबविले.

ठरल्यादिवशी, ठरलेल्या वेळेला घरातील सर्वांसाठी रीतसर भेटवस्तू घेऊन इंदर आला. . सूपपासून स्वीट डिशपर्यंत नीट जेवण झाले. सुपारी झाली. जेवताना नवीन पुस्तके, चित्रपट, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम या विषयावर चर्चा झाल्या.

कोणे एके काळी इंदरला किती माहिती असते याचे तिला किती आकर्षण वाटले होते. आता तिलाही त्या सगळ्या विषयांमध्ये माहिती होतीच.. हरवला होता तो संवादातील सहजपणा. संवादात मोकळेपणा,
दुस-याशी शेअर करण्याची वृत्ती असणे आणि छाप पाडण्यासाठी माहितीचे प्रदर्शन करणे वेगळे असते. .. त्यामुळे इंदर उगाचच छाप पाडण्यासाठी ते सगळे संवाद वाढवतो आहे असे वाटले.

तिने मनाशी परत विचार केला. पूर्वग्रह मनात धरुन बघत होती का ती या सगळ्याकडे ? तिची हुशारी मनमोकळेपणाने कबूल करणारा इंदर आता तिच्यावर कुरघोडी करण्यासाठी बोलत होता. मूळ विषय बाजूला राहून ’मला किती माहिती आहे’ हेच सारखे त्यातून प्रकट होत होते.

बोलता बोलता रात्र अंधारली. घरातल्या सगळ्यांचा ऒपचारिक निरोप घेणे झाले. त्याला सोडण्यासाठी म्हणून ती बंगल्याच्या फ़ाटकापर्यंत आली. जुईचा गंध आवडणारी तिच्यातली ’ती’ तशीच होती. आणि अचानक तिला जाणीव झाली.. की पाऊस पडतो आहे. घरात बसून ते कळलेच नव्ह्ते. नाजूकसे थेंब पडत होते. जुईच्या पाकळ्यांवर अलगद पाऊस थरथरत होता. बागेतल्या दिव्याच्या प्रकाशवलयात पावसाचा शिडकावा दिसत होता. मनाला सुगंधित करणा-या त्या वातावरणात ती अजूनच हळवी झाली.

अनेक वर्षापूर्वी इंदर अचानक का सोडून गेला ते तो सांगेल.. त्याने ते सांगावे अशी अपेक्षा तिच्या मनात आली. त्या विचाराने ती विलक्षण चकित झाली. मनाच्या कप्प्यात ’तो अचानक गेला’ हा सल .. व त्याचबरोबर एकदा कधीतरी त्याने त्याचे कारण सांगावे ही अपेक्षा हातात हात घालून होती याची एखाद्या साक्षात्कारासारखी तिला जाणीव झाली.
स्वत:च्या मनाला आपण पूर्ण ओळखतो असे तिला नेहमी वाटे.. आज लक्षात आले की.. नात्यातले अनेक धागे, पीळ, गुंफ़ण आपल्या मनातील अदृश्य पातळीवर असतात.

हा सगळा मॆलोगणती प्रवास तिच्या मनाने काही सेकंदात केला. त्याला मात्र ते कळलेही नाही. इतकी वर्षे तिने बाळगलेली वेदना त्याच्या खिजगणतीतही नव्ह्ती. ऑफ़िसच्या ज्या कामासाठी तो आला होता त्याबद्दल तो आत्मीयतेने बोलत होता. त्यातही तिला उगाचच वाटून गेले की तो स्वत:चे काम, पंचतारांकित हॉटेलातील वास्तव्य याचे प्रदर्शन करतो आहे. परदेशात जाण्याच्या संधीचा आवर्जून उल्लेख त्यात होता. तिने व तिच्या नव-याने स्वखुषीने परदेशातील मानाच्या संधी सोडून भारतात राहणे स्वीकारले होते. तिचे १०-१२ देश बघून झाले होते.. ते इंदरला खुपते आहे म्हणून परदेशात जाण्याच्या संधीचा उल्लेख होतो आहे का?

“उगीचच असाच विचार करू नकोस.. “ स्वत:च्या मनानेच तिला फ़टकारले.

“परत भेटू.. “ इंदर जाताना म्हणाला. त्याच्या घरी यायचे आमंत्रण त्याने दिले नाही हा विचार तिच्या मनात अकारण चमकून गेला.

इंदर ’त्यावेळी’ असा का वागला हे कधीतरी परत भेटला की सांगेल ही आशा बाळगणे जास्त सोपे होते. आपण आपल्या जवळच्या माणसाकडून केलेली अपेक्षा त्याला समजली नाही हा नवीन सल मात्र आता कायमचा सोबती होता.

समाप्त..

संचित..

संचित..

स्टेशनचा गजबजलेला परिसर.. लोकल पकडण्याची प्रत्येकाची धांदल.. कोणाच्या मनात शानिवार, रविवार आता आनंदात घालवायची स्वप्ने.. कोणी शुक्रवारची संध्याकाळ ’ति’च्या सहवासात घालविण्यासाठी आतुर.. कोणी दोन दिवसांची सुट्टी एकट्याने कशी घालवावी या चिंतेत.. तर कोणी पाच माणसांच्या घरात एकांत कसा मिळेल याचा मनात विचार करतो आहे.

त्याच्याही मनात एक विलक्षण व्याकुळता.. लोणावळ्याला जाणारी लोकल पकडण्याची ही पहिली वेळ नव्हेच.. नोकरीच्या निमित्ताने पाच वर्षापूर्वीपर्यंत तर ते रोजचे आयुष्य होते.. मग पुण्यात नोकरी मिळाली. सुंदर, समजूतदार बायको.. एकुलता एक मुलगा.. घर, गाडी .. सगळे काही गेल्या पाच वर्षात जमले. आईला समजून घेणारी बायको मिळाल्याने तो दॆवावर जास्तच खुष होता. वडील गेल्या वर्षी गेले.. सावत्रपणाचा दुरावा वडिलांच्या वागण्यात कधी आला नाही. ते गेल्याचे दु:ख ताजे होते..

पण.. पण स्वत:च्या सख्ख्या वडिलांना न पाहिल्याची खंत मनातून कधीच गेली नाही. आईला जास्त वाईट वाटेल म्हणून शाळेत कालेजमध्ये मित्रांसोबत झालेली चर्चा तो घरी कधीच बोलून दाखवत नव्ह्ता.. पण मित्रांचे वडिल हक्क दाखवून रागवायचे.. चुकीच्या गोष्टींवर डाफ़रायचे.. ते ’सुख’ त्याला लाभले नाही. हा आपला सख्खा मुलगा नाही हे त्याच्या सावत्र वडीलांच्या मनातून कधीच गेले नाही. भरपूर खेळणी.. खाऊ.. कपडेलत्ते.. हवे ते शिक्षण घेण्याची मुभा .. सगळे काही त्यांनी दिले.. पण एक अंतर दोघांच्या दरम्यान कायम राहिले..

आईचे दु:ख त्याला लहानपणापासूनच जाणवायचे. अतिशय विलक्षण पध्दतीने तिची व वडिलांची ताटातूट झालेली होती. १९४५ च्या काळात त्याचे आजोबा मुलानातवंडांना घेऊन कराचीला उद्योगधंद्यासाठी गेले.. दोन वर्षे सगळे आलबेल होते. भारत पाकिस्तान फ़ाळणी ही स्वातंत्र्याची किंमत घेऊन आली..

त्याच धामधुमीत दंगली उसळल्या आणि त्याच्या वडिलांची इतर कुटुंबियांशी ताटातूट झाली. पुष्कळ शोध घेऊनही ते सापडले नाहीत. आपला जावई दंगलीत मारला गेला या विचाराने कितीही दु:ख झाले तरी ते दाखवायलाही क्षणाची उसंत नव्हती.
नाईलाजाने आजोबा लेकीला व नातवंडांना घेऊन भारतात परत आले. त्याची आई तेव्हा जेमतेम पंचविशीची.. तिच्यासमोर तर सगळे पुढचे आयुष्य पडले होते.. दोन मुले पदरात होती.. शिक्षण फ़ारसे नाही.. आजोबांनी एक धाडसी निर्णय घेऊन मुलीचे एका होतकरू तरूणाशी मुलीचे लग्न लावून दिले.

यावेळेस तो होता जेमतेम पाच वर्षांचा. पुढचे जीवन सुखात गेले. पण मनावर एक चरा उमटलेला घेऊन.. वडिलांचा फ़ोटोसुध्दा कधीच पाहिलेला नव्हता..

वर्षांमागून वर्षे उलटत गेली. काळ कधीच कोणासाठी थांबत नसतो. आणि अखेरीस कोणाचेच कोणावाचून अडत नसते. मनात एक ठसठसणारी वेदना घेऊन आपण सर्वजण पुढे जातो.

मागच्या आठवड्यात मात्र या सगळ्याला छेद देणारी एक विलक्षण घटना घडली. त्याला एक फ़ोन आला.. “….. तुम्हीच ना ?”

“होय , बोला काय काम आहे”?

“हं.. काम जरा वॆयक्तिक आहे.. आपण भेटू शकतो का?”

अनेकविध विचार त्याच्या मनात डोकावून गेले.

पण अखेरीस फ़ोनवर पलीकडच्या माणसाच्या बोलण्यातल्या आर्जवाला त्याने होकार दिला. दोन दिवसांनंतर संध्याकाळी एका हॉटेलमध्ये भेट ठरली. अतिशय उत्सुकतेने तो ठरलेल्या ठिकाणी वेळेच्या आधी पोहोचला.

’तो’ आलेलाच होता.. अंदाजावरुन त्याने नाव विचारुन पडताळणी केली व हस्तांदोलन घडले.

त्याला पाहिल्यापासून काहीतरी विलक्षण भावना मनात दाटत होत्या.

त्या माणसाने त्याला स्वत:चे पूर्ण नाव सांगितले .. ते ऎकून तो उडालाच. त्याच्या सख्ख्या वडिलांचे आईने सांगितलेले नाव त्याही माणसाच्या वडिलांचे होते..

“कसे शक्य आहे ?.. जाऊ दे.. एकाच नावाच्या व आडनावाच्या दोन व्यक्ती असणे फ़ार दुर्मिळ नाही..” दुस-या मनाने लगेच उत्तर दिले..

तो पुढे ऎकू लागला. तो माणूस हसला.. म्हणाला.. ’होय, तुझ्या मनात जे विचार चाललेत ते योग्य आहेत’. तुझे व माझे वडिल एकच होते.. “

“पण हे कसे शक्य आहे ?.. ते तर कधीच ..कित्येक वर्षांपूर्वीच गेले. आणि मी एकटाच मुलगा आहे त्यांचा..” हा म्हणाला.

तो माणूस म्हणाला.. “नाही.. ते पाकिस्तानातून जीव बचावून कसेबसे आले. तुम्हा सर्वांचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला. तुम्ही सापडला नाहीत. मग त्यांनी पुनर्विवाह केला. माझा जन्म झाला. तुम्हा सर्वांची ते खूप आठवण काढायचे. त्यांच्या दृष्टिने तुम्ही दंगलीत मारले गेलात. अनेकदा त्यांच्या ओठांवर तुझे नाव यायचे. मागच्या वर्षी ते गेले. मागच्या महिन्यात अचानक तुला पुरस्कार मिळाला तेव्हाचा तुझा फ़ोटो व त्याखालचे नाव पाहून मी चमकलो. मग माहिती काढत गेलो. तुझ्या आईची माहिती कळली.. मग खात्री पटली की आपण दोघे भाऊ लागतो. तुझा फ़ोन नंबर शोधून फ़ोन केला. आणि आज आपण येथे आहोत”.

समाप्त