Monday, March 24, 2008

मॆत्री… १

अचानक त्या दोघींची ओळख झाली.

रोजच्याप्रमाणेच तो ऑफ़िसमधला अजून एक दिवस होता. विशाखा तिची कामे चटपटीतपणे संपवत होती. तेवढ्यात ऑफ़िसबॉयने येऊन सांगितले..

“सरांनी यांना तुमच्याकडे पाठवलंय”.. ती जरा चकित झाली. तिच्याकडे कोणाला कामासाठी पाठवायचे असल्यास तिच्या बॉसचा तिला आधीच फ़ोन यायचा. कामाच्या स्वरुपाची माहिती दिली जायची. कधी कोणाच्या ओळखीतून आलेल्या एखाद्या माणसाचा इंटरव्ह्यू असे.. तर कधी कोणी मार्केटिंगचा माणूस आपल्याकडच्या product ची माहिती सांगायला आलेला असे.

कधी कधी मात्र पुढ्च्या कामासाठी उपयोगी पडणारा माणूस ’तिला’ कसा वाटतो ते आजमावण्यासाठी ते विशाखाकडे पाठवत. विशाखाच्या कामाच्या पध्दतीवर ऑफ़िसमधले सर्वजण खुष होते. तिच्या मताला तिथे किंमत दिली जाई.

आज मात्र ती जरा वॆतागली. एक presentation बनवायचे होते, तिच्या हाताखालच्या programmer ने लिहिलेले code तपासायचे होते. एक मीटींग होती. तेवढ्यात मधे कोणीतरी टपकल्यामुळे ती वॆतागली. “आपण अकारण जास्त चिडचिड करतो आहोत का ?” तिने स्वत:ला विचारले.

नुकतेच तिचे मिलिंदसोबतचे नाते तुटले होते. गेले सहा महिने ते दोघे लग्न करणार असे जवळजवळ ठरल्यात जमा होते. दोघांनी तशी अनेक स्वप्ने पाहिली होती. ऑफ़िस कधी सुटते व कधी मिलिंदबरोबर फ़िरायला जातो असे तिला होत असे. .इंजिनिअर, चांगली नोकरी, जातीतला, एकुलता एक असे अनेक गुण पाहून तिच्या आईवडिलांनी त्याला पारखला होता.

पण हळूहळू अनेक बाबतीतले विसंवाद लक्षात येऊ लागले आणि लग्न झाल्यावर निभावणार नाही असा तिच्या मनाने निर्णय घेतला. “हे सगळं तुमच्या नवीन पिढीचं फ़ॅड आहे. आमचे नाही का संसार झाले” .. इति तिची आई.. आईला कोणत्या भाषेत समजवावे हे तिला कळेना.

पावसात फ़िरायला गेल्यावर त्याला सर्दी आठवते. जांभळे, कॆ-या खाऊ म्हणालो तर खोकला आठवतो. टेकडी चढायची कल्पना त्याला भयंकर वाटते. शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम रात्री जागून पाहाणे त्याला कल्पनेत सुध्दा अशक्य वाटते.. तर ऑर्केस्ट्रा बघणे विशाखाला अशक्य वाटते … रोजचे वर्तमान पत्र सोडून दुसरे काही वाचणे ही मिलिंदला शिक्षा वाटते. तर तिला रोज एक पुस्तक वाचायला मिळणे ही चॆनीची परमावधी वाटते. पॆसा मिळणार नाही असे कोणतेही काम करणे त्याला अमान्य आहे. आणि समाजासाठी आपण देणे लागतो तर काहीतरी जमेल तेवढे करावे असे तिचे मत..

या सगळ्यातून तिने एकटीने निर्णय घेऊन त्याला ठाम ’नकार’ दिला. आपल्यासारख्या ’स्थळाला’ कोणी नकार देईल असे मिलिंदला स्वप्नात देखील वाटले नसते. त्याने तिला ’बघू कोण मिळणार आहे’ वगॆरे म्हणत तिचा निरोप घेतला. हा अजून एक घाव.. जे नाते तुटले ते समजून घेऊन संपावे अशी तिची (चुकीची ?) अपेक्षा होती. या सगळ्यातून तिची चिडचिड आजकाल जरा वाढली होती. “हे बरोबर नाही.” तिने स्वत:च्या मनाला फ़टकारले.

केबिनबाहेर उभ्या असलेल्या बाईंकडे ती पाहातच राहिली. वय ५०/५५ च्या दरम्यान असावे. नवीन फ़ॅशनप्रमाणॆ कापलेले व रंगविलेले केस.. मुद्दाम मेंटेन केलेली अंगकाठी, अंगाखांद्यांवर नाजूक पण बरेचसे दागिने.. गळ्यातले दोन, तीन लखलखीत हार जरा विसंगतच वाटत होते, वयाला न शोभणारा रंगीबेरंगी पोशाख, चेह-यावर कुर्रेबाज भाव, स्मार्ट पण अहंभावी असे व्यक्तिमत्व.

दार ढकलून त्या बाई आत आल्या. आणि तेवढ्यात तिच्या टेबलावरचा फ़ोन खणखणला. अपेक्षेप्रमाणे तिचे बॉसच बोलत होते. ’तुमच्याकडे वॆजयंती मॅडमना पाठवतोय. आपल्याला नवीन ऑफ़िससाठी काही लोक हवेत ना..त्यांच्या ओळखी आहेत ब-याच.. बोलून घ्या जरा..”

