Wednesday, July 1, 2009

कला की कलाकार

मायकेल जॅक्सन हा विषय आता प्रसिध्दीमाध्यमांना कित्येक वर्षे पुरुन उरेल. त्याच्या आकस्मिक मृत्यूनंतर मनात कला की कलाकार हा विचार परत एकदा आला.

मध्यंतरी गौरी देशपांडे या orkut community ची विंचुर्णीला ट्रीप गेली होती. तेव्हा मी गेले नाही. मनात येत होते की गौरीचे लेखन, त्यातले विचार आवडतात. म्हणून तिच्या घरी, तिच्या वस्तू बघायला जाणे, त्यांचा संग्रह करणे.. आणि त्याचे अवडंबर माजविणे बरोबर आहे का ?

कोणत्याही कलाकाराची कला थोर की तो कलाकार ? शेवटी तो एक माणूस असतो. हे विसरले जाते. व कलाकाराच्या व्यक्तिगत जीवनात जास्त डोकावले जाते. त्याने / तिने कसे वागावे हे समाज (म्हणजे आपणच) ठरवायला लागतो. आणि मग त्याच्या कलेवर कधी कधी अन्याय होतो.

मायकेल जॅक्सन ला १३ grammy award मिळाली यात त्याचे कलाकार म्हणून मोठेपण सिध्द झाले. बाकी तो व्यक्ती म्हणून काय होता यावर चर्वितचर्वण करुन काय साधणार आहे ?

अनेक ठिकाणी मला त्याच्याबद्दल ’कितीही controversy असली तरी तो कलाकार म्हणून निर्विवादपणे थोर होता’ अशा अर्थाच्या comments आढळल्या आणि खूप बरे वाटले…

Monday, April 27, 2009

संगीत कार्यशाळा – भारत गायन समाज

श्रीधर फ़डके वरील कार्यशाळा सध्या घेत आहेत. काल या कार्यक्रमाला जायचा योग आला.

संगीत कार्यशाळा याबद्दल माझे मत फ़ारसे अनुकूल नव्हते. चार पाच दिवसात कोणतीही कला अशी घाईघाईत पी हळद व हो गोरी style ने नाही जमत.
पण काल श्रीधरजींनी तीन गाणी तीन तासात शिकवली. व स्टेजवर त्यातील लोकांना गायला सांगितली.

केवळ तासभर शिकवल्यावर विद्यार्थ्यांनी ती सुरेख गायली. त्यातून त्या मुलांची तयारी किती आहे त्याचबरोबर श्रीधरजी किती उत्तम पध्दतीने शिकवतात या दोन्हीचा अनुभव आला. गाण्याचे कार्यक्रम आपण अनेकदा ऎकतो. पण संगीतकाराच्या मनात असलेली चाल तो गायकाकडून कशी गाऊन घेत असेल याचे कुतूहल होते. ते काही अंशाने कमी झाले. बारीकसारीक जागा, ताल, लय, सगळे एकेका टप्प्यात श्रीधरजी सांगत होते. फ़ुलले मधील ’फ़ु’ –हस्व आहे तो तसाच यायला हवा.. इतके बारकावे सुध्दा त्यात आले.

काही मुलामुलींना ती गाणी मराठीत असल्याने लिहून घेताना त्रास होत होता कारण शिक्षणाचे माध्यम इंग्रजी..

एकूण सगळ्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता.

काल शिकवलेली गाणी.

१. दे साद दे हृदया
२. कलिका, कशा गं बाई फ़ुलल्या
३. अकार, उकार, मकार..

Wednesday, March 18, 2009

Casablanca… २




Ask your wife.. या प्रश्नानंतर लाझ्लोला रिक इल्साच्या आयुष्यात आला होता हे कळल्यावर तो फ़क्त इतकेच म्हणतो.. I know how it is to be lonely.. नात्यातील विश्वास व्यक्त करणारा हा प्रसंग व संवाद आहे. या चित्रपटातील प्रेमत्रिकोणात नात्यांमधला एकमेकांबद्दलचा आदर, विश्वास हा पाया फ़ार महत्वाचा आहे.

लाझ्लोकडून हे कळल्यावर इल्सा परत रिकला एकटी भेटायला जाते.. तो नकार देतो तेव्हा पिस्तूल ही काढते. रिक शांतपणे म्हणतो.. if victor is the cause of this, then shoot me..

आता ती कोसळते. रिकवरच्या आजही जिवंत असलेल्या आपल्या प्रेमाची तिला जाणीव होते. रिकबरोबर पॅरिसमध्ये असताना नाझींपासून असलेल्या धोक्यामुळे तिला व्हिक्टरसोबत झालेल्या लग्नाबद्दल बोलता येत नाही. व्हिक्टर लाझ्लो मरण पावल्याचे तिला कळलेले असते. पण जेव्हा रिक व इल्सा पॅरिस सोडून निघून जाणार असतात तेव्हा व्हिक्टर लाझ्लो जिवंत असल्याचे कळते.. त्याला सोडून ती रिकसोबत जाऊ शकत नाही.

रिक आता परत भेटल्यावर त्याच्यावरच्या प्रेमाची तिला जाणीव होते. व्हिक्टर ने एकट्याने अमेरिकेला जावे व त्याच्या व्हिसासाठी व पुढील कामासाठी त्याने व्हिक्टरला मदत करावी असे ती रिकला सुचविते. I ran away once, I can’t do it again, Oh, I don't know what's right any longer. You have to think for both of us. For all of us. असे ती रिकला म्हणते.

फ़ार मोठी जबाबदारी रिकच्या खांद्यावर येऊन पडते. प्रेमातील एक उंची या सिनेमात यानंतर गाठली गेली आहे. आपल्या प्रियकर / प्रेयसीचे आयुष्य आपल्या हातात आहे.. ते त्याने / तिने आनंदाने सोपविले आहे. या जबाबदारीचे काय करायचे याचे उत्कॄष्ट उत्तर हा सीन देतो.

यानंतर रिक शांतपणे इल्सा व व्हिक्टर या दोघांची अमेरिकेला जाण्याची व्यवस्था करतो. विमानतळावर पोहोचेपर्यंत इल्साला याची कल्पना नाही. व्हिक्टर सामानाची व्यवस्था पाहाण्यासाठी गेलेला असताना अचानक रिक रेनॉला व्हिसावर मिस्टर व मिसेस लाझ्लो अशी दोन नावे टाकायला सांगतो. इल्सा चमकते.. रिक तिने व्हिक्टरसोबत जाणे कसे योग्य आहे ते पटवून देत असतो.. व्हिक्टर जवळ येतो.. तसा तो अचानक म्हणतो.. He is looking at you, kid..

रिक व्हिक्टर लाझ्लोला आदल्या रात्री इल्सा आली होती.. व तुमच्या दोघांच्या येथून जाण्यासाठी तिने आपल्यावर प्रेमाचे नाटक सुध्दा केले असे सर्व सांगतो. त्यांच्या पुढील आयुष्यात रिकच्या निमित्ताने कसलेही किल्मिष राहू नये याची तो काळजी घेत असतो.

चित्रपटाच्या शेवटी.. भरल्या डोळ्यांनी रिकचा निरोप घेऊन इल्सा जाते.. तेव्हाही व्हिक्टर तिला एकदा विचारतो.. Are you ready ? प्रश्न फ़ार सूचक आहे.

यानंतर एक छोटासा प्रसंग आहे. रिक व रेनॉ जोडीने चालले आहेत. व रिक म्हणतो.. Louis,I think this is a beginning of a beautiful friendhsip.. फ़्रान्स व अमेरिकेचे पुढील नाते यात सूचकतेने व्यक्त केले आहे.

’ज्यामुळे हे श्वास घेणे सार्थकी वाटायचे’ .. असा माणूस तिघांनाही भेटला आहे.. असा प्रेमत्रिकोण दाखविणारा हा एकमेव चित्रपट असावा.

-----------------------------------------------------------------------------------

यातील As time goes by हे सुरेख गाणे..

You must remember this
A kiss is just a kiss, a sigh is just a sigh.
The fundamental things apply
As time goes by.
And when two lovers woo
They still say, "I love you."
On that you can rely
No matter what the future brings
As time goes by.
Moonlight and love songs
Never out of date.
Hearts full of passion
Jealousy and hate.
Woman needs man
And man must have his mate
That no one can deny.
It's still the same old story
A fight for love and glory
A case of do or die.
The world will always welcome lovers
As time goes by.
Oh yes, the world will always welcome lovers
As time goes by.

Everybody comes to Rick’s या नाटकावर casablanca आधारित आहे त्यातून हे गाणे घेतले आहे. डूली विल्सन या नटाने सॅमचे काम केलेय व हे गाणे त्यानेच गायले आहे.

Tuesday, March 17, 2009

Casablanca… १




फ़्रेंच मोरोक्कोमधील एक ठिकाण.. या पलीकडे या स्थानाची महत्त्वाची ओळख म्हणजे Casablanca हा चित्रपट.. तीन ऑस्कर मिळवणारा… अजूनही (१९४२ साली प्रदर्शित झालेला आहे.. हे लक्षात घेतले तर अजूनही याचा नीट अर्थ कळतो.) top 100 मधे असलेला casablanca.. बराक ओबामा आवडण्या-न आवडण्याची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतील. पण त्यांच्या आवडत्या चित्रपटांमध्ये casablanca आहे हे वाचून माणूस आपल्या जातीचा वाटला हे नक्की..

तर casablanca..

म्हणजे रिक, इल्सा.. Humphrey Bogart and Ingrid Bergman….
म्हणजे As time goes by हे चिरतरुण गाणं….
म्हणजे here’s looking at you ‘kid’ यात प्रेयसीच्या आयुष्यात father figure मिळवणा-या प्रियकराचा संवाद.. स्त्रिया कायम आपल्या partner मध्ये एक father figure शोधतात याचा विचार करता.. casablanca मध्ये सुरुवातीला प्रेमाच्या संवादात असणारे हे वाक्य (here’s looking at you ‘kid’) सिनेमाच्या शेवटी He is looking at you Kid असे रिक इल्साला लाझ्लोबद्दल म्हणतो तेव्हा थरकाप होतो.. त्याने आता तिच्या बाबतीत.. father figure भूमिका घेतली व निभावली आहे हे कळणारे ते वाक्य..

Casablanca मध्ये रिक व इल्सा सतत शब्दांपलीकडे बोलत असतात. त्यांच्या डोळ्यातून, थरथरणा-या ओठातून.. प्रत्येक हावभावातून between the lines असे संवाद सतत ऎकू येत असतात.. नुसत्या प्रेमभ-या कटाक्षाने रिकवर चे तिचे प्रेम अनेक प्रसंगात व्यक्त होते. (त्या दोघांच्या पॅरिसमधील प्रेम दॄश्यात ते गाडीतून फ़िरत असताना.. ते खूप जाणविते.. आणि मला यह क्या कर डाला तूने असे म्हणणारी मधुबाला आठवते..)

तसाच सॅम व रिक यांचा एक प्रसंग.. सगळे बार मधून गेल्यावर सॅम आहे.. संध्याकाळी इल्सा येऊन गेली आहे.. रिकला दारु पिणं आवरतं घेण्याबद्दल तो सांगतो आहे. रिकच्या काळजातली जखम आज खपली निघून वाहते आहे.. भूतकाळ विसरायला आज दारु नाही पुरत.. व इल्सा आणि रिक यांच्या प्रेमकहाणीचा एकमेव साक्षीदार आहे सॅम.. तो थांबला आहे.. तो सॅमला ते गाणं म्हणायला सांगतो. व अचानक इल्सा आल्यावर तो मागच्या पावली जातो.. (याच दॄश्यावर देवआनंद चं ’दिन ढल जाये’ सुरु होतं.. त्याचा सहाय्यक मणी त्याच सॅमच्या रोलमध्ये आहे.. त्यातही वहिदा आल्यावर मणी मागच्या पावली निघून जातो.. दारुची बाटली ही तशीच.. गाईड आपल्या जागी एका उंचीवर आहे पण casablanca ची सर नाही..)

तर अशा या चित्रपटाची थोडक्यात कथा म्हणजे..

१९४१ मधले casablanca.. नाझींच्या छळातून सुटका करुन अमेरिकेकडे जाऊ इच्छिणा-यांची काशी म्हणजे casablanca.. नाझींचा दबाव असला तरी राज्यकर्ते फ़्रेंच आहेत.. वातावरण दहशत, संशयाचे, असुरक्षित आहे. (पहिल्या काही दॄश्यात हे नीट clear होत जातं)..

’रिक्स अमेरिकन कॅफ़े’ यात महत्वाची भूमिका निभावत असतो. रिक त्याचा मालक आहे.. विक्षिप्त आहे. त्याचा मित्र आहे फ़्रेंच पोलिस अधिकारी रेनॉ..

युरोपियन चळवळीतील एक नेता लाझ्लो नाझी concentration camp मधून सुटका करुन घेऊन आपल्या बायकोसोबत अमेरिकेचा व्हिसा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे असे रिक ला कळते. अनेक लोक रिककडे त्याच कामासाठी येत असतात. त्यात एक मजेशीर संवाद आहे..

Captain Renault: Rick, there are many exit visas sold in this café, but we know that *you've* never sold one. That is the reason we permit you to remain open.
Rick: Oh? I thought it was because I let you win at roulette.
Captain Renault: That is *another* reason

तर लाझ्लो व इल्सा येतात.. ( Ingrid Bergman च्या entry मध्ये ती इतकी त्या रोलला perfect दिसते.. सुंदर, graceful, लाझ्लोचा आदर करणारी, तिच्या दिसण्या-बोलण्या-चालण्यातून ते सर्व झळकतं).. इल्सा सॅमकडे पाहाते.. व मनात काहीतरी हूरहूर दाटून येते.. ते आपल्याला कळतं.. )

इल्सा सॅमला ते गाण वाजवायला सांगते.. as time goes by.. रिक ओरडतच येतो.. हे गाणं वाजवायला बंदी आहे ना ? सॅम फ़क्त इल्साकडे कटाक्ष टाकतो. बस्…

इल्सा ही रिकची आधीची प्रेयसी.. दोघे पॅरिस सोडून सोबत जाणार असतात.. आणाभाका, शपथा होतात. पण ऎनवेळी रेल्वे स्टेशनवर येते ती सॅममार्फ़त तिची चिठ्ठी.. पावसाचे पाणी पडून पत्रातली अक्षरे पुसट होत जातात.. व रिकचे हदय पिळवटत जाते.. तो एकदम एका क्षणी कोरडाठक्क होतो.. दर्द न होना ही सबसे बडा दर्द होता हॆ हे वाक्य रिकच्या संदर्भात या सिनेमात अनेकदा आठवते.

इल्सा त्याच रात्री परत येते. रिक जीवघेणे बोलून तिला घायाळ करतो. ती निघून जाते. दुस-या दिवशी मार्केट मध्ये रिक तिचा अनुनय करण्याचा प्रयत्न करतो.. त्याचे रात्री चुकले असे त्याला कळते.

लाझ्लोला दोन व्हिसा रिककडे असल्याचे कळते व तो त्यासाठी रिकला भेटायला जातो. रिक नाही म्हणतो.. व शेवटी कारण विचारल्यावर म्हणतो.. ask your wife..

Wednesday, February 18, 2009

The Red Balloon




पाय-या उतरुन शाळेत निघालेला एक चिमुरडा. त्याला अचानक एक मोठा लाल फ़ुगा दिसतो.. आता उरलेल्या चित्रपटात प्रत्येक फ़्रेम मध्ये तो लाल फ़ुगा आहे. हलकेच तो टांगलेला फ़ुगा सोडवून घेतो व पुढे निघतो. काही क्षणांतच लक्षात येते की त्या फ़ुग्याला त्याचे स्वत:चे मन व इच्छाशक्ती आहे. आता पास्कल (चिमुरड्याचे नाव.. ) जाईल तिकडे फ़ुगा जातो. घरात स्थान मिळत नाही तर रात्रभर पास्कलच्या बेडरुमबाहेर लटकत राहातो. शाळेत, दुकानात, बाजारात तो सतत पास्कलच्या अवतीभवती असतो.
लवकरच गावातील टारगट मुलांना या फ़ुग्याबद्दल कळते. एका गल्लीच्या टोकाशी ती दबा धरुन बसतात. पास्कल व त्यांची पळापळ होते. यात ती मुले तो फ़ुगा कसा हस्तगत करतात ती ट्रिक बघताना मजा येते व दु:खही होते. अखेर ब-याच झटापटीनंतर ती मुले लाल फ़ुगा हस्तगत करतात. एकजण गलोलीने तो फ़ुगा फ़ोडतो.. फ़ुगा लहान होत जातो.
एक नवल घडते.. शहरात त्या क्षणी जिथे जिथे फ़ुगे असतात ते आपापल्या ठिकाणाहून निघून पास्कलपाशी पोहोचतात.. चित्रपटाच्या शेवटी पास्कल त्या फ़ुग्यांना धरुन हवेत तरंगतो आहे.
सुखाच्या फ़ुग्यांच्या मागे लागणे सोडले तर आपोआप अनेक सुखे आपल्याला येऊन बिलगतात असे त्या क्षणी मला वाटले. कारण पास्कल सोबत मी ही तरंगत होते.
15, Park Avenue हा सिनेमा पाहून आम्ही जे कोणी सोबत होतो त्यांचे शेवटच्या दॄश्याबद्दल काय मत आहे ? असा नंतर परतताना विषय झाला. तसे Red Balloon चे आहे. त्याच्यातली प्रतीके, शेवट यावरुन अनेक अर्थ निघतील.
तर असा हा The Red Balloon.. अवघ्या ३४ मिनिटांचा खिळवून ठेवणारा हा चित्रपट. ही कथा पूर्वी वाचली होती पण सिनेमा हे माध्यम कसे परिणामकारक आहे ते परत एकदा जाणविले. Albert Lamorisse या फ़्रेंच दिग्दर्शकाचा हा १९५६ मधील सिनेमा. त्यांना याचे Oscar ही मिळाले आहे. पास्कल हा या दिग्दर्शकाचाच मुलगा. यात संवाद नाहीत. फ़क्त background music.. पण पास्कलची निरागसता, शाळेतील शिक्षकांचा उग्रपणा व शिस्त, टारगट मुलांचा मस्तीखोरपणा सुरेख चित्रित झाला आहे.
चिमुरड्या पास्कलसोबत लाल फ़ुग्यासारखा मीही प्रवास केला. तो जे काही जग त्याच्या नजरेतून पहातो ते मलाही अनुभवायला मिळाले. पास्कलच्या घरातील लोक त्याला तो फ़ुगा आत आणून देत नाहीत तेव्हा, रोजच्या सकाळमधला कुत्र्याचे पिल्लू आणून देत नाहीत म्हणून नाराज होणाराचिंटू समोर आला.
गल्लीच्या तोंडाशी दबा धरुन बसलेल्या त्या कार्ट्याची भीती व राग असे एकाचवेळी मनात आले. Khalid Hussaini च्या The kite runner मधला पतंगामागे धावणारा हसन आठवला. कथेत साधर्म्य काही नाही. पण जिवाच्या आकांताने धावणा-या त्या चिमुकल्यांमध्ये नक्कीच एक समान धागा आहे.
लाल फ़ुगा पाहाताना एक गोष्ट अजून आठवली. या चित्रपटात फ़ुग्याचा लाल रंग प्रत्येक फ़्रेममध्ये प्रकर्षाने उठून दिसतो असे बाकीचे रंग राखी, फ़िके निळे आहेत. तसेच speilberg च्या schindler’s list मध्ये तीन प्रसंग रंगीत आहेत. सुरुवात, शेवट व एक लहान मुलीचा लाल फ़्रॉक आहे. चित्रपट black and white आहे. पण त्या मुलीचा लाल फ़्रॉक दोन वेळा दिसतो. प्रथम तो लाल फ़्रॉक दिसतो तेव्हा का ते कळत नाही. पण दुस-या वेळी तो प्रेतांच्या ढिगा-यात दिसतो.. आणि प्रातिनिधिक तत्वावर असे हजारो लाखो मुलांचे बळी गेलेत हे सूचित करतो.
लहान मुलांच्या निरागस दॄष्टिकोनातून एक फ़ुगा, त्याबरोबरची गंमत अनुभवणे मात्र मला नाही जमले. Charlie Chaplin चे चित्रपट लहानपणी बघताना हसू यायचे तसे आता येत नाही.. त्यामागचे हसरे दु:ख जाणवत राहते तसे काहीसे..

Thursday, February 12, 2009

परिचय..

म्हणेन ओळख झाली अपुली
परंतु परिचय झाला नाही..

कुसुमाग्रज

परिचय चित्रपटात प्राण शेवटी जितेंद्रला म्हणतो की ’तुमने मेरे बच्चोंसे मेरा परिचय करा दिया’ .. तेव्हा प्रत्येकवेळी सिनेमा बघताना अपरिहार्यपणे कुसुमाग्रजांच्या या वरच्या ओळी आठवतात.

परिचय हा सिनेमा लहानपणी कसा पाहिला याची माझ्यापाशी एक मजेदार आठवण आहे. माझी आई व आत्या मधूनमधून आम्हा भावंडांना माझ्या वडिलांपाशी ठेवून सिनेमाला जात असत. मला एकदा त्यांच्या बेताचा सुगावा लागला. मग रडून ओरडून गोंधळ घातला व त्या दोघी मला सिनेमाला घेऊन गेल्या. त्या वयात लक्षात राहिलेल्या दोन गोष्टी एक म्हणजे कासवाच्या पाठीवर मेणबत्ती लावलेला तो सीन व सा रे के सारे हे गाणे ..

पुढे अनेक वर्षांनी sound of music पाहिला. त्यातले सेट म्हणे अजूनही ज्या देशांमध्ये shoot झाले (Austria) येथे जपून ठेवले आहेत.

तर परिचय.. नुकतेच विजय पाडळकर यांचे गुलजार च्या सिनेमांवर ’गंगा आये कहां से’ हे पुस्तक आणले. त्यात या सिनेमाबद्दल फ़ार सुंदर लिहिले आहे. एका ठिकाणी ते म्हणतात..

माणसामाणसातील नाती का तुटतात या प्रश्नाकडे गुलजारांचे मन सतत वळत राहिले आहे. आयुष्यभर अव्याहतपणे ते या प्रश्नाचे उत्तर शोधत राहिले आहेत. त्यांच्या जवळजवळ सा-या चित्रपटांत तुटलेल्या नात्यांचे व त्यांना पुन्हा जुळवू पाहाणा-या माणसांच्या धडपडीचे चित्रण आढळते. शेवटी माणसाला काय महत्वाचे वाटते ? प्रेम की जीवनातले आदर्श ? सहजीवन महत्वाचे वाटते की व्यक्तिनिष्ठ मार्गावरुन एकाकी चालत राहणे ? निवड माणसाच्या हातात असते आणि नसतेदेखील, प्रत्येकाला आपला मार्ग हीच योग्य दिशा वाटते, आणि मग अपरिहार्यपणे माणसामाणसांत अंतर पडत जाते.
सर्व प्रकारच्या नात्यांमध्ये हे किती खरे आहे याची प्रचीती रोजच्या आयुष्यात आपल्याला येतच असते. वॆयक्तिक किंवा professional नात्यांनाही हे लागू होते. एखादा client, सहकारी, नातेवाईक, साधा रोजचा भाजीवाला व त्याच्याशी होणारी घासाघीस..जिथे कुठे बोलण्यात stretch येतो तिथे हे लक्षात येते की प्रत्येकाला आपला मार्ग बरोबर वाटतो. व त्यातून अंतर निर्माण होते.

परिचय चित्रपटाबद्दल मला जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे.. गुलजार यांचा देहबोलीचा अभ्यास.. जया भादुरी जेव्हा कधी प्राणच्या समोर येते तेव्हा ती हाताची नखे खाताना दिसते. कारण Nail biting हे shyness, stressful situation, nervousness बरोबर निगडित आहे. आणि प्राणचे व जयाचे नाते या सिनेमात सुरूवातीला तरी त्याच प्रकारचे आहे. गुलजार यांच्या सिनेमातले असे बारकावे मन वेधून घेतात.

परिचय या चित्रपटाशी लहानपणापासून ओळख होती पण त्याच्याशी परिचय विजय पाडळकर यांच्या पुस्तकाने करुन दिला.

Wednesday, January 14, 2009

slumdog millionaire, उत्खनन व गुलजार..

१. slumdog millionaire
काल slumdog millionaire पाहिला. अभिताभ बच्चनची craze, अनाथ मुलांना भिकारी बनविणा-या टोळ्या, वेश्यावस्ती, call center, KBC चा सेट, पोलिसांचे interrogation, लहान मुलांचे भावविश्व, गुंडगिरी, धर्मभेदावरुन होणा-या दंगली या व अशा असंख्य विषयांना हा सिनेमा स्पर्श करतो. पण तो फ़ारसा melodramatic होत नाही कारण अतिशय वेगाने घडणा-या घटना. चित्रपट पाहाताना आपण पुढे काय घडेल याची सतत धडधडत्या अंत:करणाने वाट पाहातो. नेहमीच्या हिंदी सिनेमाच्या पठडीतले आपल्या अपेक्षेप्रमाणे (शेवटची दहा मिनिटे सोडून .. ) काही घडत नाही. त्यामुळे चित्रपट बघताना त्या त्या व्यक्तिरेखे सोबत आपण जीवनाची वाट चालत असतो. नंतर विचार करायला लागल्यावर विविध विषय जाणवायला लागतात.

सर्व कलाकारांची कामे चांगली झाली आहेत. हिरोच्या भूमिकेतील देव पटेल चे सर्वात जास्त. हट्टी (Stubborn) भाव, जे हवे ते मिळवणारच असा एक निश्चय त्याच्या चेह-यावर सतत आहेत. मला त्यामानाने हिरॉइनचे काम त्या उंचीला पोहोचले नाही असे वाटले. अनिल कपूर त्याच्या भूमिकेत योग्य. इरफ़ान खानचे acting मला आवडते. पण मकबूलची उंची गाठणारा अभिनय यात फ़िका वाटतो. किंवा तो आता साचेबंद झाला आहे, असेही एकीकडे वाटले.

सिनेमाचे दिग्दर्शक Danny Boyle and Loveleen Tondon. विकास स्वरुप यांच्या Q&A या मूळ कथेवर Simon Beafoy यांनी पटकथा लिहिली आहे. A.R.Rehman यांना यासाठी golden globe मिळाले आहे. जय हो हे गाणे मस्त.

सिनेमा मला आवडला. पण काही प्रश्न मनात उभे राहिलेच.

२, गुलजार

जरा सी पीठ नंगी होती,
फ़टे हुए होते उसके कपडे,
लबों के गर प्यास की रेत होती
और एक दो दिन का फ़ाका होता

लबों पे सूखी हुइ सी पपडी
जरा सी तुमने जो छीली होती
तो खून का एक दाग होता..

तो फ़िर ये तस्वीर बिक ही जाती.

निरनिराळे आंतरराष्ट्रीय awards मिळणा-या केवळ सिनेमांबद्दलच नाही तर इतर पुरस्कारांबद्दलही (अरविंद अडिगा यांचे बुकर, टोनी मॉरिसन यांचे नोबेल इ.) हेच गणित मांडले जाते का ? हा प्रश्न पडतो.

३. उत्खनन – गौरी देशपांडे

उत्खनन या गौरी देशपांडेच्या कादंबरीत तुरूंगातील, वेड्यांच्या इस्पितळातील माणसं, फ़ूटपाथवर जगणारे भिकारी अपंग अशांच्या चित्राबद्दल ती म्हणते..

“जाता जाता त्यांना बघणं, डोक्यातल्या विचारांना त्यांचं अस्तित्व जाणवणं, आणि खुद्द जवळून, त्यांचा वास येईल इतक्या निकट जाऊन त्यांच्या आयुष्याला, मनाला, दु:खाला आपल्या आयुष्यावर आक्रमण करुन देणं, या पार वेगवेगळ्या गोष्टी आहेत.”

ती चित्रे काढणारा पुढे म्हणतो..

“स्वत:च्या आयुष्यातल्या ’नॉर्मल’ दु:खात गुंतून पडलेल्यांना अशा कुणाची दु:खं जाणवून द्यावी, हाच हेतू आहे या चित्रांचा’

slumdog millionaire सारखे चित्रपट बघून नॉर्मल दु:खात (कामाची बाई आली नाही, मोबाईलचे बिल वेळेवर भरले नाही, home loan EMI वाढला इ..) बुडालेल्या आपणही ते बघणं, त्यातील प्रश्नांसाठी मनात हळहळणं यापलीकडे काय करणार आहोत ? नेहमी असं काही घडलं, वाचलं, ऎकलं, पाहिलं की काय करतो ?