प्रथमदर्शनी तिचे वॆजयंती बद्दल मत फ़ारसे चांगले नाही. संभाषणात वॆजयंतीला स्वत:च्या मित्रपरिवाराचा चांगलाच गर्व होता असे दिसले. त्यात ’आम्ही डॉक्टर’ लोक असे तिच्या बोलण्यात सारखे येत होते. उच्चविद्याविभूषित लोकांबद्दल विशाखाच्या मनात आदर नक्की होता. पण ती एक विशिष्ट प्रकारची हुशारी आहे असे तिचे मत होते. आयुष्य जगण्यासाठी लागणारी हुशारी जरा वेगळ्या प्रकारची असू शकते या मताची ती होती.

पण हळूहळू संवाद पुढे गेले व विशाखा व वॆजयंती स्वत:च्या वॆयक्तिक आयुष्याच्या माहितीची देवाणघेवाण करण्याइतक्या पुढे गेल्या.

वॆजयंती वृध्द आईवडिलांसोबत राहात होती. तिने लग्नाबाबत काही सांगितले नाही. मित्रांबाबत मात्र परतपरत उल्लेख येत होते. सर्व मित्रमॆत्रिणी तिचे कसे ऎकतात, कधीही बोलावले तर कसे तिच्या मदतीला धावून येतात याची वर्णने सतत येत होती.


विशाखाच्या मनातले लग्नाबद्दलचे, मिलिंदबद्दलचे विचार वॆजयंतीने समजून घेतले. विशाखाने लवकरात लवकर पण मनाला पटलेल्या माणसाशी लग्नाचा विचार करावा असे सुचविले. ती आपली हितचिंतक आहे असे विशाखाला वाटायला लागले.

विशाखाच्या कामात वॆजयंतीची काही मदत होणार होती. यासाठी ओळखीच्या लोकांना दोघी भेटणार असे ठरले. त्या भेटी या निमित्त होऊन दोघींची मॆत्री फ़ुलायला लागली. सोबतीने नाटक सिनेमा पाहाणे, भेळ्पुरी खायला, चायनीज खायला जाणे.. फ़िरणे सुरु झाले. विशाखाच्या घरीदेखील त्यांच्या मॆत्रीबद्दल समाधानाचे सूर उमटायला लागले.

अशात एक दिवस वॆजयंतीने तिच्या मित्राच्या घरी जेवायला जायचा बेत आखला. विशाखा त्यांच्याबरोबर गेली… गप्पा झाल्या. ते कुटुंब तिला आवडले. मित्राच्या बायकोमुलांशी तिच्या बोलक्या, लाघवी स्वभावामुळे सहज जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. कविता, पुस्तके असे एकाच आवडीचे विषय निघत गेले. अनेक दिवसांनी विशाखा मनमुराद हसत होती.

वॆजयंती मात्र त्या दिवसापासून बदलली. विशाखा प्रत्येक क्षणी काय करते आहे.. याचा ती अंदाज घेऊ लागली. मोबाईलवर तासनतास कामाच्या नावाखाली बोलणे व सतत विशाखाने आज कोणता ड्रेस घातला आहे.. येथपासून तिने डब्यात काय आणले आहे हे विचारणे सुरु झाले. विशाखाला कोणाकोणाचे फ़ोन येतात हे आडून आडून विचारणे सतत होत असे.

विशाखा हॆराण झाली. एका बाजूने हे सर्व सहज संवाद होते. कोणाला सांगावे तर ती व्यक्ति म्हणे.. “तुझी किती काळजी आहे वॆजयंतीला.. “ ! हे सर्व काळजीच्या पलीकडे चालले आहे असे विशाखाला वाटत राही. सतत मोबाईलवर येणारे वॆजयंतीचे फ़ोन तिने घेणे कमी केले.. तर ’फ़ोन का घेतला नाहीस.. काय करत होतीस “ ? ही प्रश्नोत्तरे सुरु होत.

कामासाठी सुध्दा वॆजयंती सोबत जाणे तिला शिक्षा वाटू लागली. त्यात एक नवीन प्रकार सुरु झाला. विशाखाच्या बॉस बद्दल चे प्रश्नांवर प्रश्न अशी एक सरबत्ती सुरु झाली. ’ते कधी आले’.. “काय करत होते.. “ “त्यांच्या घरातील माणसे कशी आहेत ? बायकोबरोबर त्यांचे पटत नाही. त्यांना intellectual companion ची गरज आहे.. “ “विशाखा त्यांच्या केबिनमध्ये कधी व का गेली होती” .. एक ना दोन.

विशाखाला पटकन तिला तोडून टाकणेही जमेना व सततच्या या पाठपुराव्याचा त्रास सहन होईना. तिने दुस-या एका मित्राला हे बोलून दाखवले.


त्याने तिला दोन तीन प्रसंगातले वॆजयंतीचे वर्तन विचारले.

“तू नवीन फ़ॅशनचा स्कर्ट घेतल्यावर वॆजयंतीने घेतला का ?”

“तू ज्या पुस्तकांचा वॆजयंतीच्या मित्राकडे उल्लेख केलास ती तिने आणली का ?”

“तू योगासनांच्या क्लासला जातेस तसाच वॆजयंतीने क्लास लावला का?”

सगळ्याची उत्तरे निर्विवादपणे ’हो’ येत होती.

“तू वेडी आहेस .. विशाखा.”. मित्र उदगारला..

“वॆजयंती तुझ्याशी स्पर्धा करु पाहते आहे. “

“माझ्याशी” ? विशाखाला डोळ्यासमोरून अनेक गोष्टी जाताना दिसल्या.. वॆजयंती सुंदर होती.. श्रीमंत होती.. डॉक्टर होती. ती विशाखाशी स्पर्धा करेल असे तिला स्वप्नातही वाटले नसते.

No comments: